ढिंग टांग : घेऊन टाक!

Dhing-Tang
Dhing-Tang

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे. वेळ : ‘आर या पार’ची.
प्रसंग : निकराचा. पात्रे : महाराष्ट्राचे एकमेव तारणहार मा. उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.

विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत शिरत) हाय देअर...मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (कानटोपी घालून झोपण्याच्या तयारीत) नोप! गुड नाइट!
विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवून जाब विचारत) आय हॅव अ क्‍वेश्‍चन!
उधोजीसाहेब : (समजूतदार आवाजात) तुझा प्रश्‍न ओळखलाय मी! पण उत्तरासाठी अजून दोन दिवस थांब रे बाबा! अठ्ठेचाळीस तासांत तुला उत्तर मिळेल!

विक्रमादित्य : (समजूतदारपणे) ओक्‍के! पण अठ्ठेचाळीस तासांत नक्‍की ना? (खिशातून मोबाइल काढत) थांबा! मी रिमाइंडर कॉलच लावतो!!
उधोजीसाहेब : (विचारमग्न अवस्थेत) महाराष्ट्रासाठी पुढले अठ्ठेचाळीस तास भयंकर महत्त्वाचे आहेत, बरं का! महाराष्ट्र जगणार की बुडणार, हे या दोन दिवसांत कळेल!! रात्र वैऱ्याची आहे, जागा रहा!!
विक्रमादित्य : (गोंधळून) तुम्ही तर ‘गुड नाइट’ म्हणालात! ‘जागा रहा’ काय?
उधोजीसाहेब : (घाईघाईने) तू झोपायला जा बरं!
विक्रमादित्य : पण मी सीएम होणार ना बॅब्स?
उधोजीसाहेब : (हात चोळत) तोच तर ट्राय चाललाय ना आपला! आपले राऊतकाका सकाळी नऊपासून जे कामाला लागतात, ते पार रात्रीपर्यंत! आपल्या मोहिमेला यश आलं तर मग...बघायला नको! काही ना काही तरी होईलच!

विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) सीएम झाल्यावर मी जागोजाग जिम उघडणार आहे! 
उधोजीसाहेब : (हबकून) जिम?
विक्रमादित्य : (टॉक असा आवाज करत) येस सर...यू हर्ड राइट! जिम! महाराष्ट्राला या घटकेला फिटनेसची गरज आहे!! शेताच्या बांधाबांधावर मी ओपन जिम बांधीन!!
उधोजीसाहेब : (घाईघाईने स्वत:शीच) तुझ्या संजयकाकांना फोन लावून सांगायला हवं की जरा सबुरीनंच घ्या म्हणून! 
विक्रमादित्य : (खांदे उडवत) व्हाय? आपल्या पक्षाचा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसायला हवाय ना? मग? आता सबुरी वगैरे काही नाही! आता ‘आर या पार’ची लढाई!! 
उधोजीसाहेब : (अजीजीनं) लढतोय ना म्हणूनच! पण हे शेताच्या बांधावर ओपन जिम वगैरे नको हां!!

विक्रमादित्य : (शांतपणे) आज देवेंद्र अंकलचा फोन आला होता मला!
उधोजीसाहेब : (धक्‍का बसून) घेतलास की काय? मी त्यांचे सोळा कॉल घेतलेले नाहीत!! पंधरा मेसेजेसला उत्तर दिलेलं नाही! ‘व्हॉट्‌सॲप’ तर ब्लॉकच करून टाकलं आहे!!
विक्रमादित्य : (आणखी शांतपणे) ते म्हणत होते की घ्या हवं तर मुख्यमंत्रिपद! पण भांडूबिंडू नका बुवा आमच्याशी!!
उधोजीसाहेब : (जबडा पाडून) आ...आ...आ....क..क्‍काहीतरी काय? खरंच सांगतोहेस?

विक्रमादित्य : (खांदे उडवत) मी कशाला खोटं सांगू? ते म्हणाले, मी तुझ्या बाबांना केव्हाचा फोन करतोय, की या, आणि मुख्यमंत्रिपद घेऊन जा’, तर ते साधा फोन उचलत नाहीत! याला मैत्री म्हणतात का?
उधोजीसाहेब : (दिमाग का दही अवस्थेत) असं कसं शक्‍यंय पण? इतकं सुखासुखी आपलं सिंहासन ते कशाला देतील?
विक्रमादित्य : (खुशीत) ते म्हणाले की दोन साबुदाणा वडे, एक प्लेट खिचडी आणि दोन प्लेट बटाटेवडे एवढ्याच्या बदल्यात मुख्यमंत्रिपद घेऊन जा!!
उधोजीसाहेब : (तोंडात बोट घालत) अरेच्चा! म्हणजे आपण उगीच भांडत बसलोय?
विक्रमादित्य : (विजयी सुरात) एवढंच नाही... ते म्हणाले, मुख्यमंत्रिपद काय, आख्खं मंत्रिमंडळ घेऊन जा! तुमचं तुम्हालाच लखलाभ!!...म्हंजे काय हो बॅब्स?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com