विशेष : जागृतीचा वसा घेतलेली पत्रकारिता

एकनाथ बागूल
Friday, 20 September 2019

लोकशिक्षण आणि समाजजागृती हे वर्तमानपत्रांचे आद्य कर्तव्य आहे, असे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांनी स्वतःचे वर्तमानपत्र सुरू करण्याचे मुख्य प्रयोजन असल्याचे आरंभीच आपल्या पत्रात नमूद केले होते. स्वतंत्र भारतातील वर्तमानपत्रांच्या त्या आद्य कर्तव्याचे भान पत्रकारितेच्या क्षेत्राला आज आहे काय, असा प्रश्‍न देशातील अनेक विचारवंत अलीकडे विचारत आहेत.

लोकशिक्षणाचे साधन म्हणून पत्रकारिता करणारे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या कार्याचे स्मरण आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त विशेष लेख.

लोकशिक्षण आणि समाजजागृती हे वर्तमानपत्रांचे आद्य कर्तव्य आहे, असे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांनी स्वतःचे वर्तमानपत्र सुरू करण्याचे मुख्य प्रयोजन असल्याचे आरंभीच आपल्या पत्रात नमूद केले होते. स्वतंत्र भारतातील वर्तमानपत्रांच्या त्या आद्य कर्तव्याचे भान पत्रकारितेच्या क्षेत्राला आज आहे काय, असा प्रश्‍न देशातील अनेक विचारवंत अलीकडे विचारत आहेत. सध्या खपासाठी आणि जाहिरातींसाठीची टोकाची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेला आणि नवनव्या आव्हानांना तोंड देताना वृत्तपत्रांना बरीच कसरत करावी लागत आहे. पण ते करीत असताना आपले मूळ ध्येय वृत्तपत्रे विसरली आहेत काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

अशा परिस्थितीत नानासाहेबांच्या पत्रकारितेचे स्मरण नक्कीच उपयुक्त ठरेल. ध्येयवाद न सोडता व्यवसाय यशस्वी करता येतो, हे त्यांना दाखवून दिले आणि त्याच मार्गाने गेली ८७ वर्षे ‘सकाळ’ची वाटचाल सुरू आहे.
या बाबतीत अनेक उदाहरणे देण्यासारखी आहेत. जाहिरात हा वृत्तपत्रांच्या उत्पन्नाचा मोठा आधार. परंतु ‘सकाळ’ने ब्रिटिश राजवटीत आदर्श कर्तव्याचे पालन करण्याचे धोरण ठामपणे स्वीकारल्यामुळे तत्कालीन सरकारने जाहिराती पुरविण्याच्या संदर्भात ‘सकाळ’चे नाव काळ्या यादीत टाकले होते.

पुण्याच्या तत्कालीन नगराध्यक्षांच्या मोटारीला अपघात झाला होता. मात्र या घटनेचे वृत्त छापता कामा नये, असा आदेश मिळाल्यानंतरही ‘सकाळ’ने कर्तव्यधर्म पाळला. परिणामी, ‘सकाळ’ला पालिकेच्या जाहिरातींना दीर्घकाळ मुकावे लागले. पण अशा प्रतिकूल प्रसंगांवर ‘सकाळ’ने मात केली ती भक्कम वाचकाश्रयाच्या जोरावर. दर्जेदार आशय, ताज्या बातम्या आणि विषयांचे वैविध्य या माध्यमातून नानासाहेबांनी वाचकांशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने अशा प्रकारची कोणतीही दडपणे त्यांना विचलित करू शकत नसत.  

