ढिंग टांग : थाळ्या आणि टाळ्या!

Dhing-Tang
Dhing-Tang

कधी एकदा इलेक्‍शनचा उपचार पार पडतो आणि पोटभर जेवतो, असे झाले आहे. गेल्या फारा दिवसांत चाऱ्ही ठाव म्हणतात, तसे जेवलेलो नाही. वडापाववर किती दिवस काढणार? इलेक्‍शननंतर अवघ्या पाच आणि दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार असल्याने आम्ही आतुर (आणि भुकेले) आहो! पाच-दहा रुपयांत फुल्ल जेवण मिळण्याची ही सोय महाराष्ट्रात आधी कधीही नव्हती. त्यामुळे आम्ही फुल्ल जेवणाला मोताद झालो होतो. पण आता येणारे ‘आपले’ सरकार फुल्ल जेवणाची सोय करणार आहे, त्यामुळे आम्ही निश्‍चिंत आहो. तथापि, या थाळ्यांना छेद देणाऱ्या शंकाकुशंका काही (तुपाच्या) झारीतले शुक्राचार्य उपस्थित करताना दिसतात. हा बुद्धिभेद आहे. म्हणून आम्ही येथे काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांना (फ्रिक्‍वेंटली आस्क्‍ड क्‍वेश्‍चन्स) स्वच्छ उत्तरे देत आहो :

१. थाळी पाच रुपयांत मिळणार की दहा रुपयांत? एक काय ते सांगा. नंतर (गल्ल्यावर) भांडणे नकोत!
उत्तर : दोन्ही थाळ्या उपलब्ध होतील! काळजी नको!! यातली कमळाबाईच्या खाणावळीत मिळणारी थाळी पाच रुपयांची आहे, तर शिवआहार योजनेअंतर्गत दहा रुपयांत जेवण मिळणार आहे. कमळाबाईकडे लिमिटेड थाळी असेल, तर शिवआहार थाळीत फुल्ल जेवण आहे. फुल्ल जेवणाचा अर्थ थाळी समोर आल्यानंतरच कळेल! 

२. स्वीट डिशचे काय?
उत्तर : हल्ली जीवनशैलीमुळे भलभलते आजार होऊ लागले असून रक्‍तदाब, हृदयविकार, किडनीविकार आणि मधुमेह यांनी उच्छाद मांडला आहे. रक्‍तातील साखर याला कारणीभूत असते. म्हणून उपरोल्लेखित थाळ्यांमध्ये साखरयुक्‍त कुठलाही पदार्थ असणार नाही याची नोंद घ्यावी. साखर तब्बेतीला वाईट! 

३. याला काय अर्थय?
उत्तर : बराच आहे! परंतु, डोण्ट वरी! अवघ्या एक रुपयात आरोग्य चाचणी करून रक्‍तातील साखर तपासण्याचीही योजना म्हणूनच आणण्यात येत आहे. एक रुपयात शुगर टेस्ट करून नंतर दहा रुपयांची थाळी यथास्थित टेस्ट करता येईल!! एकूण खर्च फक्‍त फक्‍त फक्‍त अकरा रुपये!! बोला, अर्थ आहे की नाही?

४. एक रुपयात रक्‍तचाचणी करून नंतर पाच रुपयांची थाळी घेतली तर? 
उत्तर : पाच रुपयांची थाळी गिळायला एक रुपयात रक्‍त तपासून जाण्याची गरज नाही. कारण ही लिमिटेड थाळी आहे. याहून अधिक मागितल्यास (खाणावळीच्या) बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल.

५. दोन्ही थाळ्या एकत्रित मिळू शकतील का?
उत्तर : नाही! पंधरा रुपयांचे भाराभर अन्न गिळणे मुळात वाईट! माणसाने दिवसभर जेवतच राहायचे का? आहार नियमन नावाची गोष्ट आहे की नाही?

६. पाच रुपयांची थाळी महाराष्ट्रीयन आहे का?
उत्तर : नाही! ‘खातो नथी, खावा देतो नथी’ या तत्त्वावर बेतलेली ही गुजराथी थाळी आहे.

७. दहा रुपयांच्या थाळीत पापड मिळेल का?
उत्तर : बिर्याणी का नको? झापड मिळेल!

८. ही थाळी सर्वांना उपलब्ध आहे का?
उत्तर : होय! एक पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, सहा महिन्यांचे बॅंक स्टेटमेंट, गृहव्यवस्थापक (पक्षी : पत्नी अथवा घरातील अन्य कर्ता व्यक्‍ती) यांचे ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज रु. पाच वा दहा सोबत (गल्ल्यावर) जमा कराव्या लागतील. मगच जेवणाचे कुपन मिळेल, याची नोंद घ्यावी. 

९. त्यापेक्षा घरी जेवले तर काय होईल?
उत्तर : तोटा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com