ढिंग टांग : कट्‌टी फू!

ब्रिटिश नंदी
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अतिशय जड अंत:करणाने हे पत्र लिहीत आहे. तुम्हाला मोजून छप्पन्न फोन केले. तुम्ही उचलले नाहीत. मेसेजसुद्धा मोजून दोनशे अठ्ठ्यांयशी पाठवले. नो रिप्लाय! प्रारंभी वाटले की निवडणूक आटोपल्या आटोपल्या शिरस्त्याप्रमाणे क्‍यामेरा उचलून परदेशी पळालात की काय? पण मग वाटले की आपला मित्र सांगितल्याशिवाय असा जाणार नाही. नक्‍की काय झाले आहे? काळजी वाटली.

मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अतिशय जड अंत:करणाने हे पत्र लिहीत आहे. तुम्हाला मोजून छप्पन्न फोन केले. तुम्ही उचलले नाहीत. मेसेजसुद्धा मोजून दोनशे अठ्ठ्यांयशी पाठवले. नो रिप्लाय! प्रारंभी वाटले की निवडणूक आटोपल्या आटोपल्या शिरस्त्याप्रमाणे क्‍यामेरा उचलून परदेशी पळालात की काय? पण मग वाटले की आपला मित्र सांगितल्याशिवाय असा जाणार नाही. नक्‍की काय झाले आहे? काळजी वाटली.

...नंतर कळले की तुम्ही माझ्यावर खूप खूप रागावला आहात! मी तुम्हाला खोट्यात पाडले म्हणून तुम्ही खूप घायाळ झालात असे कळले. तुमचा काही तरी गैरसमज झालेला आहे. मी तुम्हाला अजिबात खोट्यात पाडले नाही. फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्युला माझ्यासमोर ठरला नाही, इतकेच मी म्हणालो होतो. आमचे अध्यक्ष श्री. मोटाभाई यांनाही मी विचारून घेतले, की तुमचे (उधोजीसाहेबांशी) असे काही बोलणे झाले होते का? तर ते म्हणाले, ‘‘ना रे बाबा... एने मने बटाटावडानी प्लेट आपी. मी म्हणाला के मने सिंगलज वडा आपो! तमे एक खावो, हूं एक खावीश!!’’ त्यावर गालातल्या गालात हसूनशी त्यांनी विचारले, ‘’फिफ्टी-फिफ्टी?’’ तो मी म्हणाला के,‘‘एमने एमज!’’ बस्स, एवढाच डिस्कशन झाला...’’

...आपण तेव्हा एकत्र बसून बटाटेवडा खायला नको होता, असे आता वाटते आहे. परवाच तुमची पत्रकार परिषद ऐकली. हल्ली टीव्हीच्या पत्रकारांना आधी मराठीत जे बोलतो, तेच हिंदीमध्येही सांगावे लागते! महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांसाठी ही एक मोठीच कटकट होऊन बसलेली आहे. त्या परिषदेत तुम्हाला हिंदीत बोला’ असा आग्रह झाला तेव्हा तुम्ही म्हणालात की, ‘‘ मेरी मराठी तुमकू जितनी समझ में आयेगी, उतनी हिंदी नहीं आयेगी!’’ त्याक्षणी मी युरेका, युरेका असे ओरडलो. आपल्या बोलण्यांच्या वेळेला भाषेमुळे गैरसमज झाले, हे माझ्या तात्काळ लक्षात आले. 

मित्रवर्य, मनात किती काळ राग ठेवणार? घुस्सा थूँक दो, और मेरा फोन कृपा करके उचलो!! आप फोन नही उचलेंगे तो इस महाराष्ट्र का कारभार हाकने का शिवधनुष्य कैसा उचलेंगे? गेल्या तीस वर्षांच्या आपल्या मैत्रीत एवढी दरार कधीही आली नव्हती. तीसुद्धा छोट्याशा गैरसमजामुळे!! हे योग्य नाही, आपण एकत्र यायला हवे. तोच जनतेचा आदेश आहे. तेव्हा फोन उचलावा ही विनंती. कळावे. आपला... सदैव आपलाच. नानासाहेब फ.

टू हूम सो इट मे कन्सर्न-
सदर जोडलेले पत्र आमच्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या दर्शनी दाराच्या कडीला लावलेले आम्हाला सापडले. दुधाची पिशवी आणण्यासाठी आम्ही दार उघडण्यासाठी (डोळे चोळत) गेलो असताता दिसले. ते वाचले. या पत्राची सत्यासत्यता पडताळून पाहिलेली नाही. सदर पत्र फोरेन्सिकला पाठवून त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची आवश्‍यकता आहे. तसेच हस्ताक्षर तज्ज्ञांकडून सदर पत्रातील हस्ताक्षरही ओळखण्याची गरज आहे. इतके वाईट अक्षर वाचता येणे अशक्‍य आहे. यापेक्षा चांगले अक्षर आमच्या फ्यामिली डॉक्‍टरचेसुद्धा असेल!! परिणामी आम्ही हे पत्र वाचलेले नाही, वाचणारही नाही. 

तथापि, हे पत्र महाराष्ट्रातील सर्वांत खोटारड्या व्यक्‍तीचेच असणार, असा आमचा वहीम आहे. त्या व्यक्‍तीशी आम्ही कट्‌टी घेतली आहे. त्याचे बट्‌टीत रूपांतर होणार नाही, याची नोंद घ्यावी. 
कट्‌टी तर कट्‌टी, बालंबट्‌टी, 
बारा महिने बोलू नको! 
लिंबाचा पाला तोडू नको, 
आमच्या घरी येऊ नको!
पुन्हा पुन्हा फोन करू नको. 
कळावे, उधोजी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang