ढिंग टांग : उघड रे ती छत्री!

ढिंग टांग : उघड रे ती छत्री!

मुक्‍काम पुणे. बाहेरचा गडगडाट आणि कलकलाट ऐकून किंचित चिडक्‍या (म्हंजे नेहमीच्या) स्वरात साहेबांनी विचारले, ‘‘कोण आहे रे तिकडे? काय गडबड आहे?’’

‘काही नाही, थोडे ढग आहेत, साहेब! उगीच गडबड करताहेत,’’ एका कडवट सैनिकाने चाचरतच उत्तर दिले. साहेबांनी प्रारंभी दुर्लक्ष केले. गरजेल तो बरसेल काय? पण ढग बरसले!

‘ही काय पद्धत झाली?’’ बरसणाऱ्या पुणेरी ढगांकडे पाहून साहेब वैतागले. कडवट सैनिकाला काय बोलावे ते कळेना. तो नुकताच बाहेरून भिजून आला होता. ओल्या कपड्यानिशी उभे असताना कुणी रागेजून बोलत असेल, आणखी पंचाईत होते. साहेब तटकन बाहेर आले. आभाळात गडगडणाऱ्या ढगांकडे बोट रोखून त्यांनी ‘बघून घेईन’ असा दम दिला, तेव्हा कुठे परतीच्या पावसाचे ढग चीची करत पळत सुटले. विजांचा कडकडाट थांबला. सारे काही चिडीचूप झाले.

साहेबांचा नाद करायचा नाही, हे त्या बिचाऱ्या परदेशी पावसाळी ढगांना काय माहीत? इथे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात साहेबांची सत्ता चालते. ते म्हणतील ती दिशा पूर्व असते, बाकी साऱ्या दिशा त्यानुसार स्वत:ला ॲडजस्ट करतात. सूर्याने तिथूनच उगवायचे असते. उगीच वाट्टेल तिथून उगवायची त्याची काय बिशाद आहे?

साहेबांनी नुसत्या बोटांनी इशारा करताच आवरते घेणाऱ्या ढगांना भान आले. 

नको त्या वेळी कोसळ कोसळ कोसळून साहेबांच्या सभेचे तीन तेरा वाजवणाऱ्या पावसाळी ढगांची आता काही खैर नव्हती. मनात आणले असते तर साहेबांनी ढगांचा तिथल्या तिथे बॅंड वाजवला असता. पण साहेबांनीच संयम पाळला. नुसता दम देऊन परत पाठवले त्यांना. इंगा दाखवला असता तर ढगांनी नको तिथे उगीच जमीन ओली केली असती. आधीच धरणे ओसंडून वाहताहेत. जाऊ दे.

साहेबांच्या सभेसाठी मैदान मिळत नव्हते. मोठ्या हिकमतीने ते मिळाले. खुर्च्याबिर्च्या मांडल्या. साऊण्ड सिस्टिम लावली. स्टेज सजवले आणि ऐनवेळी या मस्तवाल ढगांनी सगळा चुथडा केला. मैदान गाठून साहेबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. 

‘कुठून आलेत हे सगळे? त्यांना माहीत नाही का? आज नऊ तारीख आहे...,’’ तिरसटून साहेबांनी विचारले. मैदानातला चिखल पाहून त्यांनी रुमाल (नेहमीप्रमाणेच) नाकाला लावला. हजारो सैनिक खुर्च्या डोक्‍यावर घेऊन चिखलात उभे होते. स्टेजचीही अवस्था वाईट होती.

‘पावसानं घात केला साहेब, नाहीतर आज या सत्ताधाऱ्यांचं काही खरं नव्हतं!’’ एक कडवट सैनिक मनापासून बोलला. साहेबांनी मान डोलावली.
‘‘मला तर यात सरळ सरळ घातपात दिसतो आहे..!’’ आणखी एक सैनिक डोक्‍यावर खुर्ची धरुन म्हणाला.

‘ती खुर्ची ठेव रे खाली आधी!’‘साहेब उगीचच त्याच्या अंगावर ओरडले. त्याने घाबरून खुर्ची खाली ठेवली. त्याने खुर्ची खाली ठेवली, म्हणून इतरांनीही तत्परतेने खुर्च्या खाली ठेवून रांगेत मांडायला सुरवात केली. ‘‘आता खुर्च्या कसल्या मांडताय?’’ साहेब पुन्हा ओरडले. सैनिकांना काय करावे कळेना! पुन्हा खुर्ची उचलून डोक्‍यावर घ्यावी काय? की आहे तिथेच ठेवावी?

‘हे सगळं त्या मोदी आणि शहांचं कारस्थान आहे...बरं!’’ साहेबांनी त्यांच्या रागीट आवाजात सांगितले. मोदी-शहांनीच मुद्दाम ढग पुण्यात पाठवले. संध्याकाळी बरोब्बर नेम धरुन पुण्यावर पाऊस पाडलान!! ते काही नाही, पुढल्या सभांमध्ये यांना चांगला इंगा दाखवतो. ‘लाव रे तो व्हिडिओ’चा धडका सुरू झाला की यांची अवस्था त्या ढगांसारखीच होईल...साहेबांनी मनातल्या मनात निर्धार केला आणि ते निघाले. निघता निघता म्हणाले- ‘‘उघड रे ती छत्री!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com