ढिंग टांग : चांद फिर निकला..!

Dhing-Tang
Dhing-Tang

आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४२ आश्‍विन पौर्णिमा.
आजचा वार : संडेवार.
आजचा सुविचार : चांद को क्‍या मालूम चाहता है उसे कोई चकोऽऽओओओओर!!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) आज काय लिहू या डायरीत माझ्या? सारे शब्दच संपले! आज कोजागरी पौर्णिमा... को जागर्ति असे विचारीत फिरायची रात्र. टिपूर चांदण्याची रात्र. गार वाऱ्याची रात्र आणि केशर-वेलचीयुक्‍त दुधाची रात्र! कालपासूनच वेध लागले होते. चंद्राला नव्हे, आम्हाला! कोजागरी पौर्णिमा ही प्रचारासाठी उत्तम संधी आहे, असे सर्वांचे मत होते.

वास्तविक हे जे चांदणे पडले आहे, ते मा. मोदीजींच्या तेजाचे आहे, हे मतदारांना पटवून देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष चंद्र दाखवण्याची गरज होती. दुधाच्या गिलासासोबत या उपक्रमाला लज्जत आली असती. कोजागरीला नेमके काय करायचे, हे ठरवण्यासाठी मीटिंग घेतली. सगळे प्रचारात बुडालेले, पण मीटिंग महत्त्वाची होती. आमचे गिरीशभौ म्हणाले, ‘‘सगळ्या मतदारांना दूध देऊ या पक्षातर्फे!’’ सूचना नाकारली गेली. कारण हे काही पर्वडले नसते. हल्ली दुधाचा रेट किती वाढला आहे! आमचे चंदुदादा कोल्हापूरकर गप्प गप्पच होते. शेवटी मी त्यांना विचारले, ‘‘काय दादा, आज एवढे गप्प का? तुमची कोथरुडची सीट नक्‍की येणार आहे..!’’ 
‘‘ते ठीक आहे, आज सकाळी पुण्यात हास्य क्‍लबात गेलो होतो!’’ ते गंभीरपणाने म्हणाले.
‘‘हाहाहा!! काय सांगताय काय!’’ आम्ही.
‘‘त्यामुळे माझा हसण्याचा या महिन्यातला कोटा संपला आहे!,‘’ मर्यादेबाहेर खर्च गेल्यावर निवडणूक आयोगाची नोटीस आलेल्या उमेदवारच्या (रडवेल्या) चेहऱ्याने ते म्हणाले. आम्ही गंभीर झालो. माणसाने मोठ्यांदा फार हसू नये, माफकच हसावे!! लहानपणी आम्हाला शाखेत सांगत, ‘‘आत्ता हसताय, मग रडाल!’’

...शेवटी आचार संहितेमुळे कोजागरी होणे शक्‍य नाही, कारण कोजागरी रात्री असते. दिवसा चांदणे पडणे केवळ अशक्‍य आहे, त्यामुळे हा बेत रद्‌द करून प्रत्येकाने स्वत:च घरी एकेक लिटर दुधाची जास्तीची पिशवी आणावी आणि कोजागरी घरच्या घरीच साजरी करावी, असे ठरले. जाऊ दे.

...आणि कोजागरीचा हा दिवस उजाडला. मी मनाशीच काही ठरवले होते. कोजागरीची रात्र वाया गेली तरी दिवस सत्कारणी लावायचा असे मी ठरवलेच होते...

...सकाळी उठून ‘दूध आणण्यासाठी जाऊन येतो’ म्हणून सरळ घराबाहेर पडलो. चालत चालत मरीन ड्राइव्हवर गेलो. चालता चालता तेथे पडलेल्या पाण्याच्या (रिकाम्या) बाटल्या उचलाव्यात, आणि प्रचार, समाजकारण, आणि मॉर्निंगवॉक असे तीन पक्षी एका दगडात मारावेत, असा माझा बेत होता. 

शी जिनपिंगसाहेबांना भेटण्यापूर्वी महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या मोदीजींनी गोळा केल्या होत्या. गेले दोन दिवस ती छबी डोळ्यापुढून हलत नव्हती. निळ्याशार समुद्र किनारी प्लाष्टिकच्या बाटल्या जमा करीत फिरणारी ती काळ्या टीशर्टातील मूर्ती!! 
...मीसुद्धा काळा टीशर्ट आणि प्यांट परिधान करून मरिन ड्राइव्हला गेलो. पाहातो तो काय! एकही बाटली शिंची मिळेना!! हल्ली ती प्लॅस्टिकबंदी झाल्यामुळे ही भलतीच पंचाईत झाली आहे. जाऊ दे झाले!

मार्निंग वॉक घेऊन घरी आल्या आल्या पक्षासाठी ऑर्डर काढली : सर्वांनी लक्षात ठेवावे, आज कोजागरी आहे, कोणीही ‘शरद पौर्णिमा’ असा उल्लेख करता कामा नये! जो करील, त्याचा सरळ सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम करून पक्षातून निलंबित केले जाईल, याची नोंद घ्यावी. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com