ढिंग टांग : कर्जबाजारी!

ब्रिटिश नंदी
04.57 AM

महाराष्ट्रावर तब्बल सहा लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे कळल्यावर सीएमसाहेब हबकले. त्यांनी आकडा पुन्हा पुन्हा वाचला. केवढी ही शून्ये!! शेजारी त्यांचा कडवट, एकनिष्ठ पीए मि. एमएन (साहेब) उभे होते.

महाराष्ट्रावर तब्बल सहा लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे कळल्यावर सीएमसाहेब हबकले. त्यांनी आकडा पुन्हा पुन्हा वाचला. केवढी ही शून्ये!! शेजारी त्यांचा कडवट, एकनिष्ठ पीए मि. एमएन (साहेब) उभे होते. 

‘‘एमएन, हा आकडा वाचा बरं जरा!’’ सीएमसाहेबांनी फर्मावले.
‘‘सहा लाख एकाहत्तर हजार पाचशे बेचाळीस कोटी व पैसे एकोणपन्नास फक्‍त!’’ घडाघडा पाढा म्हटल्यागत एमेनसाहेबांनी आकडा वाचला. सीएमसाहेबांना आपल्या पीएचे कौतुक वाटले. पीए असावा तर असा! कित्तीही मोठ्ठे आकडे लीलया वाचून काढणारा!! मनातले कौतुक सीएमसाहेबांनी ओठांवर येऊ दिले नाही. ते गंभीरच राहिले.
‘‘राज्यावर एवढं कर्ज आहे, कसं होणार?’’ सीएमसाहेब काळजीत पडले. काळजीत पडले की ते गालावर एक बोट ठेवून उरलेली बोटे हनुवटीखाली ठेवून चिंताग्रस्त पोजमध्ये थोडावेळ बसतात. त्या वेळी ते फार्फार रुबाबदार दिसतात, असे कोणीतरी त्यांना सांगून ठेवले आहे.

‘‘माणसी चौपन्न हजार रुपये कर्ज आहे, साहेब!’’ पीएने पुरवणी माहिती पुरवली. या माणसाला लोकांच्या माथ्यावर कर्जाचे बोजे किती, हेसुद्धा माहिती आहे? सीएमसाहेबांना नवल वाटले. काय एकेका माणसाचे जनरल नालेज असते!!
‘‘काय हा कर्जबाजारीपणा? छे..!’ सीएमसाहेबांनी उद्वेगाने मान हलवली. अशी कर्जे काढून का कुणी कारभार करते? गेल्या सरकारने भलतेच उद्योग करून ठेवल्याचा साहेबांच्या मनातला संशय आणखी बळावला. एवढं कर्ज काढून हे लोक मेट्रोबिट्रो, बुलेटबिलेट ट्रेनबिन काढायला निघाले होते! हे म्हंजे उसनवारी करून पिझ्झा खाण्यापैकी आहे! 

‘‘कर्जबाजारीपणात आपलं राज्य एक नंबर आहे, साहेब! नुसतं दिवसाचं व्याज ४८० कोटी रुपये भरतोय आपण, साहेब,’’ पीए म्हणाला. या माणसाच्या मुखातून आकडेच बाहेर पडताहेत. याला गप्प कसे करावे? सीएमसाहेबांनी एक आवंढा गिळला. ‘‘आता हे कर्ज फेडणार कोण?’’ सीएमसाहेबांनी मान हलवत विचारले.
‘‘कोण म्हंजे? तुम्हीच...साहेब!’’ पीएच्या या उद्‌गारावर सीएमसाहेबांना खरे तर हंबरडाच फोडायचा होता. पण महत्प्रयासाने त्यांनी स्वत:ला आवरले.

‘‘म...म....मी फा केडू? आपलं...मी का फेडू?’’ बोज्याने घुसमटलेला हमाल ‘कुटंशी ठिवू बोज्या?’ असे कसेबसे म्हणतो, तशा चिरक्‍या आवाजात सीएमसाहेबांनी प्रतिसवाल केला. ‘‘का म्हंजे? तुम्ही सीएम आहात! सीएमनीच फेडायचं असतं एवढं कर्ज!!’’ पीएने त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. कुठून फशी पडलो आणि या खुर्चीत येऊन बसलो असे सीएमसाहेबांना झाले. एक ना एक दिवस आपल्या पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवून दाखवीन, असे वचन सीएमसाहेबांनी आपल्या तीर्थरूपांना दिले होते. कार्यकर्ताच बरा होता, आपण उगीच घोड्यावर बसलो, असे त्यांना क्षणभर वाटून गेले.

‘‘गेलेल्या सरकारनं हा सगळा घोळ करून ठेवला आहे! सगळ्या विकासकामांना ताबडतोब स्थगिती द्या! मी आदेश देईपर्यंत एक रुपयाही खर्च करायचा नाही, म्हणावं! बुलेट ट्रेन करताहेत लेकाचे! इथं दातावर मारायला दिडकी नाही आणि चाल्लेत सबका विकास करायला! आम्ही काय नंतर येऊन तुमची कर्जं फेडायची? नॉन्सेन्स!’’ संतापाने सीएमसाहेबांच्या कपाळाची शीर थडथडू लागली.

‘‘सहा-सात लाख कोटींच्या कर्जाला का घाबरताय, साहेब!’’ पीए सहज सुरात म्हणाले. ‘‘या कर्जावर आता उपाय काय?’’ खोल आवाजात सीएमसाहेबांनी विचारले.
‘‘आणखी कर्ज करून ठेवणे, हा एकमेव उपाय आहे, साहेब!’’ पीए एमेनसाहेब शांतपणे म्हणाले, ‘‘सगळी सरकारं असंच करतात! तुम्हीही करा!!’’
...मग सीएमसाहेब खुदकन हसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang