ढिंग टांग : जपानी यौवनेचे थ्रीडी चित्र!

ब्रिटिश नंदी
सोमवार, 2 डिसेंबर 2019

थोडे अंतर राखून जेव्हा
कुणी पाहतो टक्‍क निरंतर
फोटोमधली सुबक ठेंगणी
हसते निर्मळ आणि शुभंकर

सुबक ठाकडी, भिंगर भिवरी,
चप्पटनाकी, बावरडोळी
खुले निमंत्रण देते निसदिन
गालावरची खळी खळी!

थोडे अंतर राखून जेव्हा
कुणी पाहतो टक्‍क निरंतर
फोटोमधली सुबक ठेंगणी
हसते निर्मळ आणि शुभंकर

सुबक ठाकडी, भिंगर भिवरी,
चप्पटनाकी, बावरडोळी
खुले निमंत्रण देते निसदिन
गालावरची खळी खळी!

कोपऱ्यातल्या मेजावरती
उभी असे ती फोटोफ्रेम
समोर बघता धूसर होते,
कोनामधुनी हसते प्रेम!

तिचे धिटुकले हास्य कोवळे
घायाळाला म्हणते सावर
कटाक्षातले तिच्या निमंत्रण
मनास म्हणते आवर आवर!
सहा बाय अन्‌ पाच इंच
ते गूढ कोंदले फ्रेमीत
कोन बदलता दृश्‍य बदलते
हेच तयाचे इंगीत!

समोर आहे निश्‍चळ चेहरा
अन्‌ रेघांचे अस्फुट जाळे
डाव्या कोनातून पाहता
हास्यमुखाचे जिव्व्हाळे!

उजवीकडुनी जरा पाहता
चप्पटनाकी उडवी भिवई
हळूच मारते डोळा आणिक
करिते थ्रीडी नवलाई!

डोळे घालीत पुन्हा हांसते
फोटोमधली ती तरुणी!
असेच होते कोनामधले
गारुड अव्वल जप्पानी!

जप्पानी त्या रमलेलाही
नाही कसली दरकार
उजवीकडल्या महानुभावा
म्हणते ‘अमुचे सरकार’!

अशीच असते सत्तादेवी
उजव्या बाजूस झुकलेली
डावीकडच्या बाकावरती
आणि जराशी रुसलेली

या बाकावर बसलेल्यांना
त्या बाकावर जाताना
झुकते किंवा रुसते सत्ता
तख्तापालट होताना

कोनाची ही गंमत न्यारी
या खेळाचे मुहूर्त मंगल
फोटोमधली सत्ता हसते
जसा बदलतो अपुला अँगल!

या बाकावर बसले होते,
त्या बाकावर जाऊन बसले
नियती म्हणते डाव बदलला,
आणि कुणाचे नशीब हसले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang