ढिंग टांग : कांदा आणि अव्होकाडो!

Dhing-Tang
Dhing-Tang

कांदा खाऊ नये. कांदा वाईट! कांद्याने आयुष्यात फार्फार वांदे होतात. आयुर्वेदात कांदा हा कंद औषधी असल्याचे नमूद केले असले तरी तो फार्तर हुंगावा!! खाऊ नये. कांदा हुंगण्याने बेशुद्ध पडलेला मनुष्य शुद्धीवर येतो. पण त्यासाठी कांदा कशाला हवा? ते काम तर व्हाणेनेही होते. (खुलासा : व्हाण ही खाण्याची गोष्ट नव्हे! वेळवखत पाहून ती हुंगावी. असो.) कांदा तामसी, क्षुब्धावर्धक आणि अन्य बराच काही असल्याचे सुश्रुताने सांगून ठेवले आहे. कांद्याचे इतर औषधी उपयोग आम्ही इथे सांगणार नाही. कां की त्यामुळे कांद्याची जाहिरात होऊन सारी जणें कांद्यासाठी धावतील व वांधे होतील. 

कांदा खाल्ल्यास तोंडाला बेक्‍कार दर्प येतो. त्यामुळे इंप्रेशन बिघडते. (जिज्ञासूंनी प्रयोग करून पाहावा.) एका माणसाने मुलगी पाहावयाच्या कार्यक्रमात तीन प्लेट कांदेपोहे दडपले. (खुलासा : कांदेपोहे दडपले! पण दडपे पोहे वेगळे!) वर आणखी कांदा व शेव मागून घेतली. परिणामी लग्न मोडले. कुणाला हा कांद्याचा फायदा वाटेल! पण तसे नाही. कांद्यामुळे माणसाला आजवर तोटाच सहन करावा लागला आहे.

‘लशुनं गृज्जनंचैव पलाण्डुं कवकानि च। अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्यप्रभवाणिच।’ असे कुणीतरी संस्कृतमध्ये म्हणून ठेवले आहे. अर्थ एवढाच की लसूण, गाजर, कांदा आणि मशरूम हे अभक्ष्य आहेत. (यात मांसाहारही आलाच!) कांदा-लसूण एकवेळ समजू शकते, पण गृज्जन यानेकी गाजरदेखील खाऊ नये, असे का बरे सांगितले असावे? यावर आमचे संशोधन चालू आहे. 

संस्कृत भाषेत कांद्याला पलांडु, तीक्ष्णकंद, कंदर्प अशी बरीच नावे आहेत. कांद्याला संस्कृतात बरीच नावे ठेवली असली तरी हा कंद जगभर लोकप्रिय आहे, हे दुर्दैव आहे. आपल्या अत्यंत लाडक्‍या व द्रष्ट्या अर्थमंत्री मा. निर्मला सीतारमणम्याडम या कांदा चुक्‍कूनही खात नाहीत. कांदा नाही, लसूण नाही, अशा व्रतस्थ अवस्थेत त्या देशाचे अर्थकारण बघत असतात. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सात्त्विक राहिली आहे, याकडे साऱ्यांचे आम्ही लक्ष वेधू. मा. निर्मलाम्याडम यांनी ‘आमच्या घरात कांदा-लसूण खात नसल्याने कांदा महाग झाला काय, स्वस्त झाला काय, काऽऽही फरक पडत नाही’ असे सांगून टाकले. सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे हवालदिल झालेल्या भारतीय जनतेला हे एकप्रकारचे मार्गदर्शनच आहे. आपणही कांदा सोडावा! कांदा न खाल्ल्याने कांद्याचे भाव कंट्रोलमध्ये राहतात.

मिसळीवर, अंडाभुर्जी किंवा मुर्गीसोबत, बिर्याणीत कांदा हवाच, पण कांद्याची भजीदेखील हवीत, ही कांदावृत्ती बरी नव्हे! ज्यातत्यात कांदा घालण्याची ही वृत्ती दर्पयुक्‍त आहे. ज्यातत्यात फांदा मारणे एकवेळ चालेल, पण कांदा घालणे वाईट! इतका कांदा खाऊन कोठे जायचे आहे? इथेच राहायचे आहे ना? तेव्हा लोकहो, कांदा सोडा. कांद्याशिवाय जगण्याचा प्रयत्न करा. -जमेल! कांदा न खाणारी माणसे सात्त्विक असतात. साबुदाण्याची खिचडी का वाईट असते? तिखटामिठाचा सांजा का वाईट असतो? बटाटेपोहे का वाईट लागतात? कांद्यापलीकडे खूप खाद्यजीवन उपलब्ध आहे. 

निर्मलाम्याडम ‘अव्होकाडो’ खात असतील, असा संशय आपल्या सर्वांचे प्रिय माजी अर्थमंत्री मा. चिदंबरमजी यांनी व्यक्‍त केला. अव्होकाडो आम्ही काही खाल्लेले नाही. ते फळ आहे, की इटालियन चित्रपट? की पादत्राणाचा प्रकार? हेही आम्हाला ठाऊक नाही. परंतु मा. निर्मलाम्याडम अव्होकाडो खात असतील, तर आपणही कांद्याचा त्याग करून आर्थिक मंदीचे दुष्टचक्र भेदण्याच्या कामी मा. निर्मलाम्याडम यांना हातभार लावूया. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com