ढिंग टांग : आरामात राम आहे! (एका माजी मुख्यमंत्र्याची डायरी!)

Dhing-Tang
Dhing-Tang

आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ मार्गशीर्ष शु. एकादशी (मोक्षदा).
आजचा वार : संडेवार.
आजचा सुविचार : आज करै सो कल कर, कल करै सो परसो, इतनी भी क्‍या जल्दी है जब आना है फिरसो?

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) खूप मोकळे मोकळे वाटत आहे. छातीवरले ओझे उतरले. हल्ली मी घरी (एकटाच) असतो. सकाळी गाणी ऐकावीत, दुपारी जेवावे. थोडी वामकुक्षी घ्यावी. पुन्हा गाणी ऐकावीत. पुन्हा जेवावे आणि झोपी जावे, असा दिनक्रम असतो. गेली पाच वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता, रोज अठरा-वीस तास काम करीत होतो. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करीत होतो. ‘मी पुन्हा येईन’ असे सांगूनही गेलो होतो. पण, नाही जमले! पहाटे पहाटे पुन्हा आलोदेखील होतो. पण, आल्यापावली परत जावे लागले! ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे समूहगीत (एकट्याने) म्हणत दिवस कंठत होतो. परंतु, जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे!! शुक्रवारच्या दिवशी रात्र होता होता पुन्हा पहाट झाल्यासारखे वाटले! साक्षात मा. मोदीजींचे दर्शन झाले...

...पुण्याच्या विमानतळावर परमदैवत भेटले. पुष्पक विमान आले, पुण्याच्या विमानतळावर उतरले. त्यातून ती दैवी मूर्ती प्रकट झाली. खांद्यावर थापटून ‘कसा आहेस बाळ?’ असे त्यांनी मायेने विचारताच, हुंदकाच फुटला. दैवदुर्विलास असा की याक्षणी(ही) माझ्या शेजारी खांद्याला खांदा लावून आमचे माजी मित्रवर्य मा. उधोजीराव सीएम उभे होते आणि बंद दाराआड बोलणी करणारे आमचे कमळाध्यक्ष मा. मोटाभाईसुद्धा उपस्थित होते.

नाटकाच्या क्‍लायमॅक्‍सला सर्व पात्रे एकत्र आणण्याची नाटककाराची पद्धत असते ना? तस्सेच घडले. गेला महिना-दीड महिना चालू असलेल्या या नाटकातील सर्व क्‍यारेक्‍टर तिथे उभी होती. विमानाचा जिना उतरून मा. मोदीजी आले... 

‘‘हे आपले नवे सीएम!’’ अशी मीच ओळख करून दिली. मा. मोदीजी हंसले. 
‘‘अरे, हा तो म्हारा नान्हा भाव छे!’’ असे म्हणत त्यांनी नव्या सीएमसाहेबांच्या पाठीवरही थाप मारलीन. जरा जोरात मारली असेल का? कारण, सीएमसाहेब थोडे लटपटले. मग त्यांनी मान खाली घालून मा. मोदीजींना अभिवादन केले. एक गुलाबाचे फूल नजर केले.

‘‘तो हवे शुं च्याले छे?’’ मा. मोदीजींनी विचारले. ‘एकदम मस्त!’ नवे सीएम म्हणाले. पण, ॲक्‍चुअली हा प्रश्‍न माझ्यासाठी होता, हे थोडे उशिरा लक्षात आले. 
...का कुणास ठाऊक घशात आवंढाच आला. हुंदका परतवत मी फक्‍त ‘आरामज आराम छे’ असे उत्तर दिले. ‘आता वेळ मिळालाच आहे तर योगासने करीत जा, रोज ब्राह्मीची पाच पानेही खात जा’ असा आयुर्वेदिक सल्ला त्यांनी दिला. पुढले तीन महिने रोज वीस मिनिटे योगासने करायचे ठरविले आहे. 

‘मी तुमचा जुना मित्र आहे, सांभाळून घ्या’ असे नव्या सीएमसाहेबांनी कानात कुजबुजून तिथेच सांगितले. बहुधा हेच त्यांनी त्यांच्या मोठ्या भावालाही सांगितले आहे. त्यामुळे अर्थातच मी ‘हो’ म्हणालो आहे. तीनेक महिने या सरकारला वेळ द्यायचे ठरविले आहे. मग बघू! सारांश एवढाच, की तीन महिने ‘आरामज आराम’ आहे! पाच वर्षांच्या ड्यूटीनंतर तीन महिन्यांची सुट्‌टी काही वाईट नाही! पुन्हा येणारच आहे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com