एकटेपणाचं सुख

एकटेपणाचं सुख

मी दरवर्षी जाते तशी दहा दिवस शांतपणे लिखाण करता येईल अशा जागी तब्बल दहा दिवस हल्लीच एकटी जाऊन आले. माझ्या या वार्षिक दौऱ्यांसाठी मी लहान, शांत जागा निवडते. शक्‍यतो पर्यटकांसारखी वणवण भटकत नाही आणि माझ्या सुटीचा, एकटेपणाचा आणि त्या मनोहर जागेचा पुरेपूर सदुपयोग करत मनसोक्त लोळते, वाचन करते, लिहिते आणि काही वेळ नुसतीच रिकाम्या डोक्‍याने त्या वेळेत, त्या क्षणात जगते. परंतु आजही दरवेळी माझा हा बेत ठरू लागला, की ‘एकटी कशाला जातेस’ इथपासून ‘असं एकाकी जगणं बरं नाही,’ पर्यंत सर्व ऐकायला मिळतं. माझ्या सुरक्षिततेबाबतची त्यांची काळजी कळते. परंतु एकटं स्वतःसाठी काही करणं याबाबतीत नकारात्मकता का असावी, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. 
आपल्या समाजात एकटेपणाकडं सहसा चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. माझ्या मते याचं कारण हे असू शकतं, की आपण ‘एकटं राहणं’ आणि ‘एकाकी असणं’ यातलं अंतर लक्षात घेत नाही. एकाकी असणं हे थोडं नकारात्मक असू शकतं. परंतु एकटेपण हे आपण आपल्या गरजेप्रमाणं वापरू शकतो. माझ्या मते एकटं राहणं ही एक सकारात्मक निवड आहे. आपल्याला कितीही दुसऱ्याची गरज असली, तरीही आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या विकासासाठी थोडा काळ एकटं राहणं गरजेचं आहे.

लहानपणापासून एकटं राहणं चांगलं नाही हे ऐकतच आपण मोठे होतो. मग हळूहळू सतत कुणी तरी पाहिजे याची सवय होऊ लागते. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे तर आपले नाही, तर परकेही कुणी ना कुणी कुठल्या न कुठल्या मीडियावर आपल्यासाठी उपलब्ध असतात. अशी सवय झाल्यावर ज्या वेळी कुणी उपलब्ध नसतं, त्या वेळी आपल्याला भरपूर त्रास होतो. या त्रासाची कारणे तीन - एक तर आपण त्याचा अर्थ असा लावतो की कुणाला माझी गरज नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःसोबत काय करायचं हेच आपल्याला सुचत नाही. तिसरी आणि महत्त्वाची बाब अशी की सतत दुसऱ्यांबरोबर राहून, बोलून आपली स्वतंत्रपणं विचार करण्याची क्षमता खुंटते आणि स्वतः निर्णय घ्यावा लागतो अशा वेळी आपण भीतीपायी निराश होतो. 

ज्यांना दिवसातला थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढायची सवय असते ते दुसऱ्याच्या सहवासात आनंद घेतात आणि एकटे असतानाही आनंदात असतात. त्यांचे छंद असतात आणि त्यांच्याकडे निसर्गाशी जुळवून घेण्याची कला असते. कितीही गर्दी असो किंवा एकांत ते स्वतःची ओळख गमावत नाहीत. कुठलाही अभ्यास करायला एकाग्र होण्यात त्यांना कुठलीही अडचण येत नाही. लहानपणापासून रोज थोडा वेळ तरी स्वतःसाठी कुठलंही विशेष काम डोक्‍यात न ठेवता आणि सर्व तंत्रज्ञान बाजूला ठेवून एकटं राहण्याची सवय मुलांना लावली तर त्यांची अभ्यासाची आणि सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढेल. आपणही कुठल्याही वयाचे असलो, तरी आजपासून स्वतःसाठी रोज थोडा वेळ काढायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com