ढिंग टांग : दिल्लीच्या ऑड धुक्‍यात..!

Dhing-Tang
Dhing-Tang

राजधानी दिल्लीत भयंकर धुके आहे. माणूस माणसाला धडकला तरी आपण माणसाला धडकलो की झाडाला हे (दोघांनाही) कळत नाही. धिल्लीत दुके का? किल्लीत कुके धा? दिल्लीत धुके का? सवालाचे धुके मनात दाटल्याने आम्ही मार्ग शोधीत हिंडत होतो...

‘मनमनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्‍याचा हातास कसा लागावा?’ या सुप्रसिद्ध धुकेगीताच्या ओळी गुणगुणतच आम्ही दिल्लीत उतरलो. पाहतो तो सारीकडे धुक्‍याचे साम्राज्य! ‘इतना धुका क्‍यों है भाई?’ असे आम्ही एकदोघांना विचारून पाहिलेही. आसपासच्या भागात शेतातील चघाळा जाळल्यामुळे हे धुके पसरले असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील युती धडधडा पेटल्यामुळे झालेला धूर दिल्लीपर्यंत वाहून आल्याचेही आम्ही चुरचुरत्या कानांनी ऐकले होते. ‘फिफ्टी-फिफ्टी’ या शब्दाने महाराष्ट्रात सारे बिनसले. हा ‘फिफ्टी-फिफ्टी’ सत्तावाटपाचा शब्द कोणी (लेकाच्याने) दिला, याची ‘शहा’निशा करणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटले. हा असला शब्द ज्याने दिला, त्यास हुडकून काढुनु मुसक्‍या आवळुनु मुंबईत ‘मातोश्री’ दरबारी आणण्याची कामगिरी आमच्यावर होती. यासाठी आम्ही आधी मुंबईत जंग जंग पछाडले. आम्ही अनेकांना भेटलो, पण कोणीही उघड बोलेना, अखेर बरीच चवकशी केल्यानंतर आम्हाला ‘याचे उत्तर उत्तरेत दिल्लीलाच मिळू शकेल’ असे सांगण्यात आले. म्हणून आम्ही दिल्लीच्या धुक्‍यात शिरलो आणि वाट हरवलो.

धुके एवढे की डोळ्यांत बोट घातले तरी काही दिसेना. अर्थात, दिसत नाही म्हणून स्वत:च्या डोळ्यांत बोट घालणे चूकच. पण तरीही आम्ही घालून पाहिले. दिल्लीत सध्या ‘ऑड-इव्हन’ वाहतूक चालू आहे. आम्ही तसे जन्मजात ऑड आहो. त्यामुळे वाहतुकीला फार अडथळा आला नाही. कृष्ण मेनन मार्गावर आम्ही चालत असताना अचानक आणखी एक ऑड मनुष्य आम्हाला धडकला. आम्ही खाली पडता पडता राहिलो.

‘दिखता नहीं क्‍या?’’ आम्ही मुंबईकर लहेज्यात निषेधाचे उद्‌गार काढत प्यांट झटकली. किंवा प्यांट झटकत निषेधाचे उद्‌गार काढले, असे म्हटले तरी चालेल. 

‘सोरी ,सोरी...भाऊसाहेब! केटला धुम्मस छे,’’ ऑड मनुष्याने ओशाळून म्हटले. आम्ही निरखून पाहिले तो काय! ते साक्षात मोटाभाई होते.

‘मोटाभाई, धुम्मस सोडा, तिथं महाराष्ट्रात धुमशान चालू आहे..,’’ आम्ही.
‘‘शुऽऽऽ...सांतीसे वात करो ने! कुणी बघेल तर लोच्या होऊन ज्यानार!‘‘ इकडे तिकडे पाहात मोटाभाई चोरटेपणाने म्हणाले. 

‘महाराष्ट्रात युती धडधडा पेटली आहे! तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे!’’ आम्ही घाईघाईने म्हणालो. एकतर धुक्‍यात धड काही दिसत नव्हते. 
‘‘बोम्बे मधी येऊनशी मी शुं करू?’’ त्यांनी विचारले. आम्ही गांगरलो. कुठल्याही मराठी माणसाला शुं करू? अशी परवानगी विचारली तर तो काय करणार?

‘हे फिफ्टी-फिफ्टीचं प्रकर्ण कोणी सुरू केलं हो? जाम वैताग आलाय! झेपत नाही तर असली वचनं द्यायची कशाला?’’ आम्ही करवादलो. ‘‘काय झ्याला?’’ मोटाभाईंनी तलवारीसारखे हात करत विचारले. आम्ही पुन्हा गांगरलो. पण चूक आमचीच होती. धुके निवारण्यासाठी ते हातवारे करत असल्याचे लक्षात आले.

‘ये आग किसने लगाई?’’ आम्ही जाब विचारला. त्यांनी खांदे उडवले. ‘‘मने तो खबर नथी भाई! एनेज पूछीजो!’’ असे काहीसे पुटपुटत त्यांनी खांदे उडवले.

‘आम्हाला रोज त्या संजयाजी राऊतसाहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सी ऐकत बसावं लागतं! धुकं परवडलं, पण हे आवरा कुणीतरी आता!’’ आम्ही निर्वाणीच्या सुरात म्हणालो. 

...आम्ही ‘फिफ्टी-फिफ्टी’ सत्तावाटपवाला मनुष्य शोधत आहो, हे कळल्यावर मोटाभाई अचानक धुक्‍यात अदृश्‍य झाले. आम्हाला हे थोडेसे ऑडच वाटले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com