मुलांना वाचतं करण्यासाठी...

डॉ. राजेंद्र कुंभार
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

डिजिटल युगातील मुलांना मोबाईल अथवा अन्य गॅझेटवर वाचनाची सवय लागली आहे. पण, हे वाचन वेगाने होत असल्याने त्यातून सखोल ज्ञान मिळत नाही. मुलांना उत्तम वाचक बनवायचे असेल, तर मुद्रित पुस्तके त्यांना उपलब्ध करून ती वाचण्याची सवय लावावी. त्यासाठी त्यांना वेळ उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय पालकांनी आजच्या (ता. १५) ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त करायला हवा.

डिजिटल युगातील मुलांना मोबाईल अथवा अन्य गॅझेटवर वाचनाची सवय लागली आहे. पण, हे वाचन वेगाने होत असल्याने त्यातून सखोल ज्ञान मिळत नाही. मुलांना उत्तम वाचक बनवायचे असेल, तर मुद्रित पुस्तके त्यांना उपलब्ध करून ती वाचण्याची सवय लावावी. त्यासाठी त्यांना वेळ उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय पालकांनी आजच्या (ता. १५) ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त करायला हवा.

सध्या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. जणू मोबाईल हा मानवाचा एक अवयव झाला आहे. मोबाईलच्या उपयुक्ततेबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मोबाईलचे अनेक दुष्परिणाम आढळतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. मुले मोबाईल खूप वेळ खेळतात किंवा खूप वेळ मोबाईलद्वारे इंटरनेटवर काहीतरी शोधत, वाचत राहतात; तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर सतत काहीतरी येत राहते किंवा त्यांना वाटते की दुसरे काहीतरी आणखी वेगाने शोधावे. यामुळे त्यांचे वाचनावर लक्ष केंद्रित होत नाही. उलट त्यांचे लक्ष सतत विचलित होत राहते. डिजिटल वाचनातून मुलांना सखोल वाचनाची सवय लागत नाही. उलट मुलांना असंबंधित विषयावरील माहितीचे अनेक तुकडे वाचनाची सवय लागते. सलग आशय दीर्घकाळ वाचण्याची सवय डिजिटल वाचनाने लागणे शक्‍य नाही.

डिजिटल वाचन वेगाने केले जाते. वेगाने वाचन करून कोणीच सखोल ज्ञान मिळवू शकत नाही. त्यासाठी सावकाश वाचणे गरजेचे असते. डिजिटल वाचनामध्ये पळापळी असते. एका स्क्रीनवर मुले काही सेकंद असतात, तेव्हा ते फक्त माहितीचे मथळे वाचतात. खरेतर वाचन आणि विचार या दोन्ही प्रक्रिया एकत्रित व्हायला पाहिजेत. फारतर वाचन झाल्यावर लगेच विचार असे चालेल. परंतु, पळत पळत डिजिटल वाचन करण्याऱ्याला विचार करायला वेळ कुठे आहे? डिजिटल माध्यमांचा सर्वांत मोठा दुष्परिणाम हा आहे, की पुस्तके वाचण्यासाठी जी काही थोडी मुले पूर्वी जो काही थोडा वेळ द्यायची, तो वेळ आता ही मुले डिजिटल माध्यमांसाठी देत आहेत. डिजिटल माध्यमे वापरणाऱ्या मुलांचे वाचन कमी होत आहे.

वाचनामुळे शैक्षणिक कामगिरीत सुधारणा
वाचन कमी होणे, ही काही मानवी हिताची गोष्ट नाही. कारण, वाचनाचा मुलांना फायदा होतो. त्यांचे शब्दसामर्थ्य वाढते, त्यामुळे त्यांचे आकलन चांगले होते. या दोन्हींमुळे त्यांचे लेखन सुधारते. पर्यायाने त्यांची शैक्षणिक कामगिरी चांगली होते. वाचनामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता, कल्पकता वाढते. त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते. विशेष म्हणजे, वाचनाची गोडी लागलेली मुले अधिक वाचतात, अधिक चांगले वाचतात. वाचणारी मुले आजन्म वाचक होतात. अभ्यास आणि वाचन या दोन्हींचा परस्परसंबंध आहे. परंतु, या दोन्ही प्रक्रिया एक नाहीत. परीक्षेत गुण मिळविणे, पदवी प्राप्त करणे हा अभ्यासाचा मूलभूत उद्देश असतो. अभ्यासातून एखाद्या विषयाचे तज्ज्ञत्व प्राप्त होते; तर वाचनातून मुलांचा मानसिक, भावनिक, सामाजिक विकास होतो. वाचनामुळे मुले इतरांप्रती अधिक सहृदयी होतात.

