ढिंग टांग : (बु) लेट पाशिंजर!

Dhing-Tang
Dhing-Tang

दादू : (आत्मीयतेने फोन लावत) म्यांव म्यांव!
सदू : (आवाज ओळखून) महाराष्ट्रातले वाघ आता अशी गर्जना करायला लागले वाटतं!!
दादू : (खवळून) सद्या, तोंड आवर! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतोयस तू!
सदू : (चतुराईनं) अभिनंदन सीएमसाहेब!
दादू : (नरमून) थॅंक्‍यू, थॅंक्‍यू! 
सदू : (आठवण करून देत) मी तुमच्या शपथविधीला आलो होतो, सीएमसाहेब!
दादू : (गडबडीनं) अरेच्चा, हो का? तिथं इतकी गर्दी झाली होती की कोणाकोणाला भेटलो तेच आठवत नाहीए! पण तू आलास, बरं वाटलं!!
सदू : (सद्‌गदित होत) आपल्या घराण्यातला कुणी महाराष्ट्राचा सीएम होईल, असं दुपारच्या स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं रे दादूराया! तू झालास! घराण्याचं नाव राखलंस!
दादू : (थोरलेपणाच्या भावनेने) वेळीच आपली टाळी झाली असती, तर आज माझ्याजागी तू असतास, सदूराया!
सदू : (सुस्कारा सोडत) ते जाऊ दे आता! आता चांगलं काम करुन दाखव म्हंजे झालं!! महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे!!
दादू : (स्वप्नाळूपणे) महाराष्ट्राचं नंदनवन नाही केलं, तर मी नावाचा दादू नव्हे!! बघशीलच तू!!
सदू : (सल्ला देत) माझं नाशिकचं विकासाचं मॉडेल बघून घ्या! नाशिक धर्तीवर महाराष्ट्रभर बगिचे, कारंजी वगैरे उभारा! महाराष्ट्राचं नंदनवन सहज होईल!!
दादू : (थोडंसं खाकरून) सीरिअसली सांगतोयस?
सदू : (चमकून) अर्थात! 
दादू : (शिताफीने विषय बदलत) महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय मी घेतला तो आरेवनातल्या मेट्रोच्या कारशेडचा!
सदू : (च्याट पडत) म्हंजे? आता मुंबईकरांना मेट्रो नाही मिळणार?
दादू : (खुलासा करत) मिळेल रे! फक्‍त कारशेडला स्थगिती दिली आहे मी, मेट्रोला नाही!
सदू : (गोंधळून जात) म्हंजे हॉटेल आहे, भटारखाना नाही...असंच ना?
दादू : (दात ओठ खात) एका रात्रीत झाडं कापली या लोकांनी तिथं! कुठं फेडतील पापं? ती झाडं रातोरात पुन्हा लावायची ऑर्डर काढतोय आता!
सदू : (कौतुक करत) शाब्बास! आता तिथं बाग करा, बाग! चांगली फुलझाडं लावा! एखादं कारंज उभं करा!!
दादू : (कंटाळून) जिथे तिथे बागा कशा करता येतील, सदूराया? तुला आपल्या बागाच दिसतात!! महाराष्ट्रातला शेतकरी आज बांधावर उभा राहून माझी वाट पाहातोय! 
सदू : (खुंटा हलवून बळकट करण्याच्या नादात) मेट्रोचं राहू दे! त्या बुलेट ट्रेनचा खुळखुळा परत पाठवा! तर मानीन तुला!!
दादू : (अभिमानानं) या दादूला असा तसा समजू नकोस! बुलेट ट्रेनलासुद्धा मी लाल सिग्नल दाखवलाय सध्या!
सदू : (हर्षभराने) खरंच? मग खरोखर मानलं पाहिजे तुला! (सात्विक संतापानं) कशाला हवी आहे ती अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन? ढोकळे काय दादरमध्ये मिळत नाहीत? उगीच नसता खर्च! बुलेट ट्रेन रद्द झाली तर माझा जाहीर पाठिंबा राहील तुला!
दादू : (गुळमुळीत) बुलेट ट्रेन रद्द नाही, पण लेट होईल हे नक्‍की! पण खरंच तू मला पाठिंबा देशील?
सदू : (वचन देत) अर्थात! एकदा आपला शब्द गेला, म्हंजे गेला! काँग्रेसवाल्यांना विचार! एक नवा पैसा न घेता जाहीर प्रचारसभा घेऊन निवडून आणलंय मी त्यांना! मी नसतो, तर हे काँग्रेसवाले नसते आणि पर्यायानं आज तिथं त्या खुर्चीत तू नसतास, समजलं?
दादू : (कृतज्ञतेनं) थॅंक्‍यू सदूराया! नाही त्या बुलेट ट्रेनची पाशिंजर केली, तर नावाचा दादू नाही! जय महाराष्ट्र!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com