एक अनोखा सिनेमावाला

Sagar-Sarhadi
Sagar-Sarhadi

पुण्यात २८-२९ रोजी होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्‍ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने त्यांचा जीवनप्रवास व कलात्मक योगदान याविषयी.

काही लोकांचे जीवन कादंबरीसारखे असते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सागर सरहदी. नावाप्रमाणेच कुठलीही सरहद नसणाऱ्या या सागराला कुठल्या परिचयाची आवश्‍यकता नसली, तरी पाळंमुळं माहीत असावीत म्हणून सांगायचं तर सागर सरहदी पाकिस्तानातल्या अबोटाबादजवळच्या बफा गावातील. ते मूळचे गंगासागर तलवार. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता. फाळणीनंतर इतरांप्रमाणेच निर्वासित नावाचा शिक्का कपाळावर घेऊन त्यांना भारतात यावं लागलं. केवळ बाराव्या वर्षी आपलं घर-परिसर-मित्र सगळं सोडावं लागल्याची मनातली खदखद पुढे कागदावर उतरू लागली, जी वयाच्या नव्वदीतही एक दशांशदेखील कमी झालेली नाही. 

सरहदी पुढे नैसर्गिकपणे ‘इप्टा’शी जोडले गेले. तिथं त्यांनी अनेक पथनाट्य-नाटकं-एकांकिका लिहिल्या. ‘कभी-कभी’चे संवाद लिहीत ते चित्रपटमाध्यमाशी जोडले गेले. ‘नुरी’ आणि ‘बाजार’ या त्यांच्याच कथावर बनवलेले चित्रपट तर मैलाचा दगड ठरले. सिलसिला, चांदनी, सवाल, दुसरा आदमी, कर्मयोगी, रंग, चुनरी, तेरी मेहरबानियाँ, फासले, दिवाना आणि कहो ना प्यार हैं यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

दिग्गजांमुळे जडणघडण
मुंबईत कॉलेजमध्ये त्यांचे एक सीनियर होते. संपूर्णसिंह कालरा. पुढं गुलजार या नावानं नावलौकिक मिळवलेले कवी-लेखक आणि दिग्दर्शक. त्यांचं अस्खलित उर्दू-हिंदी, साध्याशा बोलण्यात येणारे गालीब वगैरेंचे संदर्भ बघून सरहदी प्रभावित झाले आणि त्यांचं वाचन वेगानं सुरू झालं. त्यांच्या याच पॅशननं त्यांना ग्रॅंट रोडवरच्या ‘लाल बावटा’ सभागृहात नेऊन पोचवलं. तिथं पुरोगामी विचारांच्या लेखकांची संघटना होती. तिथं त्यांचा राजिंदरसिंग बेदी, इस्मत चुगताई, के. ए. अब्बास, सरदार जाफरी, कैफी आजमी या दिग्गजांशी परिचय झाला. वैचारिक जडणघडण होत गेली. 

‘कभी-कभी’, ‘सिलसिला’ अशा चित्रपटांमुळे प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळूनही व्यावसायिक चित्रपटांमध्ये सरहदींना ‘क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्‍शन’ नावाची गोष्ट सापडत नव्हती. एके दिवशी त्यांनी ‘हैदराबादमध्ये पालकांनी पैशासाठी मुलीला अरबांना विकलं’ अशी बातमी वाचली. त्यांनी थेट हैदराबाद गाठलं. सर्वसामान्य लोक, पत्रकार, लेखक अशा सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. हळूहळू लग्नाच्या नावाखाली मांडलेल्या बाजाराचे वेगवेगळे पदर उलगडू लागले. परित्यक्ता, बालिकावधू यांचं अस्तित्वहीन वास्तव बघून सरहदी दुःखी झाले. सगळे अनुभव घेऊन ते मुंबईत परतले आणि त्यांच्या डोक्‍यात कथानक फेर धरू लागलं. इतकं ‘भेदक वास्तव’ चित्रपट म्हणून चालत नाही, असं मित्रांनी सांगितलं. पण मागे हटतील ते सरहदी कसले. त्यांनी स्वतः पैशांची जमवाजमव सुरू केली. नसिरुद्दीन शहा, भरत कपूर, फारुख शेख, स्मिता पाटील सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि ‘बाजार’ चित्रपटाचा जन्म झाला. 

सरहदी यांचा आशावाद
‘बाजार’चं संगीत हा एक स्वतंत्र विषय आहे. सरहदींना हवं तसं खय्याम यांनी या चित्रपटासाठी वेगळं आणि प्रयोगशील संगीत दिलं. सरहदी यांनी चित्रपटासाठी गाणी लिहून घ्यायच्या पारंपरिक पद्धतीला फाटा दिला. मिर्जा शौक यांच्या दोनशे वर्षे जुन्या जहर-ए-इश्‍क मधलं ‘देख लो आज हमको, जी भर के,’ मीर तकी मीर यांचं ‘दिखायी दिये यूँ’ आणि कवी मखदुम मोईनुद्दीन यांचं ‘फिर छिडी रात’ हे काव्य त्यांनी निवडलं. खय्याम यांनी त्यावर केलेल्या सांगीतिक कलाकुसरीची जादू आजही कायम आहे. पुढं दिग्दर्शक म्हणून दिप्ती नवल, स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शहा यांना घेऊन न्यायव्यवस्थेतली विसंगती दाखवणारा ‘तेरे शहर में’ हा चित्रपट बनवला. पण निर्माता आणि प्रायोजकात वाद झाल्यानं तो डब्यात तर गेलाच. पण सरहदींना स्वतःचा फ्लॅटही विकावा लागला. २००४ मध्ये ज्या वेळी नवाजुद्दीन सिद्दिकीला फारसं कोणी ओळखतही नव्हतं, तेव्हा त्याच्यातील टॅलेंट हेरत त्यांनी त्याला पहिला ब्रेक दिला आणि ‘भ्रष्टाचार’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून ‘चौसर’ हा चित्रपट बनवला. पुढे शाहरुखला ओळख मिळवून देणाऱ्या ‘दिवाना’चे आणि पदार्पणातच यशाला गवसणी घालणाऱ्या ऋतिकच्या ‘कहो ना प्यार है’चं संवादलेखन त्यांनी केलं. त्यानंतर त्यांची विस्कटलेली घडी पुन्हा काहीशी बसली. ‘हे जग चांगल्या लोकांसाठी राहण्यासाठी नाहीये’ अशी मांडणी करणारे डाव्या विचारसरणीचे ‘सरहदी’, ‘जग राहण्यालायक करणं ही आपलीच जबाबदारी आहे’ असा आशावादही मांडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com