त्यांच्यामध्ये सहानुभूतीची भावना वाढीस लागते. समाजाप्रतीच्या जबाबदारीची त्यांना जाणीव होते. वाचनामुळे मुलांचे भावनिक विश्व अधिक समृद्ध होते. कारण, वाचनाच्या माध्यमातून त्यांना सर्व भावभावनांची ओळख होते. पालक मुलांना अभ्यासासाठी जेवढे प्रोत्साहन देतात, तेवढेच प्रोत्साहन त्यांनी आनंददायक वाचनासाठीही दिले पाहिजे. म्हणजे काय केले पाहिजे, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पुढील परिच्छेदांमध्ये याचे उत्तर आहे.  

रोज पुस्तक वाचून दाखवा
तुमचे मूल एक दिवसापासून ते पाच/सहा वर्षांचे असेल तर त्याला तुम्ही गोष्टीची पुस्तके मनसोक्त वाचून दाखवा. मुलांनी समृद्ध जगावे, यासाठी त्यांना रोज एक पान वाचून दाखवा. रोज एक पान वाचून दाखवल्यास सहा वर्षांमध्ये तुम्ही सुमारे चार कोटी शब्द मुलाच्या मेंदूमध्ये साठवू शकता. एकदा का त्याच्या मेंदूचे तळे शब्दांनी ‘ओव्हरफ्लो’ व्हायला लागले, की शब्द त्याच्या बोलण्यातून आणि लेखनातून निरंतर वाहू लागतील. मुलांना मुद्दाम मुद्रित पुस्तके वाचून दाखवा. त्यामुळे मुलांना ‘पुस्तक’ या आनंददायक माध्यमाची ओळख होईल. वाचून दाखवलेला आशय म्हणजेच गोष्ट आनंददायक असल्यामुळे पुस्तक = वाचन = आनंद हे सूत्र मुलांना जाणवेल.

पुस्तक = अभ्यास हे सूत्र मुलांना फार आनंददायक वाटत नाही. दुसरा फायदा असा, की वाचून दाखवताना मुलांना पालकांचा सहवास लाभतो. तो त्यांना हवा असतो. तुम्ही स्वतः मोबाईलच्या सहवासात असता, तेव्हा मुलेही मोबाईलचा सहवास मिळविण्याचा प्रयत्न करतात. गोष्टीची पुस्तके वाचून दाखवल्यामुळे पालक आणि मूल यांच्यातील नाते अधिक दृढ होते, असे संशोधन सांगते. तुम्ही वाचून दाखवता तेव्हा मुलांना एक आदर्श वाचक पाहावयास मिळतो. ज्या मुलांना वाचून दाखवले जाते ते लहानपणी किमान वाचनाचा अभिनय करतात आणि हीच मुले पुढे उत्तम वाचक होतात.   मुलांना वाचते करण्यासाठी आणखी एवढेच करा, की दर महिन्याला मुलांना पुस्तकाच्या दुकानात घेऊन जा. तसेच, त्यांना सार्वजनिक ग्रंथालयातही नियमिपणे घेऊन जा. त्यांना खूप पुस्तके पाहण्याची संधी द्या. त्यांच्या आवडीची शक्‍य तेवढी पुस्तके अगदी कॉमिक्‍ससुद्धा घेऊन द्या. विशेष म्हणजे, मुलांना वाचनासाठी वेळ उपलब्ध करून द्या. चित्रकला, संगीत, कराटे, खेळ, यासाठी तुम्ही मुलांना मुद्दाम वेळ उपलब्ध करून देता, त्याचबरोबर आनंददायक वाचनासाठी; मनसोक्त वाचनासाठी मुलांना रोज किमान एक तास उपलब्ध करून द्या.

साधारणपणे पाच वर्षांपर्यंत मुलांना मुद्रित पुस्तके वाचून दाखवा. मुद्रित पुस्तके वाचू द्या. मुले पाच/सहा वर्षांची झाल्यावर त्यांना डिजिटल वाचनाच्या, मोबाईल वापरण्याच्या फायद्या-तोट्यांबाबत जागरूक करा, ‘साक्षर’ करा आणि मग त्यांना मुद्रितबरोबर डिजिटल वाचनसाहित्य वापरायला द्या. आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुलांना वाचते करण्याचा निश्‍चय करूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr rajendra kumbhar