विशेष : सामाजिक लोकशाहीचे उद्‌गाते

Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar

भारतीय राज्यघटना ही स्वतंत्र भारताचे एक बलस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवितकार्याला जे अनेक पैलू आहेत; त्यातील राज्यघटनेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान हा एक महत्त्वाचा अध्याय असून सध्याच्या काळात त्याचे स्मरण करणे, अभ्यास करणे अत्यंत प्रस्तुत ठरते. त्यादृष्टीने  डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त घेतलेला मागोवा.

भारतीय राज्यघटनेच्या इतिहासाच्या मुळाशी बुद्धप्रणीत भिक्‍खू संघाचे संदर्भ खुणावत असतात. बुद्धप्रणीत संघातील गणतंत्रात्मक प्रजातंत्राची कुळकथा सांगतांना डॉ. आंबेडकर घटनासभेत म्हणतात, "समता, स्वातंत्र्य व बंधुता ही तत्त्वत्रयी मी फ्रेंच क्रांतीपासून घेतली नसून, गुरू तथागतांच्या भिक्षूसंघातून घेतली आहेत. आधुनिक लोकशाहीची मूलतत्त्वे भिक्षूसंघात आचरणात येत होती. `बौद्धभिक्षू संघ` म्हणजे तत्कालिन संसदच होती. 

बाबासाहेबांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, त्यावेळी डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले होते "डॉ. आंबेडकरांना आम्ही मसुदा समितीवर घेतले आणि अध्यक्षपदावर विराजमान केले. त्या निर्णयापेक्षा अधिक चांगला दुसरा निर्णय आम्ही घेऊच शकत नव्हतो.`` या राज्यघटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. केवळ सात कलमी घटनेसाठी अमेरिकेला चार महिने, कॅनडाला 147 कलमांसाठी 2 वर्षे 5 महिने आणि ऑस्ट्रेलियाला 153 कलमांसाठी नऊ वर्षांचा कालावधी लागला. या तुलनेत 395 कलमांच्या भारतीय घटनानिर्मितीला 2 वर्षे 11 महिने 17 दिवसांचा कालावधी लागला. बाबासाहेबांनी घटनेची केवळ निर्मितीच केली नाही, तर 2473 सूचना व उपसूचनांवरील चर्चेला समर्पक उत्तरे देऊन या घटनेतील तरतुदी आणि तत्त्वांचे तर्किक समर्थनही केले.

श्रेष्ठतम मूल्यांचा अंगीकार
राज्यघटना 26 जानेवारीला 1950 ला गणराज्यदिनी अंमलात आली. घटनेचा सरनामा (प्रिऍम्बल) वाचून अत्यानंदी झालेल्या केंब्रिज आणि हार्वर्ड युनिवर्सिटीचे प्रा. डॉ. अर्नेस्ट वॉर्नर यांनी आपला "दी प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी'नामक ग्रंथ डॉ. आंबेडकरलिखित भारतीय घटनेच्या सरनाम्याला गौरवपूर्वक समर्पित केला. त्यांनी लिहिले, "माझ्या या ग्रंथाचे मर्मसार डॉ. आंबेडकरनिर्मित भारतीय घटनेच्या सरनाम्यात अंतर्भूत झालेले आहे. भारतीय जनतेने आपल्या स्वातंत्र्याच्या प्रारंभीच श्रेष्ठतम मूल्यांचा अंगीकार केला आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.''  स्वतः डॉ. आंबेडकरांनी घटनानिर्मितीची कर्तव्यपूर्ती झाल्यावर जे उद्‌गार  काढले तेही फार महत्त्वाचे आहेत.

जोर्सफ स्टोरीचे उद्धरण देत त्यांनी म्हटले, उत्कृष्ट प्रतिभाशाली आणि निष्ठावंत शिल्पकाराने इमारत बांधून उभी केली आहे. हिचा पाया मजबूत आहे. हिचे विभाग सुंदर व लाभदायक आहेत. यातील सोई बुद्धिमत्ता व सुव्यवस्थेच्या सूचक आहेत. बाहेरून आत कुणी शिरू शकणार नाही, इतकी हिची तटबंदी सबळ आहे. कायम उभी राहावी यादृष्टीने ती इमारत उभारली आहे. आपल्याच रक्षकांचा अर्थात जनतेचा मूर्खपणा, भ्रष्टाचार आणि उपेक्षेमुळे मात्र ती केवळ तासाभरात उद््वस्थ होऊ शकते.'  डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा किती महत्त्वाचा आहे, हे आपल्याला आजही पदोपदी जाणवत असते. त्यामुळेच त्या इशाऱ्याकडे कधीही दुर्लक्ष होता कामा नये. सत्य सांगणाऱ्या बुद्धिमंतांना सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे स्थान असले पाहिजे; याउलट भ्रष्ट व्यक्तींची हांजीहांजी केली जात असेल आणि सार्वजनिक हिताचे सत्य सांगणाऱ्या बुद्धिमंतांना अडगळीत टाकले जात असेल तर गणराज्य धोक्यात येईल, असेही त्यांनी एका ठिकाणी म्हटले होते. त्या विचारांची आज पुन्हापुन्हा आठवण येते.

