ढिंग टांग : शिकार!

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

भिंतीवरल्या ट्रॉफीजकडे
अभिमानाने नजर आणि
अक्‍कडबाज मिश्‍यांवर बोट
फिरवत शिकाऱ्याने सोडला
एक सुस्कारा आणि म्हणाला
मनाशीच : ‘बऱ्याच दिवसांत
मनासारखी मृगया झाली नाही!

भिंतीवरल्या ट्रॉफीजकडे
अभिमानाने नजर आणि
अक्‍कडबाज मिश्‍यांवर बोट
फिरवत शिकाऱ्याने सोडला
एक सुस्कारा आणि म्हणाला
मनाशीच : ‘बऱ्याच दिवसांत
मनासारखी मृगया झाली नाही!
रानातला पाचोळा तुडवला नाही,
भलाभक्‍कम कुटुंबकबिला
घेऊन चरणारा एखादा
मस्तवाल काळवीट 
लोळवला नाही, 
बंदुकीच्या एका गोळीत,
बारशिंगा पाडला नाही!
...या भिंतीवर नवी ट्रॉफी
येण्याची वेळ झाली आहे,
निघायला हवं!’

जीपगाडीत सामान भरून
शिकारी निघाला जंगलाकडे
एक तंबू, दोरखंडाची भेंडोळी,
काठ्यातुराट्या, पाण्याचा कॅन, 
आणि दोन बंदुका थेट 
कोअर झोनमध्ये जीप घुसवून 
शिकाऱ्याने परिचित रानाचा गंध 
भरुन घेतला फुफ्फुसात...
एक अर्जुनाचे दणकट झाड
निवडून सहकाऱ्याला आदेशिले:
‘‘याच झाडावर बांध रे मचाण!
काळवीट लोळवणार मी आज...’’

अक्‍कडबाज शिंगांचा
भरगच्च फऱ्याचा काळवीट
मस्तवालपणे हुंगत होता
एक खूर किंचित उचलून
अदमास घेत चरत होता...

सुंदर अंगप्रत्यंगाचे ते
डौलदार जनावर पाहून
शिकारी हरखला.
त्याने बंदूक ताणून धरला नेम!
तो गोळी झाडणार एवढ्यात...

अकस्मात जाळीतून 
ज्वाळेप्रमाणे उसळलेल्या
पिवळ्याधम्म व्याघ्राने 
एका झेपेत गाठला काळवीट, 
आणि लोळवला निमिषार्धात.
शिकारी चरफडला...
हातातली ट्रॉफी गेली..!
पेंढा भरून दिवाणखान्यात
लावण्याची वस्तू कुण्या
वाघाच्या पोटात गेली..!

चरफडत दातओठ खात
शिकाऱ्याने वाघाला वाहिल्या
मनातल्या मनात लाखोल्या.
पण, अहो आश्‍चर्यम!

....काळविटाला मानगुटीत धरून 
वाघाने आपली शिकार ओढत
ओढत आणली अखेर
शिकाऱ्याच्याच मचाणाखाली...

वर मान करून म्हणाला :
‘‘काय साहेब, कशापायी 
बंदूक ताणता तुमची?
तुमच्यासाठीच तर 
आणली आयती शिकार!
घ्या, आणि लावा बरं दिवाणखान्यात!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang

टॅग्स