ढिंग टांग : गनिमी कावा!

Dhing-Tang
Dhing-Tang

नेमके सांगावयाचे तर भाद्रपदातली ती येक भिजरी सकाळ होती. ढगांनी आभाळात उगीच आर्डाओरड चालवली होती. पण गरजेल तो बरसेल काय? पर्जन्याविना अवघे शिवाजी पार्काड निम्मेशिम्मे कोरडेच होते. पार्काडाच्या मधुमध उभा उत्तुंग, बेलाग कृष्णकुंजगडाचा कडा! मान वर करोन पाहो जाल, तर मागल्या मागे तुटोन पडावयाची!! पण पार्काडातले रहिवासी अत्यंत प्रेमादराने सकाळी उठोन मान वर करोन गडाचे दर्शन घेताती. गडाचे बालेकिल्ल्यात पार्काडवासीयांचे (पक्षी : आमचेही) दैवत प्रतिष्ठापित आहे. मऱ्हाटी राज्याच्या नवनिर्माणाची मंत्रणा येथोन चालते. 

औंदा निवडणुकीचे हंगामात आमचे साहेब धडाकेबाज मोहीम राबवून दुश्‍मनांस सळो की पळो करोन सोडणार, यात दुमत नव्हते. येता निवडणूक, जाता बोळवणूक!! सैनिकांमध्ये नवचैतन्य कायमच असते. ते पुन्हा एकवार सळसळले. आजवर खाल्लेल्या पोलिसांच्या लाठ्या, केसेस...साऱ्याचे चीज होणार म्हणोन नवनिर्माणाचे मावळे आणि सरदारांनी कंबर कसली होती. पण...
साहेब आपल्या बालेकिल्ल्यात अस्वस्थपणे येरझारा घालीत होते. टु बी ऑर नॉट टु बी? लढावे की कीर्तीरूपें उरावे? हा शंभर नंबरी सवाल होता. बराच वेळ विचार करून करून पाय दुखल्यानंतर साहेबांनी आपल्या येरझारा थांबवल्या, आणि फर्मान सोडले,‘‘ नवनिर्माणाच्या अष्टप्रधानांनी टाकोटाक गडावर हजर व्हावे. जेवत असाल तर आंचवायास गडावर यावे. (सोबत डबा घेवोन यावे!)’’ वगैरे.

...साहेब आज युध्दाची घोषणा करणार, याची नवनिर्माणाच्या पाईकांना मनसे खात्रीच पटली. साहेब बोलावणार, आणि ऐलान करणार- ‘‘कामाला लागा! कामाला लागा!!’’
...हौसेने सारे गडाचें बालेकिल्ल्यात जमले. 
 साहेब तंद्रीतच होते. बाळाजीपंत अमात्यांनी उपरणें सावरत थोडेसे खाकरुन आपल्या उपस्थितीची जाणीव करोन दिली. त्रासिक नजरेने साहेबांनी त्यांच्याकडे पाहिले ‘‘कायाय?’’
साहेबांनीच आपल्याला बुलावा धाडिला, हे साहेबच विसरले की काय? ऐसे वाटोन बाळाजीपंतांचा चेहरा अंमळ उतरला. त्यांनी सरखेल नितीनाजी सरदेसायांकडे तिरक्‍या नजरेने पाहिले. मग पुन्हा खाकरले.
‘‘खाकरू नका हो सारखे सारखे!’’ साहेब अचानक ओरडले.
‘‘क्षमा असावी, विलेक्‍शनाचे रणांगण निकट आले आहे! आपली शिबंदी तय्यार आहे, साहेबांनी हुकूम केल्याक्षणी घोडियांस टांच दिली जाईल, याबद्दल खातरी असो द्यावी!’’ बाळाजीपंतांनी पोक्‍तपणे विषय काढला. त्यावर साहेब काही बोलले नाहीत. टांच द्यावी की न द्यावी? टु बी ऑर नॉट टुबी?
‘‘जुझात आपला विजय ठरलेलाच आहे, साहेब! आपल्या निव्वळ उपस्थितीने रणांगणामध्ये रंग भरेल, साहेब!’’ सरखेल नितीनाजींनी आग्रहो धरिला.
‘‘ती काय रंगपंचमी आहे, रंग भरायला?’’ साहेबांनी आग्रहो परतविला. थोडा विचार करोन त्यांनी विचारिले, ‘‘एकंदर जनतेची मागणी काय आहे? आम्ही लढावे की न लढावे?’’
‘‘ हे काय विचारणे झाले? युद्धासाठी आपले सारे सैनिक उतावीळ झाले असून कधी एकदा साहेब घोषणा करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे! औंदा ‘लावरेतोव्हिडिओ’च्या पलीकडचे काही तरी पाहावयास मिळेल, म्हणोन महाराष्ट्राची जनतादेखील आतुर जाहली आहे,’’ बाळाजीपंतांनी एकूण चित्र डोळियांसमोर उभे केले.
‘‘ठीक ठीक! आमचा गनिमी कावा यशस्वी ठरला तर?’’ साहेब खुशीत म्हणाले. 
‘‘म्हंजे लढू की नको? असा संभ्रम निर्माण करोन एकदम एल्गार करायचा...हाच गनिमी कावा ना?’’ हर्षभराने बाळाजीपंत म्हणाले. सर्वांनाच स्फुरण चढले. साहेब गालातल्या गालात हसत म्हणाले-
‘‘हो...किंवा उलट! लढू का? अशी हूल देऊन स्वस्थ राहायचे! कसं?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com