ढिंग टांग : गावला तेचा फावला!

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

दादा आज मोठ्या खुशीत होते. घरात गडबड होती. सकाळीच त्यांनी सैपाकघराच्या दिशेने हाक मारून ऑर्डर प्लेस केली होती.

‘आयकलात? शीएम येणारहत. तंबडो मानकापो गावटी कोंबो घाल!’’’
...येवजलेला घडात, तर दळिदार कित्याक बाधात? असा स्वत:लाच सवाल करत चरफडत घालवलेली गेली काही वर्षे मान झटकून दादांनी मनाबाहेर केली, आणि ते मनापासून शीएमची वाट बघू लागले. लांब्या गाडयेतून शीएम येणार. वाडयेतली पोरां गोंधळ घालणार. पण आज मात्र येवजलेले घडणार. मनासारखे होणार. इतके दिवस येरे दिसा नि भर रे पोटा असे चालले होते.

दादा आज मोठ्या खुशीत होते. घरात गडबड होती. सकाळीच त्यांनी सैपाकघराच्या दिशेने हाक मारून ऑर्डर प्लेस केली होती.

‘आयकलात? शीएम येणारहत. तंबडो मानकापो गावटी कोंबो घाल!’’’
...येवजलेला घडात, तर दळिदार कित्याक बाधात? असा स्वत:लाच सवाल करत चरफडत घालवलेली गेली काही वर्षे मान झटकून दादांनी मनाबाहेर केली, आणि ते मनापासून शीएमची वाट बघू लागले. लांब्या गाडयेतून शीएम येणार. वाडयेतली पोरां गोंधळ घालणार. पण आज मात्र येवजलेले घडणार. मनासारखे होणार. इतके दिवस येरे दिसा नि भर रे पोटा असे चालले होते.

भविष्यवाल्या पोपटानेही दिवाळीच्या आधी सारे चांगले होईल, असे सांगितले होते. पण गेली काही वर्षे असे अनेक भविष्यवाले पोपट आले नि गेले. सगळे लेकाचे भोंदू निघाले. मरू देत.

खरोखर, आज होईल, उद्या होईल म्हणताना दादांचे राजकारण आज सुफळ संपूर्ण होणार होते. रवळनाथाची कृपा झाली म्हणायचे. दादांनी मनोभावे हात जोडले. याजसाठी केला होता अट्‌टहास’ हा अभंग गुणगुणत दादांनी कार्यक्रमाच्या तयारीची उजळणी मनातल्या मनात केली. भाशाण करताना काय काय बोलायचे, काय बोलायचे नाही, याचे आडाखे ते बांधू लागले.

‘माझ्यासारखा सक्षम नेता असताना इतका घोळ घालायची काय गरज होती?’’ असे त्यांना सहज खडसावून विचारता आले असते. किंबहुना, तो तर दादांचा स्वभावधर्म. पण आता संयम हा गुण अंगी बाणवला पाहिजे. नाहीतर...

भाशाणात काय बोलायचे यापेक्षा काय बोलायचे नाही, हेच जास्त ठरवावे लागेल, हे त्यांच्या आता चांगले लक्षात आले होते. नितग्यालाही बजावून ठेवले पाहिजे, असे त्यांनी मनाशी ठरवून टाकले. मागल्या खेपेला एका रस्ते बांधणाऱ्या अभियंत्याला त्याने...जाव दे. 
लांब्या गाडयेतून शीएम आले...आले आणि गेले!
संयम पाळावा असा उपदेश करुन गेले. नितगो विचारत होता, ‘‘संयम म्हंजे काय?’’ 

तेका काय सांगुचा? साय कांगुचा? दादा स्वत:च विचारात पडले. संयम पाळणे म्हणजे एक प्रकारचे सातकापी घावणे करण्यासारखे असते, असे सांगावे? नकोच. शीएम येणार, हातावर गूळखोबरे देऊन जाणार, असे गेले कितीतरी दिवस चालले होते. 

अखेर गंगेत घोडे न्हाले!
सारा कार्यक्रम यथासांग पार पडल्यावर दादांनी घरी येऊन थोडी उसंत घेतली. गावला तेचा फावला, असा नेमस्त विचार करून त्यांनी आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवण्याचे मनोमन ठरवले.

उद्यापासून आपणच संघशाखेत जावे काय? गेलेले बरे...असा एक विचार त्यांच्या मनात घोळला. काही महिन्यांपूर्वीच खाकी पॅंट शिवायला टाकली होती. वेळ आली की ती चढवायची असा बेत होता. पण काही ना काही कारणाने राहून जात होते. पांढरा शर्टदेखील होताच. आता ‘आकाडता बापडा आणि सात माझी कापडा’ अशी स्थिती चालणार नाही. कोटबिट सगळे देऊन भांडी घेतलेली बरी, असे त्यांना क्षणभर वाटून गेले. म्हणतात ना, ‘नदीआधी व्हाणो काढलेल्यो बऱ्योऽऽ...’

कपड्यांच्या बदल्यात फक्‍त भांडीकुंडी नव्हेत, तर विवेक आणि संयमदेखील मिळेल, असा पोक्‍त विचार सुचल्यावर दादांना आणखी थोडे बरे वाटले. संघशाखेत गेले की विवेक, संयम आणि गांभीर्य यांचा आपापत: संस्कार होतो. नितग्या गेल्या आठवड्यात जाऊन आला. आता आपणही जाऊ. किंवा आपणच कणकवलीची शाखा भरवली तर? कल्पना चांगली आहे... चांगल्या कल्पनेने खुशीत आलेल्या दादांनी सैपाकघराच्या दिशेने तोंड करून दुसरी ऑर्डर प्लेस केली. ‘‘आयकलात? कोंबो कापू नुकात. पेज बरी तब्बेतीक!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang