...ती १५ मिनिटे! (ढिंग टांग)

Dhing-Tang
Dhing-Tang

महाराष्ट्राचे तारणहार श्रीमान उधोजीसाहेब ह्यांची आणि कारभारी पंत फडणवीसनाना ह्यांची फाल्गुन मासारंभाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक भेट झाली. किंबहुना, ह्याच प्रहरापासून औंदाचा फाल्गुन मास सुरू जाहला, असे म्हटले तरी चालेल! अवघ्या पंधरा मिनिटांची भेट!!! परंतु तीत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा कंद होता. ह्याच भेटीत मराठी रयतेचे भवितव्य मुक्रर जाहले. ही भेट बंद दाराआड झाल्याने त्याचा वृत्तांत धड कुणाला समजू शकला नसला तरी आम्हाला त्याची इत्थंभूत माहिती आहे. कां की भेटीचे समयी ‘वर्षा’ ह्या मा. नानासाहेबांचे छावणीवर टेबल पुसावयाच्या ड्यूटीवर आम्हीच होतो. ह्या पंधरा मिनिटांत उभयतांनी अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा केली. चहा व पाणी दोनदा झाले व तीनदा टेबल पुसले गेले. नेमके काय घडले, त्याचा हा एक अल्पवृत्तांत.

...सायंकाळची वेळ होती. कारभारी नानासाहेब दिवसभर येरझारा घालीत कुणाची तरी वाट पाहत होते. ‘दाराची घंटी वाजली’ असे पुटपुटत त्यांनी चार वेळा दार उघडून पाहिले. कुणीही नव्हते ! शेवटी ‘पायाचे तुकडे की हो पडले’ ऐसे पुटपुटत नानासाहेब खुर्चीत बसले. व्हावयाचे तेच जाहले ! दाराची घंटी वाजली, तेव्हा नानासाहेबांचा नेमका खुर्चीवर बसल्या बसल्या डोळा लागला होता.

‘‘जय महाराष्ट्र...’’ दारातून आवाज आला. नानासाहेब धडपडून उठले. घड्याळाची टिकटिक येथेच सुरू जाहली, जी बरोब्बर पंधरा मिनिटांनी थांबली. घरात शिरत उधोजीसाहेबांनी दोन्ही हात स्वकमरेवर ठेवून नानासाहेबांकडे रोखून पाहिले.

‘‘गरीबाघरी आपली चरणधूळ लागली, धन्य झालो...’’ नानासाहेब नम्रपणे म्हणाले.

‘‘ते ठीक आहे, पण इथं आमची मराठी रयत रंजली गांजली असताना तुम्हांस झोप कशी लागते, कारभारी!!,’’ उधोजीसाहेबांनी आल्या आल्या डरकाळी मारली. इतक्‍यात त्यांच्या काही पाईकांनी लगबगीने प्रवेश करोन लाल कागदात बांधलेली खोकीच्या खोकी आणून टाकली. ‘‘हे घ्या!’’ उधोजीसाहेब म्हणाले.

‘‘कशाला उगीच एवढ्या भेटवस्तू? ह्याची काहीच गरज नव्हती...ह्यॅह्यॅह्यॅ...बरं असू दे,’’ नानासाहेब संकोचून म्हणाले.
‘‘भेटवस्तू? नाणार प्रकल्पाच्या विरोधात तिथल्या स्थानिकांच्या सह्या आणल्या आहेत...घ्या!,’’ उधोजीसाहेबांनी धडाधड गठ्ठे नानासाहेबांच्या हातावर ठेवले. क्षणभरात नानासाहेब त्या गठ्ठ्यांमागे दिसेनासे झाले. तेव्हाच नेमका आम्ही चहा आणला. ‘आणा इकडे’ असे म्हणत उधोजीसाहेबांनी एका घोटात चहा संपवला. इतकेच म्हणाले : ‘छ्या...किती गार चहा?’

चहा घेतल्यावर मिश्‍या पुसून उधोजीसाहेब सरसावून बसले. नानासाहेबांनीही महत्प्रयासाने गठ्ठे बाजूला ठेवून बसकण मारली आणि जरा दम खाल्ला.
‘‘सुरू करू या?,’’ नानासाहेबांनी खोल आवाजात विचारले. त्यावर उधोजीसाहेबांनी ओक्‍के अशी खूण केली.
‘स्वबळाचा नारा!’’ नानासाहेब ओरडले.
‘‘राणेदादांचा गारा!’’ उधोजीसाहेब डरकाळले.
‘‘युती!’’ नानासाहेब चिरकले.
‘’आदिलशहा!’’ उधोजीसाहेब सरकले.
‘‘शेतकऱ्यांची कर्जमाफी!’’ ठेंगा दाखवत नानासाहेब.
‘‘पाकिस्तान मुर्दाबाद!’’ मूठ उगारत उधोजीसाहेब.
‘‘आमच्या नेत्यांवर टीका!’’ दातोठ खात नानासाहेब.
‘‘वाघ आला वाघ,’’ जबडा उघडत उधोजीसाहेब.
‘‘बंगल्याचं बांधकाम!,’’ डोळा मारत नानासाहेब. ..थोड्या वेळाने दोघेही थकून गेले. आम्ही पुन्हा चहा नेऊन दिला. पंधरा मिनिटांनी उधोजीसाहेब दार उघडून निघून गेले. घडले ते एवढेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com