ढिंग टांग : आज ज्यांचा वाढदिवस!

Dhing-Tang
Dhing-Tang

आजची तिथी : विकारी संवत्सर भाद्रपद कृ. तृतीया.
आजचा वार : हॅप्पीबर्थडे!
आजचा सुविचार : तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सिद्धमंत्राचा जप लिहून लक्ष केव्हाच पुरा झाला. आजच्या पवित्र दिनी जपाच्या वह्या समुद्रार्पण करावयाची वेळ आली आहे. याच नामस्मरणाने आजवर आम्हाला तारले, हे विसरून कसे चालेल? या मंत्राची पॉवर एकदम जबर्दस्त आहे. संकटकाळात हा मंत्र नुसता एकवीस वेळा म्हटला तरी ईडापीडा टळून जातात. मार्ग मोकळा होतो. आजच्या दिवशी एवढेच म्हणेन की ‘गुरुवर्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत. अवघ्या महाराष्ट्राचा धडाक्‍यात विकास करून टाकीन!’

सकाळी भल्या पहाटे उठलो. स्नान वगैरे करून शुचिर्भूत झालो. देव्हाऱ्यासमोर जाऊन उभा राहिलो. निरांजन पेटवले. अगरबत्ती पेटवली. देव्हाऱ्यातील तसबिरीला नमोभावे वंदन केले. मनोमन अभीष्ट चिंतिले. जपाच्या वह्या सादर समर्पण केल्या. नैवेद्य दाखवला. (लागलीच चार पेढे तोंडात टाकले!) मग मोबाइल उचलला. मोबाइल फोन ऑन करताक्षणी मेसेज वाजला. ‘‘आपडे गरूने वंदन करजो! आजे आपडी दीपवाळी छे’’... मा. मोटाभाईंनी मेसेज पाठवला होता. अचानक आठवले. आज आपल्या परमपूज्य गुरुणांगुरू आणि परमदैवताचा जन्मदिन!! ताबडतोब त्यांना ‘तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ हा मेसेज सेंड केला. (सोबत मेणबत्ती, केक, फुले अशी संदेशचित्रेही पाठवली!) अक्षरश: तीन सेकंदांत ‘थेंक्‍यू’चा उलटा मेसेज आला. पाठोपाठ गॅस सबसिडी, युरियापासून ते थेट ३७० कलमापर्यंत अनेक यशस्वी उपक्रमांची यादीदेखील आली!! ती सारी मनोभावे वाचली. खरे तर ही यादी मला इतकी तोंडपाठ आहे की झोपेतसुद्धा घडाघडा म्हणून दाखवू शकेन. ‘शुं चाले छे? बद्धा ठीकठाक छे ने?’ असा स्नेहभावाने चौकशी करणारा त्यांचा मेसेज आला आणि मन गहिवरले. हल्ली इतकी प्रेमाने चौकशी कोण करतो? 

सारे काही नीट चालू असून, इतर पक्षांची गोदामे जवळपास रिकामी केल्याचा रिपोर्ट त्यांना देऊन टाकला. त्यावर त्यांनी ‘शाब्बाश’ असे कौतुक केले. एक ‘अंगठ्या’ची खूणदेखील आली. हेच माझ्या यशस्वितेचे सर्टिफिकेट आहे. या कौतुकाचा स्क्रीनशॉट घेऊन तो डेव्हलप करून फ्रेम करून लावण्याचा विचार मनात डोकावला. असो.

मा. नमोजींच्या वाढदिवसाला जगभरातून मेसेज आणि पुष्पगुच्छ येत असतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागल्या वेळेलाच त्यांची बर्थ डेट विचारून डायरीत टिपून ठेवली होती. लाखो मेसेजेस येत असताना ते आपल्या मेसेजला उत्तर देतात, यातच सारे काही आले! मी नक्‍कीच त्यांचा लाडका असलो पाहिजे. अत्यंत प्रसन्न मनाने बाहेरच्या खोलीत आलो. बाहेर आमचे गिरीशभाऊ महाजनजी आणि चंदूदादा कोल्हापूरकर उभेच होते. त्यांना अभिमानाने मेसेज दाखवला. त्यांनी ‘व्वा, क्‍या बात है’ असे म्हटले. मनोमन त्यांचा चेहरा पडला असेल असे माझ्या मनात येणार इतक्‍यात, मा. चंदूदादा म्हणाले, ‘‘या पवित्र दिनी आपण रक्‍तदान करून येऊया का?’ मा. गिरीशभाऊंनी तर तात्काळ शर्टाची बाही फोल्ड करायला घेतली. पण, मला लागलीच जनादेश यात्रेला निघायचे होते. ‘पुढे बघू’ असे म्हणून सटकलो. मा. नमोजींचा आशीर्वाद असल्यावर येत्या निवडणुकीचा निकाल लागल्यासारखाच आहे. आपण फक्‍त मनात आणायचे, देणारा दिल्लीत बसला आहे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com