वृत्तपत्र व्यवसायाला स्पर्धेने ग्रासले आहे, ही वस्तुस्थिती अमान्य करता येणार नाही. अशा वातावरणात वृत्तपत्र कर्मचाऱ्यांचे वेतन, जाहिरातींचे उत्पन्न, एजंट, विक्रेते यांच्या मागण्या आदींशी सामना करताना वृत्तपत्रांचा जीव मेटाकुटीस येणे स्वाभाविक आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्रांपुढे नफा-तोट्याचा मुद्दा जटिल ठरतो. जाहिरातदार आणि वाचक या दोन महत्त्वाच्या घटकांना एकाच वेळी समाधान देण्याचे धोरण ‘सकाळ’ने मराठी वृत्तपत्रसृष्टीत सर्वप्रथम अवलंबले आणि त्याचेच अनुकरण अन्य वृत्तपत्रांनीही केल्याचे दिसते.

नानासाहेब परुळेकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाची डॉक्‍टरेट पदवी संपादन केली होती. ‘तत्त्वज्ञान’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. हे यश संपादून परुळेकर मायदेशी परतले. युरोपातील तीन वृत्तपत्रांसाठी भारतातून बातमीपत्रे पाठविण्याचे काम ते करीत होते. पण त्यांची महत्त्वाकांक्षा होती, वृत्तपत्र सुरू करण्याची. त्यांना भारतीय जनतेचे अज्ञान, दारिद्य्र आदी प्रश्‍न सतावीत होते. त्याचे वृत्तपत्राद्वारे निवारण करण्याचा त्यांचा निर्धार होता. या पार्श्‍वभूमीवर नानासाहेबांनी पुण्यात छोट्या जागेत एक जानेवारी १९३२ रोजी ‘सकाळ’ सुरू केला. ‘ज्ञानप्रकाश’, ‘केसरी’ आदी स्थानिक थोरल्या भावंडांना दैनिकाच्या खपाच्या संदर्भात तोंड देणे त्या काळात सोपे नव्हते.

स्थानिक दुर्लक्षित सामाजिक विषय नानासाहेबांनी आपल्या दैनिकात सदरांच्या स्वरूपात वाचकांपुढे ठेवले. दैनंदिन बाजारभाव, स्थानिक कार्यक्रम, बागकाम, नाट्यवाचन स्पर्धा, कीर्तनकारांना उत्तेजन असे अनेक उपक्रमही सुरू केले. त्यांबरोबरच भाजीवाले, झाडूवाले, ज्योतिषी, भिक्षेकरी, झोपडपट्टीवासीय आदी समाजाचे सर्व घटक आपल्या वृत्तपत्राच्या परिघात सहजपणे आणले. तोपर्यंत वृत्तपत्रांना वर्ज्य असणारे कितीतरी विषय बातमीच्या रूपाने ठळकपणे प्रारंभापासून ‘सकाळ’मध्ये वाचकांच्या नजरेस पडू लागले. समाजाच्या सर्व थरांत ‘सकाळ’ पोचला. ते वैशिष्ट्य आजही कायम आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ ही योजनादेखील नानासाहेबांची एक कल्पक योजना. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला. ‘सकाळ’च्या त्या योजनेमध्ये मी सामील होण्याचे ठरविले. दरमहा ४० रुपये वेतन आणि कामाची वेळ रोज चार तास. इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांमध्ये नाव कमावलेले अनेक व्यासंगी आणि अभ्यासू पत्रकार ‘सकाळ’च्या मांडवाखालूनच कमी-जास्त काळ वावरले होते, हेदेखील येथे उल्लेखनीय वाटते. स्वतः परुळेकर अनेकदा कार्यालयात सकाळी १० पासून रात्री १० पर्यंत बसत. रोजच्या अंकामधील बातम्या आणि त्यांचे भाषांतर याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. शीर्षकांकडे त्यांचा जास्त कटाक्ष असे.

बातम्यांबाबत व्यक्ती, संस्था-संघटना किंवा राजकीय पक्षांवर अथवा विरोधी विचारांवर बंदीचा विचार परुळेकरांनी कधीही केला नाही. नानासाहेब आणि आचार्य अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावर मतभेद होते. अत्रे यांनी नानासाहेबांवर यथेच्छ टीका केली होती. एकदा ‘सकाळ’ कार्यालयाच्या जिन्यातच नानासाहेबांची चित्रकार डी. डी. रेगे यांच्याशी भेट झाली.

