ढिंग टांग : खुर्चीचा किस्सा!

Dhing-Tang
Dhing-Tang

तसे पाहू गेल्यास आम्ही सामान्य माणूस आहो, पण सामान्य असलो तरी महाराष्ट्रातील सर्वांत महागड्या खुर्चीचे केअरटेकरदेखील आहो. आज आठवडा उलटून गेला. महाराष्ट्राच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांचे दालन रिकामेच आहे. खुर्चीही तश्‍शीच रिकामी आहे. तेथे कोण बसणार, हे अजूनही ठरलेले नाही. त्यामुळे आम्ही भयंकर चिंतेत आहो. रोज उठून आम्ही भक्‍तिभावाने दालनातील टेबल-खुर्च्या नीट (ओल्या फडक्‍याने) पुसून काढतो आहो. अलमाऱ्यांना पालिश करून ठेवतो आहो. खिडकीच्या कांचा स्वच्छ धुतो आहो. सकाळ-संध्याकाळ नित्यनेमें झाडू-पोछा चालला आहे. केअरटेकर म्हणून आमची ती ड्यूटीच आहे. एकदा ड्यूटी म्हटले की आम्ही ऐक्‍कत नाही. परंतु आम्ही इतकी जपणूक करूनदेखील दालन आजवर रिकामेच आहे. खुर्ची तशीच उभी आहे. (की बसली आहे?) महाराष्ट्रातील या सर्वांत महागड्या खुर्चीत कोण बसेल? हा खरा सवाल आहे. 

‘मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन!’ असे एकशेपाच वेळा सांगून मा. मु. नानासाहेब फडणवीस कुठल्यातरी दौऱ्यावर गेले आहेत. ‘मी पुन्हा येईतोवर खुर्ची नीट राखा,’ असे आम्हाला बजावून गेले आहेत. आत्मविश्‍वास इतका की जाताना प्रशस्त टेबलाचे खणदेखील त्यांनी रिकामे केलेले नाहीत. ‘खणातील सामान खोक्‍यात भरून देऊ का?’ असे आम्ही त्यांना विचारले होते. त्यावर मूठ उगारून ते चिडून म्हणाले होते : ‘‘ का? मी पुन्हा येईन! माहीतेय ना? मग?’’

सारांश, खणातील सामानाला आम्ही हात लावलेला नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी आणलेला जेवणाचा डबा (कोबीची भाजी आणि दोन फुलके) खणात अजूनी तसाच पडून आहे. न खाताच गेले, त्याला काय करणार? कोबीची भाजी असल्याने आम्हीही त्या डब्याला हात लावला नाही. परिणामी, खणातून आता कोबीचा विचित्र वास येत आहे...जाऊ दे.
तेवढ्यात दालनातील मेजावरचा काळा फोन वाजला. आम्ही उचलला, ‘‘शतप्रतिशत प्रणाम!‘’
‘‘जय महाराष्ट्र म्हणायचं? आलं का लक्षात!’’ पलीकडून आवाऽऽज आला.
‘‘कोण बोलतंय?’’ आम्हाला संशय आला.
‘‘मी शिवसेनेचा संपादक बोलतोय! आलं का लक्षात?’’ आवाऽऽज म्हणाला.
‘‘बोला!’’ आम्ही (घाबरून) म्हणालो.
 ‘‘तुम्ही सांभाळताय त्या खुर्चीवर मा. नानासाहेब आता बसणार नाहीत! दुसरेच कोणीतरी बसणार आहे... आलं का लक्षात?’’ आवाऽऽजाने खराखुरा आवाज लावल्याने आमचा आवाज कंप्लीट बसला.
‘‘द...द....द...दुसरं कोण बसणार आहे?’’ आम्ही.
‘‘ते तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही बऱ्या बोलानं खुर्चीचे पाय खालून किंचित कापून थोडी बुटकी करा! किमान पन्नास-पन्नास टक्‍के तरी कापा!’’ पलीकडून फोन बंद झाला. बातमीदाराने पाठवलेल्या बातमीला कात्री लावावी, इतक्‍या सहजतेने का खुर्चीचे संपादन करता येते? आम्ही गोंधळलो.
खुर्चीचे पाय कापले तर खुर्चीचा चौरंग नाही का होणार? अशा बुटक्‍या खुर्चीवर कोण बसणार आहे? आम्ही तातडीने मा. नानासाहेबांना फोन लावून ‘येताय ना?’ विचारून घेतले. त्यांनी ‘हे काय विचारणं झालं? एवढा दुष्काळी दौरा झाला की आलोच!’’ असा दिलासा त्यांनी दिला. आम्ही निर्धास्त झालो. परंतु ते थोडाच वेळ... कारण थोड्या वेळाने शिवसेनेच्या संपादकांचा पुन्हा फोन वाजला. म्हणाले, ‘‘कापले का पाय?’’ आमचे पाय पुन्हा लटपटू लागले. इतके की फोन हातातून गळून पडला आणि आम्हीच मटकन त्या खुर्चीत बसलो.

...खुर्चीत बसल्याबसल्या आम्हाला अतिशय गारगार वाटले. गारवा अंगावर आला की आम्हाला झापड येत्ये. तशी ती आली आणि आम्ही त्याच उंच पाठीच्या सुप्रसिद्ध खुर्चीवर बिनघोर घोरू लागलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com