ढिंग टांग : दालने आणि बंगले!

Dhing-Tang
Dhing-Tang

खात्याचा कारभार उत्तम हांकायचा असेल, तर बंगला आणि दालन या गोष्टी बेस्ट असणे अनिवार्य असते. ज्या मंत्र्याचे दालन गदळ, त्याचा कारभारही गहाळ राहतो. ज्या मंत्र्याचा बंगला असा-तसाच, त्याला यशदेखील कमीच मिळते. मंत्री असो किंवा संत्री, शेवटी माणसाला कुठेतरी सेटल व्हायचे असते, हे लोकशाहीतले एक सत्य आहे. लोकांची सेवा करणाऱ्या साध्याशा लोकसेवकाला नामदार झाले की दालन, बंगला असे मिळून सेटल होणे आवश्‍यक असते. सेटलमेंट नसेल तर राजकारण कसे व्हावे? लोकसेवा कशी व्हावी? 

सरकार बदलले की आधी दालने, मग बंगले आणि नंतर मंत्रीच बदलतो. राज्य बदलते, असे नव्हे... गेल्या खेपेला आपला बंगला काय सुंदर होता! स्वच्छ उजेड. छानशी बाग, पंचरंगी पोपट वगैरे. पण, नंतर साडेसातीचा फेराच जणू सुरू झाला. मलबार हिलवरून थेट भायखळ्याला जावे लागले...

....नामदार बाप्पा अंथरुणात ताडकन उठून बसले. मनात विचारांचे चक्र फिरतच राहिले. 

आता घाई केली पाहिजे! मंत्रिपदाची शपथ घेतानाच त्यांनी ठरवले होते, की खाते कुठलेही असो, उत्तम दालन मिळाले पाहिजे. ते सर्वांत आधी मिळविले पाहिजे. घाईघाईने गळ्याभोवती मफलर गुंडाळून निघालेच. गेल्या सरकारातील महसूलमंत्री दादासाहेब पाटलांनी आपले दालन एकदम चकाचक करून घेतलेले त्यांनी बघून ठेवले होते. शपथविधीच्या वेळेलाच त्यांनी ठरवले होते, की आपल्या नव्या कारकिर्दीसाठी हेच दालन हवे!! नवे दालन भलतेच टॉप आहे. काही इंटेरिअर करायला नको! रेडीमेड पझेशन!! प्रशस्त चेंबर... लागूनच अँटिचेंबर... दर्शनी भागात उत्तम सजवलेले अभ्यागतांचे दालन. अगदी सुरक्षारक्षकांसाठीही उभे राहायला परफेक्‍ट सोय. आणखी काय हवं?

बघता बघता बाप्पांनी मंत्रालय गाठून दालनाकडे धाव घेतली. चपळाईने आत शिरून खुर्चीत बसले की झाले! खुर्चीवर आपला मफलर काढून सीट रिझर्व केली की काम फत्ते! मुंबईत लोकलगाडीत सीटवर रुमाल टाकून रिझर्वेशन करतात. तसेच हे! बाप्पांनी धाडकन दार ढकलून दालनात प्रवेश केला. समोरचे दृश्‍य पाहून ते स्तंभित झाले! खुर्चीवर आरामशीर बसून गोल गोल फिरणारे मा. नामदार शिंदेसाहेब दिसले आणि त्यांच्या भुजांतील बळच ओसरले. 

‘मी पहाटेपासूनच आलोय इथं! घ्या, चहा घेता?’’ शिंदेसाहेबांनी विजयी मुद्रेने चहाचा आग्रह केला. चहाला ‘नको’ असे सांगून बाप्पांनी जड पावलांनी दुसऱ्या एका दालनात जाऊन बसकण मारली. छे, हातात आलेले दालन थोडक्‍यासाठी गेले. पुढल्या वेळेला थोडा अधिक सावधपणा दाखवायला पाहिजे!

दालनाचे वाटप होईपर्यंत बंगलेही ॲलॉट होत होते. आपल्याला जुनाच ‘रामटेक’ बंगला मिळावा, यासाठी बाप्पांनी आधीपासूनच फिल्डिंग लावून ठेवली होती. पण, विषाची परीक्षा नको म्हणून बाप्पा तडक ‘रामटेक’वर गेले. तिथे मंत्र्यांचा एक जथ्थाच घुटमळत होता. ‘बंगल्याची किल्ली कोणाकडे आहे?’ अशी सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालत काही मंत्री उभे होते.

नामदार राऊतसाहेब हातात चाव्यांचा जुडगा खुळखुळवत हसत हसत चालले होते.
‘‘तुम्ही का हसताय?’’ बाप्पांनी काहीश्‍या नाराजीने विचारले.

‘‘मला ‘चित्रकूट’ मिळाला होता, पण मी म्हटलं, आपल्याला ‘पर्णकुटी’ बरी! निघालोय तिथंच!’’ मा. राऊतसाहेब म्हणाले.
बाप्पांनी दुर्लक्ष करत कुडत्याच्या खिशात हात घालून चावी बाहेर काढली. आरामात ‘रामटेक’चा दरवाजा उघडून ते सोफ्यावर स्थानापन्न झाले. 
म्हणाले : खात्याचे वाटप होईल तेव्हा होईल, आयुष्यात सेटलमेंट महत्त्वाची!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com