बाबाजींचा डेरा! ढिंग टांग

ब्रिटिश नंदी
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

बाबाजींचा आणि आमचा आध्यात्मिक सौदा झाला आहे. आम्ही त्यांच्या डेऱ्यात हजेरी लावावयाची, त्या बदल्यात त्यांनी आम्हांस प्रांठा (असली घीयुक्‍त) आणि अचार ह्यांचा पुख्खा द्यावयाचा. सौद्याप्रमाणे आम्ही डेऱ्यात हजर झालो. 

बाबाजींचा आणि आमचा आध्यात्मिक सौदा झाला आहे. आम्ही त्यांच्या डेऱ्यात हजेरी लावावयाची, त्या बदल्यात त्यांनी आम्हांस प्रांठा (असली घीयुक्‍त) आणि अचार ह्यांचा पुख्खा द्यावयाचा. सौद्याप्रमाणे आम्ही डेऱ्यात हजर झालो. 

‘‘तुस्सी कौन हो?’’ ऋषी कपूरकडून उसना मागून आणलेला फैनाबाज स्वेटर घालून बाबाजी गादीवर बसून आम्हालाच विचारत होते. आम्ही इकडे तिकडे पाहिले. आमच्या शेजारी एक शिष्या नीतू सिंगकडून आणलेला टीशर्ट परिधान करून मधुप्रिया बसलेली होती. मधुप्रियेस बाबाजी प्रेमभराने हनीप्रीत असे संबोधतात, हे साऱ्या जगास माहीत आहे. साहजिकच बाबाजींची उंगली तिच्या दिशेने असेल, असे समजून आम्ही गप्प बसलो.
‘‘तोहडे काण मां गोबर से के?’’ बाबाजींनी हरयाणवी उंगली आमच्या दिशेने हवेत भोसकली होती, हे आम्हांला अंमळ उशिराच टोंचले. ‘न्यम न्यम न्यम’ करीत आम्ही उभे राहिलो. एकवार स्वमुखावरून हात फिरवला. कानात गोबर गेले आहे का, हेही तपासून पाहिले. नव्हते.

‘‘की है पुत्तर?’’ ऋषी कपूरकडून आणलेला स्वेटर बाबाजींच्या अंगाला फिट्ट बसला होता. कव्हरात अडकलेल्या तक्‍क्‍याप्रमाणे त्यांच्या गरगरीत पोटाचा बिंडा शोभून दिसत होता व ते ऋषी कपूरपेक्षाही काहीच्या काहीच राजबिंडे दिसत होते. 

‘‘बाबाजी, मला बालपणीच टक्‍कल पडले होते व सारी जणें मज टकल्या असे चिडवीत असत. त्यामुळे मी खूप दु:खी झालो होतो व जीव द्यायला निघालो होतो. तेव्हाच आपण मला दिलेल्या ‘रारतेला’च्या बाटलीतील तेल रात्री लावले, तो काय आश्‍चर्य... सकाळी माझे केस मानेवर रुळत होते. शिवाय बोनस म्हणून दाढीही वाढली होती. जय बाबाजी!’’ एवढे बोलून आम्ही खाली बसलो. टाळ्यांचा कडकडाट झाला. बाबाजींनी डोळे मिटून ‘वाटलंच होतं मला’ टाइपचा भाव चेहऱ्यावर आणला. वास्तविक ते रारतेल (पक्षी : राम रहीम तेल) त्यांनी ट्रॅक्‍टरमध्ये घालावयास दिले होते. आम्ही टकलावर घातले. की फर्क पईंदा? पण ते असो.

बाबाजींच्या नावे असे अनेक चमत्कार आहेत. एका भक्‍ताची मोटरसायकल चोरीस गेली. त्याने बाबाजींस सांकडे घातल्यावर सायंकाळी चोराने ती मोटरसायकल टाकी फुल्ल करून आणून दिली. विराट कोहलीस बाबाजींनी क्रिकेट शिकिवले. हुसेन बोल्ट तर त्यांचे बोट धरूनच पळावयास शिकला.

विख्यात गॉल्फपटू टायगर वूड एकदा जाहीर म्हणाला होता, की आम्ही नाइन होल गॉल्फ खेळून दमतो. बाबाजी नवग्रह गॉल्फ खेळतात. हरेक ग्रहावर त्यांचे चेंडू सांपडले आहेत, असे सांगतात. बाबाजी स्वत: अव्वल दर्जाचे क्रीडापटू आहेत. त्यांच्या गुहेचे दार साध्वींच्या निवासाशी उघडते म्हणून नव्हे, तर त्यांनी खरोखर गोळाफेक, भालाफेक अशा फेकाफेकीच्या खेळात ३२ वेळा राष्ट्रीय विक्रम केले आहेत. एकदा तर त्यांनी डेऱ्यातून फेकलेला भाला मंगळावर जाऊन पडला. त्यानंतर काही दिवसांनी डेऱ्यात प्रवचन देत असताना त्यांच्या डोकीवर एक अंडे येऊन फुटले. ते मंगळावरील संतप्त रहिवाश्‍यांनी फेकले होते, असे म्हणतात. खरेखोटे बाबाजीच जाणोत. 

बाबाजी गुहेत राहतात. गुहेत राहून सतरा घंटे साधना करतात. साधना करावयास गुहाच बरी पडते, हे कोणालाही पटेल. सा. मधुप्रिया वगळता कोणीही ह्या गुहेत पाऊल घालू शकत नाही. ‘ही  गुरगुरमीत सिंव्हाची गुहा आहे. परवानगीशिवाय येऊ नये. अपमान होईल’ अशी (पुणेरी) पाटी बाहेर लावण्यात आली आहे. ह्या गुहेतून गुप्त भुयारातून बाबाजी अधूनमधून साध्वी निवासात जाऊन अनुग्रह देऊन येतात. मनाविरुद्ध अनुग्रह दिल्याने दोघा साध्वींनी भडकून त्यांच्यावर केस केली व बाबाजींना रोहतकच्या सुनैरिया आश्रमात जावे लागले. 

आमचे पूज्य बाबाजी हल्ली तेथे खडी फोडत आहेत. पण एका क्षणात पर्वताचे चूर्ण करणाऱ्या बाबाजींना गाडाभर खडी म्हंजे काहीच नाही. हो की नाही? जय बाबाजी.

Web Title: editorial article dhing tang