ढिंग टांग : पाशिंजर!

Dhing-Tang
Dhing-Tang

नानासाहेब, जय महाराष्ट्र. आमच्या गुप्तचर खात्याच्या लोकांकडून आम्हाला असे समजले आहे की आपल्या (म्हंजे तुमच्या) घरात एक घुसखोर शिरला असून, माझ्या मते तो दरोडेखोर आहे. तो ज्या ज्या घरात तो शिरला, ते घर त्याने धुऊन काढल्याची उदाहरणे आहेत. स्वत:ला ‘कोकणचो सुपुत्र’ म्हणवून घेणाऱ्या या इसमाने साळसुदाचा आव आणून आपल्या (म्हंजे तुमच्या) घरात प्रवेश मिळवला असून, त्याच्याप्रती आपल्या (म्हंजे तुमच्या) मनात अनुकंपेची भावना निर्माण झाली, याचे आम्हाला राहून राहून आश्‍चर्य वाटते. सदर इसमाने आमच्या (म्हंजे आमच्याच!) घरात काही काळ असेच एकनिष्ठेचे नाटक करून ठाण मांडले होते. अखेर त्यांचे ढोंग उघडे पडल्याने त्यास आम्ही (म्हंजे आम्हीच) बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याच्यापासून सावध राहा, असे सांगण्यासाठी आम्ही अनेकदा आपल्याला (म्हंजे तुम्हाला) इशारे दिले होते. खाणाखुणा करून भानावर आणण्याचा प्रयत्नही केला होता. पण, तुम्ही दुर्लक्ष केलेत! याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील!

आपण एकदा एखाद्याला मित्र मानले की त्याची संपूर्ण काळजी घेतो. मित्राच्या घरात चोर शिरल्यास त्याला ‘शुक शुक’ करून सावध करणे, हे आमचे मित्रकर्तव्य आहे. ते आम्ही पार पाडतो आहो.

आमचे पत्र मिळताक्षणी सदर इसमास घराबाहेर घालवावे व भविष्यातील संकट टाळावे. अतएव होणाऱ्या उत्पातास आम्ही जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. कळावे. 
आपला. उधोजी.

प्राणप्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब-, शतप्रतिशत प्रणाम. आपले (म्हंजे तुमचे) पत्र मिळाले. आपला काही तरी गैरसमज झालेला दिसतो. आपण (म्हंजे तुम्ही) ज्याला दरोडेखोर म्हणताय ते माझ्या जुन्या ओळखीचे कोकणी सद्‌गृहस्थ आहेत. ‘कोकणची माणसे साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी’ हे जुने गीत तुम्हाला ठाऊक आहे का? सुप्रसिद्ध गीतकार ग. दि. माडगूळकरांना ते या सद्‌गृहस्थांकडे बघूनच सुचले, असे सांगितले जाते. थोडक्‍यात, ते कोकणातले एक साधेसुधे जंटलमन आहेत. त्यांना दोन गुणी मुलगे असून, दोघेही अत्यंत कर्तबगार आहेत! 

कोकणातल्या माणसाला मुंबईचे आकर्षण फार पूर्वीपासून आहे, हे आपण जाणताच. मुंबईचा चाकरमानी सणासुदीला कोकणात पळतो. त्याच्यासाठी आपल्याला तांबड्या यष्ट्यांची माळ कोकणाकडे सोडावी लागते. सदर सद्‌गृहस्थाला जादा बसगाडीचे रिझर्व्हेशन हवे होते. मी ते अनुकंपा तत्त्वावर दिले. चाकरमान्याला एवढी मदत करणे, हे आपले कर्तव्य नाही का?

दिवाळीला तो मनुष्य (कणकवलीत) आपल्या कुटुंबीयांसमवेत थोडका फराळ करील. मुंबईहून नेलेले चांगलेचुंगले कुटुंबीयांना देईल. फैनाबाज कपडे परिधान करील. आपल्यामुळे एखाद्याची दिवाळी चांगली जाणार असेल, तर एवढे करणे म्हंजे लई नव्हे.

सदर इसम हा चोर नाही, याची शहानिशा करून मगच त्याला आम्ही बसगाडीचे रिझर्व्हेशन मिळवून दिले. बराच काळ त्याला वेटिंग लिस्टवर ठेवले होते. अखेर सारे चंबुगबाळे घेऊन सदर सद्‌गृहस्थ आमच्या बस डेपोतच येऊन राहू लागला! तेथेच जेवू आणि झोपू लागला!! अशा परिस्थितीत काय करावे हे कळेना. डेपोच्या क्‍यांटीनवाल्याने उधारी थकल्याची तक्रार करून बिल हातात ठेवले, तेव्हा ताबडतोब दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीवर त्यांना बसवून दिले.

आपण टेन्शन घेऊ नये. सदर सद्‌गृहस्थ आपल्या घरी येणार नाहीत, किंवा त्यांचा उपद्रव होणार नाही, याची काळजी आम्ही पुरेपूर घेऊ. आपण निश्‍चिंत राहावे. 
आपला सख्खा मित्र. नाना.
ता. क. : तुमचे पत्र वाचून खूप बरे वाटले! आपल्या मित्राची केवढी ही काळजी!! तुमच्यासारखा मित्र ज्याला लाभला, तो जगातील सर्वांत भाग्यवान! म्हंजे मीच!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com