नानासाहेबांनी त्यांना विचारले, ‘‘सध्या कोणते नवीन चित्र काढताय?’’ त्यावर संकोचाने रेगे यांनी सांगितले, की पुणे नगरवाचन मंदिरात लावण्यासाठी आचार्य अत्रे यांचे तैलचित्र काढतोय! त्यावर नानासाहेब उद्‌गारले, ‘‘अहो हा तर बातमीचा विषय आहे. छायाचित्रासह त्या तैलचित्राची बातमी आमच्याकडे धाडून द्या!’ नानासाहेब पत्रकारिताधर्म कधीही सोडत नसत, याचे हे उदाहरण. त्यांना बातमीच्या बाबतीत कोणताही राजकीय पक्षपात मंजूर नव्हता. शनिवारवाड्यापुढे ‘सकाळ’च्या अंकाची जाहीर होळी झाली, त्याचीही सचित्र बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. छपाई खात्याकडे त्यांचे विशेष लक्ष असे. नवीन आणलेले परदेशी बनावटीचे रोटरी मशीन आणि त्याच्या दैनंदिन देखभालीसाठी ‘विलमॉट’ नावाच्या कॅनेडियन इंजिनिअरची नेमणूक त्या संदर्भात महत्त्वाची म्हणावी लागेल. ते नेहेमीच पुढच्या काळाचा विचार करीत. हा भविष्यवेध हे ‘सकाळ’चे एक वैशिष्ट्यच ठरले आहे. आज सिटिझन जर्नालिझमचा जो प्रवाह दिसतो आहे, त्याची मुळे नानासाहेबांच्या पत्रकारितेतही दिसतात.

‘सकाळ’च्या वाटचालीत प्रारंभीच्या काळात आव्हाने बरीच आली. अंकाच्या किमतीत वाढ केल्यास खपावर परिणाम होईल, असे विक्रेत्यांनी निदर्शनास आणले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘किंमत वाढविल्यास आपण पाने व मजकूर जास्त देऊ शकतो. महागाईतही लोक सिनेमाच्या तिकीटवाढीला तयार होतात. म्हणजेच लोक अधिक पैसे खर्च करावयास तयार असतात; परंतु त्यांना त्याचा योग्य मोबदला हवा असतो, त्यांची ही अपेक्षा रास्त असते.’’

एका मध्यमवर्गीय माणसाने स्वावलंबनाद्वारे केवढे मोठे यश संपादन केले! नानासाहेबांनी कष्ट आणि योजकतेने वाढविलेल्या ‘सकाळ’ची प्रगती आजही निरंतर सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व खानदेशात ‘सकाळ’ने आवृत्त्या काढल्या. स्पर्धेच्या वातावरणात स्वतःचे यश कायम टिकविलेच; पण समाजजागृती आणि लोकशिक्षणाचा वसा सोडला नाही. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले. आज हा माध्यमसमूह प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रवाहांना सामोरा जात आहे. त्यांच्या वेगाशी जुळवून घेत आहे. समाजोपयोगी उपक्रमांचा वारसा पुढे नेताना त्याला काळानुरूप परिमाण देण्यात येत आहे, हे विशेष. ज्ञान-विज्ञान, अंधश्रद्धानिवारण, आरोग्य, तसेच अर्थ, उद्योग आणि व्यापार आदी विविध विषयांना जास्तीत जास्त स्थान देण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न असतो. अंकातून आणि वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांतून वाचकांबरोबर निर्माण झालेले ‘सकाळ’चे बंध बळकट आहेत. परंपरा आणि नवता यांचा इतका चांगला मेळ क्वचितच दिसतो. `सकाळ’ला तो साधला आहे, हे महत्त्वाचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Eknath Bagul