ढिंग टांग : चलती का नाम गाडी!

ब्रिटिश नंदी
Thursday, 12 September 2019

ही एक अत्यंत जीवनावश्‍यक वस्तू असून ती हरेकाने खरीदलीच पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण माणसे मोटारी खरेदी करतात, त्यायोगे देशाचे अर्थकारण चालते. मोटार आली की रस्ते आले. पाठोपाठ टोलनाका आला. विविध प्रकारचे कर आले. ट्राफिक पोलिस आला. पीयुसीवाला, पंपवाला, आणि पंक्‍चरवाला अशी एक मोठीच व्यवस्था एका मोटारीमुळे चालू राहाते.

ही एक अत्यंत जीवनावश्‍यक वस्तू असून ती हरेकाने खरीदलीच पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण माणसे मोटारी खरेदी करतात, त्यायोगे देशाचे अर्थकारण चालते. मोटार आली की रस्ते आले. पाठोपाठ टोलनाका आला. विविध प्रकारचे कर आले. ट्राफिक पोलिस आला. पीयुसीवाला, पंपवाला, आणि पंक्‍चरवाला अशी एक मोठीच व्यवस्था एका मोटारीमुळे चालू राहाते. हे एक प्रकारे टायगर प्रोजेक्‍टसारखेच आहे. वाघ वाचला तर जंगले वाचतील आणि जंगले वाचली की माणसे वाचतील, असा सरळसाधा हिशेब आहे. मोटारीचेदेखील असेच नाही का?

परंतु, हल्ली मोटार मालक नवी गाडी खरेदी करण्याऐवजी मोबाईल फोन काढून ओला किंवा उबेर नामक टॅक्‍सीसेवेला पाचारण करतात, आणि जायचे तिथे जातात! हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे. अशा देशविघातक प्रवृत्तींमुळे आज देशाची अर्थव्यवस्था पंक्‍चर झाली असून ते काढण्यासाठीचे सोल्युशन कोणाकडे आहे?

मित्रहो, या प्रश्‍नाचे उत्तर आमच्याकडे आहे! अर्थव्यवस्थेचे पंक्‍चर काढण्याचे सोल्युशन खुद्‌द आमच्याकडेच आहे. कारण आमच्या दुकानी (सेकंड हॅंड टायरट्यूब एवं टायर मिलेगा) उत्तम दर्जाचे पंक्‍चर काढून मिळते. परंतु, गेल्या काही दिवसात एकही मोटार मालक आमच्याकडे पंक्‍चर काढून घेण्यास आलेला नाही. याला कारण एकच मोटार उद्योगातील आर्थिक मंदी!! ओला आणि उबेर आदी टॅक्‍सीसेवांचा सुळसुळाट झाल्याने मोटार उद्योग साफ कोसळला आहे. पाठोपाठ आमचा पंक्‍चरचा धंदादेखील कोसळला आहे. 

खासगी रिक्षा आणि टॅक्‍सीसेवांच्या चालकांचे वर्तन याला कारणीभूत आहे. जो रिक्षा वा टॅक्‍सीवाला ‘कांदिवली चलेगा क्‍या?’ किंवा ‘सैतान चौकी येणार का?’ (वाचकांनी आपापल्या गावानुरुप ठिकाणांची नावे घ्यावीत!) अशा चौकशीस दुर्लक्षाने दुरुत्तर करीत असे, तोच रिक्षा-टॅक्‍सीवाला मोबाइलची बटणे दाबल्यावर काही मिनिटात समोर येऊन उभा राहू लागला. येवढ्या अदबीने हल्ली कोण वागते? साहजिकच मोटारमालकांना भडभडून आले व चालत्या गाडीला खीळ घालून त्यांनी टॅक्‍सीसेवेला पाचारण करण्याचा सपाटा लावला. पूर्वीच्या काळी दर दोन-तीन वर्षांनी नवी गाडी घेण्याकडे उच्चभ्रूंचा कल असे, आता आज ओला बोलवावी की उबेर? एवढाच चॉइस उरला आहे.

नीचभ्रूंनी गाडी घेण्याचे स्वप्न सोडून देऊन सायकली विकत घेतल्याने तो प्रश्‍नदेखील निकालात निघाला. परिणाम? गाड्यांची विक्री मंदावली! मोटारमंदी आली!! मोटारमंदीमुळे करसंकलन रोडावले. टोलसंकलन आटले. पंपवाले हवालदिल झाले व पंक्‍चरवाले तर पंक्‍चरच झाले. इतका अनर्थ घडला...
चलती को गाडी कहे,
खरे दूध को खोया,
रंगी को नारंगी कहे,
देख कबिरा रोया...
...असे कुणीतरी म्हणूनच ठेवले आहे. (देख कबिरा रोया या ओळीत संत कबिरांचे नाव आहे, परंतु, आम्हाला ते मान्य नाही. या ओळी सुप्रसिद्ध गायक-नट किशोरकुमार गांगुली यांच्या असाव्यात. पाहा : ‘चलती का नाम गाडी’ चित्रपट) यातील ‘चलती को गाडी कहे’ ही ओळ सर्वात महत्त्वाची. ‘ज्याची ‘चालते’ त्याचीच गाडी असते’ असे त्यात उघड उघड म्हटले आहे. अर्थ एवढाच की सध्याची मोटारबंदी ही न ‘चालणाऱ्या’ लोकांसाठीच आहे. ज्यांची ‘चालते’ त्यांच्यासाठी नाही!  

जसा निद्रानाशावरील सर्वोत्तम उपाय बिनघोर झोपणे हाच असतो, तद्‌वत मोटारमंदीवरील अक्‍सीर तोडगा म्हणजे मोटार विकत घेणे हाच आहे. आमचे हे सोल्युशन आम्ही अर्थमंत्री मा. निर्मलाम्याडम यांना दिले. तेव्हा त्या खुदकन हसून म्हणाल्या, ‘‘ॲब्सोळ्युटली राईट्‌ट!!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang