नवे कमळ भवन! (ढिंग टांग)

Dhing-Tang
Dhing-Tang

बने बने, इकडे ये! आज किनई मी तुला आमच्या दिल्लीतली एक गंमत दाखवणार आहे. हा रस्ता बघ...ह्या रस्त्याला पं. दीनदयाल मार्ग म्हणतात. छान आहे ना रस्ता? लक्षात ठेव, भविष्यात ह्या रस्त्याला खूप महत्त्व येणार आहे. ती समोरची नवी इमारत पाहिलीस? नाही, नाही...वेडीच आहेस! ती काही कुठली हौसिंग सोसायटी नाही. ते आहे एका जबर्दस्त पावरफुल राजकीय पक्षाचं कार्यालय! त्याच्या लाल भिंतीकडे बघून नाकं मुरडू नकोस. बने! हे भलतंच हायटेक कार्यालय आहे. चल, तुला आज ह्या भव्य संकुलाचीच सैर घडवून आणतो.

बने ह्याला म्हणतात कमळ भवन! आमच्या दिल्लीत आधीच एक लोटस टेंपल आहे, मान्य. पण ते वेगळं. ते आता जुनं झालं. आता हेच दिल्लीत टूरिस्टांचं नवं आकर्षण बनलं आहे. आपली सगळ्यांची आवडती कमळ पार्टी आहे की नाही? त्याच पार्टीचं हे मुृख्यालय. पूर्वी हे पार्टी हपिस अशोका रोडवर होतं. पण त्या रस्त्याचं नाव चुकल्यानं ते इथं हलवावं लागलं. जुन्या पार्टी हपिसाचं आता वस्तुसंग्रहालय होणार आहे म्हणे. कारण तिथंच आपलं सर्वांचं परम दैवत जे की नमोजी (हात जोड गधडे!) ह्यांनी साधा पक्षकार्यकर्ता म्हणून खूप काम केलं होतं. पण तो इतिहास पुन्हा केव्हा तरी सांगीन. आता आपण आत जाऊ. 

...प्रवेशद्वाराशी तुला दक्ष पहारेकरी दिसताहेत ना, त्यांच्यापासून सावध रहा.  ते अतिशय खुंखार असे कमांडो आहेत. त्यांच्या नजरेला नजर देऊ नकोस. त्यांना जरा जरी संशय आला की आपला खेळ खल्लास. तीनेक दिवसात हे कमांडो थेट सरहद्दीवरच लढायला जाणार आहेत. इथे पहारा देणं हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग आहे. 

कंपाऊंडच्या आत ये अशी...हं. हे पहा छानसं छोटुकलं तळं! तळ्यात पाणी आहे. पाण्यात कमळं आहेत. राजहंस आणायला पक्षाचे काही कार्यकर्ते मानस सरोवराकडे रवाना झाले आहेत. मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन सोडले आहेत ना, तस्से इथे राजहंस सोडणार आहेत म्हणे! पण त्यांना पहायला आपण पुन्हा कधी तरी येऊ. हा पक्षाचा ध्वज बघितलास? वंदन कर इथं. ह्या सौधाकडे जाणाऱ्या पायऱ्या. जपून घसरशील!! एवढ्या पायऱ्या चढायच्या ह्या कल्पनेनेच तुला दम लागला ना? लागणारच!! मुद्दामच तशा पायऱ्या केल्या आहेत. पुण्यात पर्वतीच्या पायथ्याशी तुला कानटोपी घालून बसलेले वृध्द काका, आजोबा वगैरे दिसतात ना! तसंच हे!! इथं ह्या तळ्यापाशी बाकडी टाकून पक्षातले काही सिनियर सिटिझन बसणार आहेत म्हणे!! काय म्हणालीस? सिनियर सिटिझन्सची नावं सांगू? हे राम...काहीही विचारतेस बुवा. बरं, चल आता पुढे! 

...दबकत दबकत चाललेली ही माणसं टूरिस्ट नाहीत काही! ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. इतक्‍या भपकेबाज कार्यालयात आपण काम करायचे ह्या कल्पनेने ते बावरुन गेले आहेत. त्यात ‘हे सगळं तुम्हा कार्यकर्त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे’, असं काल त्यांच्या दैवतानं, म्हंजे नमोजींनी उद्‌घाटनाच्या वेळी सांगितलं. त्यामुळे ते आणखीनच बावरून गेले आहेत. हे सगळं आपण कधी केलं? असं त्यांना वाटतंय. पण ते जाऊ दे. 

बने, हे कमळ भवन म्हंजे आधुनिक मयसभा आहे, मयसभा! मयसभेत दुर्योधन फरशी समजून पाण्यात पडला होता. ते बघून द्रौपदी खदाखदा हसली होती. हो, हो अगदी- 

...बने, बने अशी पळत का सुटलीस? ते दाढीवाले गृहस्थ तुझ्या मागे काठी घेऊन कां लागले आहेत? तू त्यांना काही विचारलंस का? काय म्हणालीस? ‘वास्तुशांत कधी करणार?’ असं त्यांना विचारलंस? कमाल आहे तुझी! पळ, पळ, लौकर!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com