ढिंग टांग : दोन प्र-वचने!

ब्रिटिश नंदी
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

ऐक सामान्य माणसा,
कां डोके फिरल्यासारखा वागतोस?
गोडबोल्या थापांना सहजी
 कसा भुलतोस?
रिकाम्या पोटाची आठवण नाही राहात?
रोजची पर्वड लक्षात नाही राहात?
ऐक माझ्या राजा,
आपल्या जुत्यात राहा
माझं ऐकशील तर सुखाच्या
दिशा आहेत दहा!

ऐक सामान्य माणसा,
कां डोके फिरल्यासारखा वागतोस?
गोडबोल्या थापांना सहजी
 कसा भुलतोस?
रिकाम्या पोटाची आठवण नाही राहात?
रोजची पर्वड लक्षात नाही राहात?
ऐक माझ्या राजा,
आपल्या जुत्यात राहा
माझं ऐकशील तर सुखाच्या
दिशा आहेत दहा!

तीनशे सत्तरचा आणि तुझा
मुळात संबंध काय?
पुलवामाच्या हल्ल्यात 
तुझे कोणी गेले काय?
चंद्रयानात बसून तू
स्वत: कुठे जाणारेस?
उपटसुंभांची फोलगाणी
किती काळ गाणारेस?
नसत्या गोष्टींचा बडिवार
करु नकोस असा
तोच आहे पारधी ज्याच्या
हातात आहे ससा

ससा म्हंजे तूच लेका
तुला कळत कसं नाही?
उंटाचा मुका घेण्यात
काही शहाणपण नाही!
सामान्य माणसा नीट ऐक,
कुंपणापर्यंतच तुझी धाव
इलेक्‍शनच्या काळात
फक्‍त तुझा ठरतो भाव
तीनशे सत्तरवर लिंबू पिळून
दोन घास खाणारेस?
सरहद्दीवर स्वत: जाऊन
बंदूक हाती घेणारेस?
चंद्र किंवा मंगळावर
शेतघर बांधणारेस?

तुला लेका, चिंता आहे
कोरभर भाकरीची
घामासोबत गळणाऱ्या
टेंपरवारी चाकरीची
आपण कुठे, ते कुठे
थोडं भान ठेव
इथवर कसे आलो,
याची जाण ठेव!

पळत्यापाठी नको पळू
बरड दळण नको दळू
गांजलेल्यांना नको छळू

गपगुमान रहा लेका
तू आपल्या जुत्यात
पुन्हा तीच चूक करुन
येशील पुन्हा गोत्यात!
......
ऐक, सामान्य माणसा, तू खरा हुशार
तुझ्यामुळेच झाले सारे गावगुंड पसार
तू आहेस राजा, आणि आम्ही तुझे सेवक
तुझ्यामुळे सुरु आहे आता आमची आवक
राजा बोले दळ हाले, त्याचाच शब्द चाले
राजाच्या मर्जीनेच आमचे मस्तक डुले

राजाला का कुणी सांगते
 जुत्यात रहा, जुत्यात?
राजाची का कुणी काढते
 अशी तशी औकात?
तीनशे सत्तरवर लिंबू पिळून
 खातं का कुणी?
पुलवामात गेलेले आपले
 नाहीत का कुणी?
अरे, तुझ्या पाठीमागे आहेत
 विज्ञानाचे पंख
रडगाणे गाणाऱ्यांना करु देत शंख

कोरभर भाकरीची राजाला नसते भ्रांत
टीचभर चाकरीची त्याला नाही खंत
थोडं भान ठेव, आणि
भविष्याकडे पहा,
तुझ्यासाठीच खुल्या झाल्या
आहेत दिशा दहा!

लक्ष्यापासून ढळू नको
हातपाय गाळू नको
रडकी कणीक मळू नको

ऐक सामान्य माणसा!
राजा आहेस, राजासारखा रहा
आजच्या भाकरी पलिकडे
उद्याचा चंद्र पहा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang