ढिंग टांग : स्टेचा अर्थ!

Dhing-Tang
Dhing-Tang

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे.
वेळ : थबकलेली! काळ : स्तंभित!
प्रसंग : लटकलेला! पात्रे : सटकलेली!

अत्यंत चिंताग्रस्त मनस्थितीत मा. सीएमसाहेब दालनात येरझारा घालीत आहेत. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे...मग यू-टर्न! पुन्हा दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे...पुन्हा यू-टर्न! असे सारखे चालू आहे. त्यांचे विश्‍वासू पीए मिलिंदोजी त्यांच्या बरोबरीने येरझारा घालीत आहेत. अब आगे...

सीएमसाहेब : (अचानक थबकून) कोण आहे रे तिकडे?
पीएसाहेब : (त्यांच्यापाठोपाठ अचानक थबकून) मीच आहे, साहेब! असा अचानक ब्रेक का मारलात?

सीएमसाहेब : (कपाळावर चेपत) शतपावलीला आम्ही तूर्त स्टे दिला आहे! काय म्हणणं आहे?
पीएसाहेब : (शांतपणे) अस्सं होय! सगळ्यांना कळवू?

सीएमसाहेब : (त्रासून) सगळ्यांना म्हंजे कोणाला?
पीएसाहेब : (गंभीरपणे) आपल्या मंत्रिमंडळाला?

सीएमसाहेब : (च्याट पडत) अरेच्चा!! मंत्रिमंडळ झालं? मला कुणी कसं सांगितलं नाही? मी मंत्रिमंडळावर परवाच स्टे दिला होता ना?
पीएसाहेब : आपल्या पक्षातल्या लोकांना तरी सांगू का?

सीएमसाहेब : (नकारार्थी मान हलवत) नको! कशाला? आज आमच्या कुठल्या मीटिंगा आहेत?
पीएसाहेब : (डायरीत बघत) बऱ्याच मीटिंगा आहेत! सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक आहे, मग सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक आहे! त्यानंतर गोरेगावची पत्राचाळ आणि कल्याण-डोम्बिवलीच्या समस्यांबाबत आढावा बैठक आहे...बऱ्याच आढावा बैठका आहेत! 

सीएमसाहेब : (खचून जात) किती आढावा घ्यायचा एका माणसानं? छे! थकलो बुवा आढावा घेऊन घेऊन!
पीएसाहेब : (खांदे उडवत) त्याला काही इलाज नाही, साहेब! आढावा घेतल्याशिवाय पुढे कसं जाता येईल?

सीएमसाहेब : (खुर्चीत मटकन बसत) या आढावा प्रकाराला स्टे देता येईल का बघा जरा!
पीएसाहेब : किती गोष्टींना स्टे द्यायचा साहेब? हाती घेतलेली प्रत्येक फाइल स्थगित केली आहे आपण! लोक आपल्याला स्थगिती सरकार म्हणायला लागले आहेत!!

सीएमसाहेब : (एकदम आठवून) त्या आरेवनातल्या कारशेडच्या कामाला स्टे दिलाय, तो कायम आहे ना?
पीएसाहेब : (ठामपणाने) एकदम पक्‍कं काम झालंय! तिथली उरलेली झाडं वाढायची आपोआप थांबली आहेत म्हणे! स्टे दिलाय ना आपण!!

सीएमसाहेब : ते एक बरं झालं! आता काय?
पीएसाहेब : (हातातल्या यादीवर खुणा करत) काल खासदारांची बैठक होती, त्यावरही स्टे दिला आपण! आता फक्‍त नागपूर अधिवेशनाची तयारी करायची आहे! तेवढं झालं की मग काम फत्ते!

सीएमसाहेब : (विचारात पडत) नागपूर अधिवेशनाला स्टे देता येईल का बघा जरा!
पीएसाहेब : (धक्‍का बसून) असं करता येणार नाही साहेब! आठवडाभराचं तर अधिवेशन आहे! विरोधक फाडून खातील! मंत्र्यांना उत्तरं देताना नाकीनऊ येतील!

सीएमसाहेब : (बिनधास्तपणे) आहेच कुठे मंत्रिमंडळ इथे! अजून खातेवाटपसुद्धा नाही!
पीएसाहेब : (सावधगिरीचा सल्ला देत) फार उशीर करू नका साहेब! खातेवाटप लौकर झालं नाही तर पब्लिकमध्ये मेसेज चांगला जाणार नाही, साहेब! 

सीएमसाहेब : (सबुरीनं घेत) करू करू, काय घाई आहे?
पीएसाहेब : (आगाऊपणाने) कारभार करायला मंत्रिमंडळ हवंच ना साहेब! आढावा बैठकींवर किती दिवस काढणार? आणि इतके स्टे कशाला द्यायचे? हो की नाही?
सीएमसाहेब : (एक पॉज घेत) त्याचं काय आहे...स्टेबल राहायचं असेल तर ‘स्टे’ला पर्याय नाही, कळलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com