तळमळीचा विज्ञानलेखक

डॉ. श्रीराम गीत
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नामवंत प्राध्यापक, गाजलेले विज्ञानलेखक आणि ‘अभाविप’चे कार्यकर्ते अशा तीन भूमिका अनेक दशके निभावणारे संयत, गंभीर, अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. मोहन आपटे यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप.

नामवंत प्राध्यापक, गाजलेले विज्ञानलेखक आणि ‘अभाविप’चे कार्यकर्ते अशा तीन भूमिका अनेक दशके निभावणारे संयत, गंभीर, अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. मोहन आपटे यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप.

शास्त्रीय लिखाणातून साध्या शब्दात सर्वसामान्य वाचकांना अनेक विषय सोपे करून, उलगडून दाखवण्यात अक्षरशः सारे आयुष्य वेचलेले प्रा. मोहन आपटे यांचे मंगळवारी निधन झाले. पाच डिसेंबर १९३८ चा त्यांचा जन्म होता. त्या अर्थाने ‘चांद्रयान’ या अत्यंत देखण्या ग्रंथाच्या लेखकाच्या सहस्त्र चंद्रदर्शनाचा योग अगदी थोडक्‍यात हुकला असे म्हणावे लागेल. सुमारे ४० पेक्षा जास्त विज्ञानग्रंथांचे ते लेखक होते.

प्रा. आपटे हे  राजहंस प्रकाशनाचे विज्ञान विषयावरचे लाडके लेखक. पदार्थविज्ञानासारख्या अवघड विषयाचे अध्यापन करतानाच साऱ्याच विज्ञान विषयांना त्यांनी गवसणी घातली होती. १९९७ मध्ये ‘इंटरनेट एक कल्पवृक्ष’ या नावाने येऊ घातलेल्या युगाची चाहूल जशी त्यांनी वाचकांना सादर केली; तसेच निसर्गाचे गणित, संख्यांचे गहिरे रंग, कृष्णविवर, नभ आक्रमिले, विश्‍वात आपण एकटेच आहोत काय? अशा विविध विषयांवरची त्यांची ग्रंथसंपदा आहे. निव्वळ मुलांसाठी ‘मला उत्तर हवंय’ या नावाने पाच भागांची माहितीपूर्ण मालिका त्यांनी लिहिली. ‘त्या अर्थाने एका पिढीला त्यांनी पदार्थविज्ञान शिकवले, तर अनेक पिढ्यांना विज्ञानसन्मुख करण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या ‘भवन्स कॉलेज’मध्ये त्यांनी अध्यापन केले.  पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे विज्ञानविषयक अनेक भाषणे, कार्यशाळा त्यांनी घेतल्या.

वैयक्तिक आयुष्यात प्रा. आपटे हे शिस्तीचे भोक्ते होते. लेखनासाठीची बैठक, विषयाची निवड केल्यानंतर त्यासाठी द्यावा लागणारा वेळ व पुस्तकाच्या निर्मितीदरम्यान त्यात घालावे लागणारे वैयक्तिक लक्ष याचा प्राध्यापकी पेशावर काडीचाही परिणाम होणार नाही याची काळजी ते घेत असत. ‘चांद्रयान’ या ग्रंथ प्रकल्पामध्ये अनेक क्‍लिष्ट आकृत्या, फोटो होते. त्या नीट ग्रंथबद्ध होण्यासाठी विलक्षण नेमक्‍या सूचना ते आर्टिस्टला देत. पुण्यातील हौशी खगोल निरीक्षकांसमोर झालेली त्यांची व्याख्याने ऐकण्याचा योगही आला होता. ‘अभाविप’चे संस्थापक यशवंतराव केळकर यांना प्रा. आपटे हे गुरुस्थानी मानत असत. यशवंतरावांकडून मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संदर्भात कौतुकाचे चार शब्द ऐकतानासुद्धा (कै.) बाळासाहेब आपटे व प्रा. मोहन आपटे या द्वयींचा उल्लेख नेहमी येत असे. 

‘अभाविप’च्या बांधणीसाठी प्रयत्न
जुन्या काळातील ‘अभाविप’च्या बांधणीसाठी ज्यांनी अक्षरशः खस्ता खाल्या, त्यात मोहन आपटे होते. नामवंत प्राध्यापक, गाजलेले विज्ञान लेखक व विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या तीन क्षेत्रांतील भूमिका अनेक दशके निभावणारे संयत, गंभीर, अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. विज्ञान कार्यक्रमात छोट्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या साध्या, अवघड व अनवट अशा प्रश्‍नांना उत्तरे देताना साऱ्याच सभागृहाला ते मंत्रमुग्ध करीत असत. अशा श्रेष्ठ विज्ञानलेखकाला मनोभावे श्रद्धांजली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr shriram git