लोकशाही जिवंत राहण्यासाठी...    
बाबासाहेब घटना सादर करताना म्हणतात, "आम्ही भारतीय लोक मिळवलेले स्वातंत्र्य परत गमावणार तर नाही? भारतीयांना काही स्वतःच्याच विश्‍वासघाताने व देशद्रोहीपणामुळे स्वातंत्र्य गमवावे लागेल, या चिंतेने माझे मन ग्रासले आहे. जातिभेद, पंथभेद या जुन्या शत्रूंमध्ये परस्परविरोधी नवीन पक्षांची भर पडली आहे. आम्ही आपल्या पक्ष,पंथ, धर्म, भाषांना देशापेक्षा व राष्ट्रहितापेक्षा अधिक महत्त्व दिले तर आम्ही आपले स्वातंत्र्य गमावून बसू. म्हणून आपण देशरक्षणासाठी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे``. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी काही पथ्ये कटाक्षाने पाळायची खबरदारी घ्यायला सांगितले. हिंसात्मक आंदोलन व माध्यमांचा अवलंब केला जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हिंसात्मक आंदोलने म्हणजे बेबंदशाहीची बाराखडी होय. सनदशीर मार्गांचाच अवलंब करावा. विभूतीपूजा टाळावी. महान व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. परंतु आपले विचारस्वातंत्र्य गहाण टाकू नये, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.  देशात, समाजात, जातीधर्माच्या नावाने विषमता असू नये. धर्मसहिष्णुता असावी. धर्मद्वेष नसावा. लोकशाहीच्या यशासाठी संवैधानिक नीतिमत्ता व सामाजिक लोकशाहीशिवाय स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही. निवडणुकांमध्ये धनसत्ता व बलसत्तेचा गैरवापर व धुडधूस होऊ नये. ‘वन मॅन वन व्होट’  बरोबरच ‘वन व्होट वन व्हॅल्यू’ची ही अंमलबजावणी व्हावी, यावर त्यांनी भर दिला.

जातीवादाच्या दैत्याशी दोन हात
सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाहीला काहीच किंमत राहणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे अशी जीवनप्रणाली जेथे स्वातंत्र्य समता व बंधुत्वाला जीवनाची तत्वे मानली जातात. मागासवर्गाला प्रत्यक्ष कृतीद्वारे समान संधी मिळत नसेल, तर मग कलम 14 ते 16 आणि 46 व 335 ही कलमे म्हणजे अवास्तव वचनांची चेष्टा करणारी उदाहरणे ठरतील. मागासवर्गीयांवर यापुढे जातीय अन्याय होऊ नये म्हणून संविधानात कलम 16 (4) प्रमाणे त्यांची वेगळी वर्गवारी करण्यात आली. कलम 335प्रमाणे ते संवैधानिकदृष्ट्या बंधनकारक मानण्यात आले. भारतात बंधुभाव व समता नांदावी म्हणून बाबासाहेबांनी कलम ३४०, ४१,४२ नुसार अनुसूचित जाती-जमातीतील मागासवर्गीयांबरोबरच अल्पसंख्याकांना सरंक्षण दिले. ‘तुम्ही कोणत्याही दिशेला वळा हा जातीचा दैत्य तुमचा रस्ता अडवतो. जोपर्यंत तुम्ही या जातीच्या दैत्याला ठार करणार नाही, तोपर्यंत आर्थिक सुधारणा आणूच शकत नाही’,असे ते म्हणत. बाबासाहेब धर्मनिरेपक्षतेला अधिक महत्त्व देतात. सरकारने कोणत्याही धर्माला प्राधान्य देणे अपेक्षित नाही असेही त्यानी स्पष्ट केले होते. 

भारतीय संविधानात दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यासाठी केलेल्या सुलभ तरतुदीबद्दल ते म्हणतात, ‘कॅनडाच्या संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला. अमेरिका व ऑस्ट्रेलियाने घटना दुरुस्तीसाठी कठीण अटी टाकल्या. ज्या अवस्थेत आपला देश आहे त्या अवस्थेत असलेल्या दुसऱ्या कोणत्या देशाने घटना दुरुस्तीची एवढी सोपी बदलाची पद्धती शोधून काढली आहे, हे टीकाकारांनी सिद्ध करून दाखवावे’.  
 कालौघात बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाल्याचे सर्वविदित आहे; परंतु भारताच्या केंद्र सरकारला बाबासाहेबांनी सर्वशत्तिशाली बनवल्यामुळे, आसाम, नागालॅंड, काश्‍मीर, पंजाब,आंध्र, तामिळनाडूसारख्या प्रदेशांना विभक्त होण्याचा विचारही करता आला नाही. केंद्र सरकारला मजबूत व शक्तिशाली बनवण्याच्या प्रस्तावाला काहींनी विरोध केला, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘जेव्हा आपत्कालीन आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा नागरिकांची निष्ठा घटक राज्याऐवजी केंद्र सरकारबरोबरच असली पाहिजे.’  

डॉ. आंबेडकरांनी  लोकशाहीच्या भविष्याविषयी वेळोवेळी काळजी व्यक्त केली. ते म्हणतात, ‘भारतात, संसदीय लोकशाही विफल झाली तर बेबंदशाही आणि बंडखोरी देशात उद्‌भवेल. सध्या काही जण ‘हिंदू राज’ किंवा हिंदुराष्ट्राची भाषा करतात. त्याबाबत बाबासाहेबांचे विचार परखड आहेत. अशा प्रकारचे राज्य निर्माण करणे म्हणजे लोकशाहीवरच घाला घालण्यासारखे आहे. ‘हिंदू राज’ ही बाब देशासाठी विनाशकारक ठरेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या अनुषंगाने व्यक्त केलेले विचार आणि घटनेच्या रूपाने त्यांनी देशाला दिलेली तत्त्वे हा देशाचा एक अमूल्य ठेवा आहे. तो योग्य रीतीने जपला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com