ढिंग टांग : वेट अँड वॉच!

Dhing-Tang
Dhing-Tang

माजी मा. मु. नानासाहेब खुर्चीत डोळे मिटून पडलेले आणि आम्ही त्यांच्या पायाशी बसून...असा आठवडा गेला. बसून बसून आमच्या पायाला रग लागली होती, पण मा. नानासाहेबांची तंद्रा ढळेना, मौन संपेना! आमचा धीर सुटला...
‘‘नानासाहेब...अहो, नानासाहेब!’’ आम्ही.
‘‘ऊं?’’ नानासाहेबांनी प्रतिसाद दिला. आम्हाला हायसे वाटले. हल्ली ते फारसे बोलत नाहीत. खोलीच्या छताकडे टक लावून बसून असतात. त्यांच्या ‘ऊं?’ या उद्‌गारात महाराष्ट्राची वेदना दडली होती, असे आम्हाला वाटले.
‘‘तुम्ही गप्प का?’’ कळकळीने आम्ही. बोला हो काहीतरी! बोला, बोला ना!!
‘‘ऊं?’’ पुन्हा नानासाहेब म्हणाले. आमचा धीर आणखीनच खचला.
‘‘सामान परत आणलं?’’ आम्ही विचारले.
‘‘कुठलं?’’ दचकून नानासाहेबांनी प्रतिप्रश्‍न केला.
‘‘मंत्रालयातील सहाव्या मजल्याच्या हपिसातलं हो!’’ आम्ही खुलासा केला. उत्तरादाखल नानासाहेबांनी गपकन डोळे मिटले. एक आवंढा गिळला. नाकाचा शेंडा खसाखसा चोळून ते पुन्हा आढ्याकडे पाहू लागले.
‘‘आपण काय करायचं?’’ बऱ्याच मोठ्या शांततेनंतर आम्ही विचारले.
‘‘काय करायचं?’’ नानासाहेबांनी आम्हाला प्रतिप्रश्‍न केला की स्वत:लाच हे कळले नाही. दोन्ही असावे!
‘‘मी पुन्हा येईन, असं तुम्ही जनतेला सांगितलं होतं!’’ आम्ही आठवण करून दिली.
‘‘तारीख नव्हती सांगितली!’’ नानासाहेबांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात युक्‍तिवाद केला. हे बाकी खरे होते. उसने घेतलेले पैसे लौकरच परत करीन, असा वायदा करून आम्ही ते कित्येकदा बुडवले आहेत.  
‘‘तारीख सांगाल का?’’ आम्ही हेका सोडला नाही. उसने देणारा मानगुटीवर बसला की काहीतरी नवा वायदा करावा लागतो, हा सिद्धांत आठवून आम्ही तारीख विचारली.
‘‘वेट अँण्ड वॉच!’’ नानासाहेब डोळे मिटूनच म्हणाले.
‘‘कधीपर्यंत वेट आणि काय काय वॉच?’’ आम्ही मुद्दा धरूनच ठेवला होता. कारण हा वेट आणि वॉचचा खेळ आता असह्य झाला होता. माणसाने कसे सारे पारदर्शक ठेवावे. 
‘‘सत्ता आपलीच येणार!’’ नानासाहेबांनी दिलासा दिला.
‘‘कठीण आहे!’’ आम्ही नकारार्थी मान हलवत, ओठांचा चंबू करत उत्तरलो. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. पुन्हा येणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, हे दिसत होते. त्यात सत्ता आपलीच येणार ही भविष्यवाणी कशी खरी मानावी?
‘‘काय?’’ नानासाहेब बहुधा पुन्हा तंद्रीत गेले असावेत.
‘‘आपल्या मित्रपक्षाने विरोधकांच्या गोटात राजरोज शिरून ठाण मांडले आहे! त्यांचेच सरकार येणार, अशी सूत्रांची माहिती आहे,’’ आम्ही हिरिरीने बोलू लागलो. माणसाने काही मनात ठेवू नये. मनात काहीही ठेवले की ते कुजते!
‘‘त्यांना म्हणावे, असले खिचडी सरकार चालणार नाही! आमच्यासोबत किंवा आमचीच सत्ता येऊ शकते!’’ नानासाहेब ठामपणे म्हणाले. त्यांच्या ठामपणाचे आम्हाला कौतुक वाटले.
‘‘चालेल हो! त्यात काय कठीण आहे?’’ आम्ही प्रतिवाद केला. ‘‘तुम्ही आमच्या बाजूचे आहात की त्यांच्या?’’ खवळून नानासाहेबांनी ताडकन आम्हाला जाब विचारला.
‘‘आम्ही अर्थात तुमचेच! त्यात संदेह कसला?’’ आम्ही गुळमुळीतपणे म्हणालो. 
‘‘मग ऐका! सरकार आपलंच येणार!’’ नानासाहेबांनी निक्षून सांगितले. 
‘‘कशाच्या जोरावर?’’ आम्ही.
‘‘मी सांगतो म्हणून! ’’ नानासाहेबांनी ग्वाही दिली. त्यांच्या स्वप्नाळू डोळ्यांत निराळाच आत्मविश्‍वास झळकत होता. 
‘‘पुन्हा महायुतीचं सरकार येणार म्हणताय?’’ हरखून गेलेले आम्ही.
‘‘जस्ट वेट अँड वॉच!’’ एवढे बोलून माजी व काळजीवाहू मा. मु. नानासाहेबांनी पुन्हा खुर्चीतल्या खुर्चीत डोळे मिटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com