ढिंग टांग : गोड बातमी!

Dhing-Tang
Dhing-Tang

(सौभाग्यवती कमळाबाई सालंकृत आरशासमोर उभ्या राहून स्वत:स न्याहाळत आहेत. अधूनमधून खुदकन हसत आहेत! आरशात बघून बोट रोखत स्वत:च्याच प्रतिमेला सुनावत आहेत- ‘मी पुन्हा येईन!’ एवढ्यात ‘हर हर हर हर महादेव’ अशी आरोळी ऐकू येते, आणि पाठोपाठ मा. उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे...)
उधोजीराजे : कुठाय ती कमळाऽऽ! कमळेऽऽ..ए कमळे ! 
कमळाबाई : (गर्रकन मागे वळत) इश्‍श! इत्कं आग लागल्यासारखं ओरडायला काय झालं?
उधोजीराजे : क...क...कमळाबाई, कुठे आहात तुम्हीऽऽ?
कमळाबाई : (शांतपणे) इश्‍श! ही काय इथंच तर आहे, तुमच्यासमोर! मी बापडी कुठे जाणार?
उधोजीराजे : (जाब विचारत) कमळे, कमळे, हे काय ऐकतो आहोत आम्ही? (संतापून) कसली गोड बातमी देणार आहात?
कमळाबाई : (लाजून तोंडाला पदर लावत) काहीही काय विचार्ताय? असं विचार्तात का कुणी? 
उधोजीराजे : (संतापाने बेभान होत) आमच्याशी काडीमोड घेतल्यानंतर तुमची माणसं गोड बातमी देणार असं सांगत हिंडतायत आणि आम्ही साधा जाब विचारू नये? नाही म्हटलं तरी पंचवीस-तीस वर्ष आम्ही तुमच्यासोबत काढली आहेत!
कमळाबाई : (जड आवाजात) काडीमोड आम्ही नाही घेतलान! इकडच्या स्वारीनं पाठीत खंजीर खुपसून...जाऊ दे! माझं मेलं नशीबच फुटकं!! (मुसमुसून रडू लागतात)
उधोजीराजे : (दोन पावलं मागे जात) तुमच्या या मगरीच्या अश्रूंनी आम्ही आता विरघळणार नाही, कमळाबाई! आता आपल्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत!!
कमळाबाई : (फणकाऱ्यानं) झाल्या आहेत ना? मग जाब विचारायला आलात कशाला इथं?
उधोजीराजे : (अस्वस्थपणे) का म्हंजे? लोक आम्हाला विचारतात म्हणून! तुमची माणसं गावगाड्यात कमळाबाई लौकरच गोड बातमी देणार असं सांगताहेत! लोक आमच्याकडे बघून फिदीफिदी हसतात! 
कमळाबाई : (निर्विकारपणे) गोड बातमी आली काय, नि कडू बातमी आली काय...तुम्हाला काय फरक पडतो?
उधोजीराजे : (कळवळून) नुकताच दौलतीचा कारभार हाती घेतला आहे! जरा सुखाने श्‍वास तरी घेऊ द्या! आता तरी पिच्छा सोडा आमचा!! का छळताय आम्हाला?
कमळाबाई : (आश्‍चर्यानं) अग्गोबाई! आम्ही छळतो? तुम्ही घराबाहेर काढल्यानंतर मी फिरकल्येसुध्दा नाही! ना मनधरणी केली, ना आर्जवं केलीन! आम्ही छळतो? ना धमक्‍या दिल्या, ना इशारे दिलेन! आम्ही छळतो?
उधोजीराजे : (अखेर मुद्द्यावर येत) काय आहे गोड बातमी? तुमच्याच मुखातून ऐकू द्या आम्हाला!
कमळाबाई : (पदराशी चाळा करत चतुराईने) आमच्या मुनगंटीवारसाएबांना विच्यारा! ते सांगतील!!
उधोजीराजे : (कपाळावर हात मारुन घेत) कर्म आमचं! गेले दोन महिने ‘ते गोड बातमी मिळणार, गोड बातमी मिळणार’ असंच सांगतायत! 
कमळाबाई : (आरशात स्वत:ला पाहात खुशीखुशीत) मग थोडी वाट पहा! कळेल!!
उधोजीराजे : (अजीजीने) तुमची गोड बातमी आमच्यासाठी कडू बातमी ठरू शकते, म्हणून विचारतोय! सांगा बरं काय आहे तुमची गोड बातमी?
कमळाबाई : (आढेवेढे घेत) नक्‍कोच! आमचं आमच्यापास राहू द्या सिक्रेट!
उधोजीराजे : (गळ घालत) सांगा हो! आम्ही कोण्णा कोण्णाला नाही सांगणार! मग तर झालं?
कमळाबाई : (लाडीकपणे) बघा हं! 
उधोजीराजे : (विरघळत) आमच्यावर विश्‍वास ठेवा, कमळाबाई! बंद दाराआड बोललेलं आम्ही बाहेर अज्जिबात बोलत नाही! ती आमची संस्कृतीही नाही!
कमळाबाई : (एक डेडली पॉज घेत) आम्हाला किनई, हल्ली चाकलेटं खायला भारी आवडायला लागलंय! हीच ती गोड बातमी बरं!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com