ना-राजीनामा! (ढिंग टांग)

ना-राजीनामा! (ढिंग टांग)

मऱ्हाटी दौलतीचे कारभारी राजमान्य राजेश्री 
      ती. नानासाहेब (फडणवीस द दुसरे) यांसी, मऱ्हाटी दौलतीच्या चाव्या आपल्या कश्‍यास लावोन आम्ही निश्‍चिंत जाहलो. प्रंतु, राजकाजी आपली हलगर्जी होत असल्याचे दिसते. हे बरे नव्हे!! रयतेच्या वातीस ढका लावो नका, ऐसे बजावोन आम्ही दौलतीची शिक्‍केकट्यार आपणांस सुपूर्त केली होती. आम्ही गहिऱ्या निंद्रेत गुलाबजांबाप्रमाणे डुंबत आहो, ऐसा भलता गैरसमज करोन घेवो नये. दौलतीचा धनी हा अहर्निश जागा असतो, हे ध्यानी ठेवावे. आपल्या कारभाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून रयत गांजली आहे. विडीचा काडीस आधार नाही. ऐसीयास सावधानी बरतणे. हयगय न करणे.

सदर चिठ्‌ठी घेऊन येणारे गृहस्थ हे आमचे अखंड परिचयाचे असोन आतिशय सज्जन असा उभ्या मुल्कात त्यांचा लौकिक आहे. आपल्याच अष्टप्रधान मंडळात त्यांची जिम्मा होते, हे आपणांस ठावें असेलच. त्यांस उद्योग खाते देण्यात आले आहे, परंतु, आपण काही उद्योग करावा, ऐसा सदर सच्छील गृहस्थाचा लौकिक नाही. स.स. गृ.चे नाव ‘देसाई’ ऐसे आहे व दरमहा पगार स्वगृही देवोन बसच्या भाड्याचे पैसे कुटुंबाकडून मागून घेणारे हे गृहस्थ आहेत. तथापि, ‘आपण बरे आपले काम बरे’ ऐश्‍या सच्छील स्वभावाचें सदर गृहस्थावर आज किटाळ पडले. काय हे कलियुग?

सांप्रत काळ ऐसा आला की शंभर आप्राधी हायवेपासून पाश्‍शे फुटाच्या आत मद्यधुंद अवस्थेत, आणि पाश्‍शे फुटाचे बाहेर आरेंज ज्यूस पिणारा निरपराध कोर्टात!! काळ मोठा कठीण आला. शंभर आप्राधी सुटोत, परंतु, एका निरप्राध्यास नख लागता कामा नये, हे न्यायशास्त्राचे सूत्र विसरलात काये? सदर सच्छील गृहस्थ इतके सच्छील की की रस्त्यात गाठोन कुणी त्यांस पुशिले की ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ तर ते गडबडोन सांगतील की, ‘असं करा, इथून डाव्या हाताला वळा. मुरलीधराच्या देवळाला मागे टाकून राइट घेतलात की शामळजीचे किराणा दुकान लागेल. तिथं विचारा...’ ऐश्‍या भाबड्या गृहस्थावर चवकशी बसवोन काय साधिले? सबब, सदरील सच्छील गृहस्थाने दिलेल्या कागदावर ‘नामंजूर’ असा शिक्‍का उमटवोन त्यांस माघारी लावोन देणे. जल्द अज जल्द कार्यवाही करोन त्यांस मुक्‍त करावे, ही आज्ञा. हयगय केलिया, मुलाहिजा ठेवला जाणार नाही. जाणिजे. उधोजीराजे.

प्रजाहितदक्ष रयतसुधारक सभाधीट सह्याद्रीव्याघ्र राजाधिराज उधोजीराजे महाराज, यांचे चरणारविंदी बालके नानासाहेबाचा शतप्रतिशत साष्टांग नमस्कार. आपण खामखां आमचेवर गरम झालात. आपली आज्ञा आम्ही ती प्राप्त होण्याआगोदरच पाळली. घडले ते असे...

सकाळी उठून बाहेरच्या खोलीत चहा पिण्यास आलो, तेव्हाच आपला खलिता प्राप्त झाला. सदर खलिता आणणारा सांडणीस्वार समोरच उभा होता. त्यांस मी विचारले, ‘‘कायाय?’’ तर ते म्हणाले, ‘‘राजीनामा!’’ मी म्हटले, ‘‘कुणाचा?’’ तर ते म्हणाले, ‘‘आमचाच!’’ मी हादरलो. ‘‘काय नाव?’’ असे मी विचारताच त्यांनी तोंडावर धरलेला रुमाल काढला. पाहातो तो काय!! आमचे उद्योगमंत्री देसाईमहाराज!! हमेशा तोंडावर रुमाल धरण्याच्या त्यांच्या सवयीने चटकन ओळखता आले नाही, इतकेच. मी लागलीच म्हटले, ‘‘हॅ:!! राजीनामा-बिजीनामा कुछ नै. कोणीही यावे, टिचकी मारोनि जावे, असे चालते थोडेच? उद्या ते धनाजीराव मुंडे आमचा राजीनामा मागतील? देऊ थोडाच!! सबब, तुमचा राजीनामा नामंजूऽऽऽर...!!’’

सदर सच्छील गृहस्थ ‘बरं’ असे म्हणून घरी गेले!! काळजी नसावी!!
तथापि, स.स. गृ. येऊन गेल्यावर दहा मिनिटांनी धडपडत आमचे पेणवाले प्रकाशभाई मेहता आले. घाम पुसत म्हणाले, ‘‘येऊ का?’’ मी म्हटले, ‘‘कायाय?’’ ते म्हणाले, ‘‘राजीनामाच...दुसरं काय?’’

खरे म्हंजे मला त्यांचा राजीनामा घ्यायचा होता. पण दहा मिनिटे आधीच तुमच्या स. स. गृं.चा राजीनामा नाट्यपूर्ण पद्धतीने नाकारल्यावर ह्यांचा कसा घेणार? न्याय सर्वांना सारखा, हेही न्यायशास्त्राचे एक सूत्र असल्याने त्यांनाही माघारी पाठवले. 
कळावे. इति. 
आपला. नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com