ढिंग टांग : आता काय ठरलंय?

Dhing-Tang
Dhing-Tang

आम्ही उगीचच दाराच्या चौकटीवर आडवा पाय टाकून उभे होतो. तेवढ्यात फोन वाजला. आम्ही धावत जाऊन उचलला : ‘‘जय महाराष्ट्र, कोन बोलरेला हय?’’ (हे आम्ही.)
‘‘हलो, मातोश्री?’’ ‘ते’!
‘‘बोला!’’ आम्ही.
‘‘कांग्रेसच्या हायकमांडचा निरोप आहे की मा. साहेबांनी तातडीने हॉटेल ट्रायडंटला भेटायला यावे!’’ पलीकडून आवाज आला. आवाजात कमांड होती, पण ती तितकीशी हाय नव्हती.
‘‘ते जेवतायत...नंतर फोन करा!’’ गुरमीत आम्ही. गुरमीत हे आमचे नाव नाही. गुर्मीत बोललो एवढेच.
‘‘जेवत असतील तर हात धुवायला इकडे या, म्हणावं!’’ एवढे बोलून फोन कट करण्यात आला. आम्ही तातडीने मा. साहेबांना निरोप द्यायला गेलो. ते नेमके तेव्हा चमच्याने (सूप) भुरकत होते. हात धुण्याचा प्रश्‍नच नव्हता. मग आम्ही तांतडीने निघालो. गाडीत आम्ही चालकाच्या शेजारी बसलो. चालकाला सांगितले. ‘‘हॉटेल ट्रायडंट!’’ कारण तो मालाडच्या दिशेने ‘रिट्रीट’कडे सवयीने निघाला होता. यू-टर्न मारून आम्ही (यू टर्न...प्लीज नोट!) ‘ट्रायडंट’कडे वळलो. गाडीत मागल्या सीटवर बसून साहेब विचारमग्न मुद्रेने रस्त्यावरील गंमत पाहत होते. ‘‘कसला विचार करता साहेब?’’ आम्ही.
‘‘अर्थात माझ्या महाराष्ट्राचा...माझ्या उद्‌ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांचा!,’’ ते ताडकन उत्तरले. आम्ही सद्‌गदित झालो. हल्ली शेतकऱ्यांसाठी इतके कोण करते? हे सारे शेतकऱ्यांसाठी चालू आहे हे कळून आमच्या डोळ्यांत पाणीच आले. अवकाळी पावसाच्या संकटाने पिचलेल्या शेतकऱ्यांचा हा आधारस्तंभ किती धडपडतो आहे, याची जाणीव किती शेतकऱ्यांना असेल? आम्ही रुमाल काढून डोळे (आणि नाकही) पुसले. गेले वीस दिवस महाराष्ट्रात सरकार नाही. त्या खुर्चीत कोण बसणार? हा ज्वलंत सवाल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पुढे आहे. त्यांच्यासाठीच मा. साहेबांनी प्रचंड लढा उभारुन ‘खोटारड्यां’ची गोची केली आहे. त्यांच्या लढ्याला येश येवो! आमचीही विचारांची तंद्री लागली...
‘‘ते जाऊ द्या. ही हायकमांड नेमकी कशी दिसते?’’ साहेबांनी विचारले. आम्ही चमकलो. हा सवाल अवघड होता. ‘ब्रेकिंग न्यूज’चा पाऊस पाडणारी माध्यमांमधली ‘सूत्रे’ नेमकी कशी दिसतात? या सूत्रांना कुणी पाहिले आहे? तद्वतच हायकमांडचे असते. ‘‘हायकमांड ही फार पावरफुल गोष्ट असते....’’ हातातला वीस रुपयेवाला नारळ दाखवावा, तसा पंजा हलवत आम्ही हायकमांडचे वर्णन करू लागलो, ’‘ ते फार वरिष्ठ असतात आणि निर्णय घेतात सारखे!’’ त्यावर त्रासिक मुद्रा करून साहेब पुन्हा बाहेर बघू लागले. ट्रायडंट हॉटेलात हायकमांड येऊन बसली असून, तिला भेटायला जाताना काय न्यावे, अशीही एक छोटीशी चर्चा आमच्यात घडली. शेवटी एखादा पुष्पगुच्छच द्यावा, असे ठरले. ‘‘हायकमांड आपलं ऐकेल ना?’’ काहीशा साशंकतेने साहेबांनी विचारले. ‘‘अर्थात! आपली बाजू सत्याची आहे...’’ आम्ही म्हणालो. सच परेशान हो सकता है, पराजित नहीं’ हे वाक्‍य आम्ही उच्चारणार होतो. पण नाही उच्चारले. ...यथावकाश आम्ही ‘ट्रायडंट’वर पोचलो. ताडताड चालत मा. साहेब हायकमांडच्या खोलीत गेले. हायकमांडशी साहेबांची सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. बैठक आटोपली. साहेब बाहेर पडले. गाडीत येऊन बसले. गाडी पुन्हा ‘मातोश्री’कडे निघाली. साहेबांची मुद्रा विचारमग्न होती. न राहवून आम्ही त्यांना विचारले...
‘‘मग काय म्हणाली हायकमांड?’’ 
त्यावर साहेबांनी चुळबुळ केली. मग खांदे उडवून मान हलवली. मग एवढंच म्हणाले की- ‘‘हायकमांड म्हणाली की एवढंच सांगायचं की आमचं ठरलंय!’’
...आम्ही कपाळाला हात लावला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com