ढिंग टांग : होता शास्त, बसेल धास्त!

Dhing Tang
Dhing Tang

पायथ्यालगतचे शिवाजी पार्काड झोपी गेलेले असताना गडाचें खलबतखान्यातील पलिते मात्र पेटले होते. राजियांनी कोठल्या नव्या मोहिमेची आखणी सुरु केली असेल बरे? इतिहासपुरुषाचे कुतूहल चाळविलें गेलें. त्याणें बोरु उचलोन जिभेवर टेकवोन शाईचें बुधल्यात बुडवोन जुन्नरी कागदावर टेकविला, आणि तो कान टवकारोन खलबतें ऐको लागला...

‘ह्या राज्याचे नवनिर्माण व्हावे, ही आमची इच्छा, प्रंतु काळ मोठा कठीण! नवनिर्माणाचे कामात रोडा आणोन ह्या दौलतीचे तीनतेरा वाजवणारा हा गनीम आता माजलाच! फार फार माजला!! त्यास शास्त बसविणे, हे आमचे कर्तव्य होय! तेव्हा उठा, जागे व्हा!!...’’ घनगंभीर खर्जात राजेसाहेब बोलत होते. त्यांच्या नजरेत निर्धार होता. एवढ्यात त्यांना घोरण्याचा आवाज आला. संतप्त नजरेने जाळून काढत ते कडाडले, ‘‘उठा, म्हणतो नाऽऽऽ...’’

...घोरणारा शिलेदार खडबडोन उठत डोळे चोळत इकडे तिकडे पाहो लागला. खलबतखान्यातील थंडगार शांततेत माणसाला अंमळ डोळा लागणे साहजिक आहे. परंतु राजियांनी समंजसपणे झोपाळू शिलेदारास मोठ्या मनाने माफ केले. गारव्याला लागतो असा हमखास डोळा... त्याला काय करावयाचे? ऐसा पोक्‍त विचार त्यांणी केला. 

‘जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे! गनिमास शास्त करण्यासाठी आम्ही स्वत: हाती तलवार घेवोन मोहीमशीर होत आहो! होता शास्त, बसेल धास्त!! येत्या श्रावण कृष्ण षष्ठीस गनिमास षष्ठीचा इंगा दाखवोनच पुनश्‍च गड चढू!! चला, तयारीला लागा..,’’ राजे म्हणाले. येथे मात्र शिलेदारांमध्ये गडबड उडाली. षष्ठीला दिवस उरले किती? आज चतुर्थी!! बाप रे!!

‘चवकशीचे निमित्त काढोन गनिमाने आम्हांस त्यांच्या राहुटीत बोलाविलें आहे! ही संधी पुनश्‍च येणार नाही..,’’ हातातली नोटीस फडकवत राजियांनी मसलत सांगितली. त्यांच्या मुखमंडलावर पेटत्या पलित्याच्या प्रकाशामुळे निराळेच तेज चढले होते. राजियांनी पलित्यापासोन थोडे दूर उभे राहाणे गरजेचे आहे, असे एका शिलेदाराच्या मनात येवोन गेले. परंतु तो काही बोलला नाही. गेल्या खेपेला अशीच सूचना केली असता राजियांना तोच पलिता हाती धरोन भिंतीशी तोंड करोन उभे केले होते, हे त्यास आठवले. कोण ओढवोन घेईल भलती आफत..?

‘मोहीम अवघड आहे, पण कठीण नाही!!’’ राजे म्हणाले. खलबतखान्यातले शिलेदार बुचकळ्यात पडले. अवघड आहे, पण कठीण नाही, म्हंजे नेमके काय? सारे येकमेकांकडे पाहो लागले.

‘आपल्यातील काही लोकांनी वेष बदलोन गनिमाचें गोटात आधीच शिरावयाचे. ‘आम्ही कटकातील लोक, रातपाळी करोन परत चाललो आहो,’ ऐसी बतावणी करावयाची! वेळ येताच तेथील वीज घालवावयाची! बिजली गायब होताच आम्ही चपळाईने गनिमाचें राहुटीत शिरकाव साधू! पुढील सारे सोपे आहे...’’ स्वत:च्या बोटांवरोन दुज्या हाताची बोटे फिरवीत राजे स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. 

‘गनिमास शास्त होवोन, त्यास येकदा धास्त बसली, म्हंजे तो आमच्या वाटेस पुन्हा जाणार नाही! ऐन निवडणुकीचे तोंडावर हा माजोर्डा गनिम आम्हांस नोटीस धाडितो म्हंजे काय? बघतोच येकेकांस...’’ संतप्त सुरात राजियांनी सूडाची प्रतिज्ञा घेतली. गनिमाशी दोन हात करण्यासाठी त्यांची बोटे नुसती शिवशिवत होती.

शिलेदारांना स्फुरण चढले. ‘हर हर हर हर महादेव’च्या घोषणा जाहल्या. छप्पन इंच छातीच्या वल्गना करणाऱ्या गनिमाची राजेसाहेबांना तोंड देण्याची बिशाद नाही. इडी टळो, पीडी टळो, नवनिर्माणाचे राज्य येवो! साऱ्यांनी मनोभावे जयजयकार केला. काही काळाने साऱ्यांना शांत करत राजेसाहेब म्हणाले-
‘‘मध्यरात्रीची मोहीम तूर्त रद्द करू... दिवसाढवळ्या दुपारचेच गेलेले बरे...कसे?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com