प्रेमभावातील समर्पण

Hemkiran-Patki
Hemkiran-Patki

शहरापासून पाच-सहा किलोमीटर पूर्वेकडं चालतं गेलं की एक तळं आहे. तळ्याकाठी लिंबा-चिंचांची दाटी आहे. याच हिरव्या दाटीत गुलमोहराचंही झाड आहे. त्याच्या फांद्या हाताचा पंजा भुईला समांतर धरावा तशा आहेत. ही सारी झाडं पाहताना उन्हानं करपलेलं मन हिरवं हिरवं होतं. पाखरांच्या स्वरांनी हृदय माहेराला येतं. तळ्याच्या आजूबाजूला माणसांची फारशी वसाहत नाही. त्यामुळंही कदाचित पाखरांच्या तळ्याचा ओलावा नि आकाशाची नीलाई असावी. 

स्वतःशी संवाद करायची तातडी मला जेव्हा जाणवते, तेव्हा माझे पाय आपसूकच तळ्याच्या दिशेनं पडू लागतात. जणू तळं मला आरशासारखं सामावून घेतं आणि पुन्हा प्रतिमेवेगळंही करतं. या तळ्याकाठच्या शांततेत शब्दांशिवाय झालेल्या संवादानंतरचं समाधान आहे, असंच मला आजवर जाणवलं आहे. हे देवकुळीचं समाधान मला आपल्या बाहूत घेतं; म्हणतं, ‘तू तळ्याचा आहेस, तसा त्यात उतरलेल्या आकाशाचाही आहेस.’ हे शब्द मी माझ्या हृदयानं ऐकले आहेत. मनात येतं, परिसराचा लळासुद्धा काही सहज लागत नाही, त्यामागंही काही अज्ञाताचे संकेत असावेत. 

परवा असाच या तळ्याकाठी बसलो होतो. माझ्याआधीच एक जोडी येऊन तळ्यात वाकून पाहणाऱ्या गुलमोहराच्या झाडाखाली संवाद करत बसली होती. तारेवरली दोन पाखरं जशी आपल्यात एक स्वाभाविक अंतर ठेवतात, तसंच त्यांनी ठेवलं होतं. संवादांच्या स्वरांची पट्टी हळूवार झुळुकीनं सळसळणाऱ्या पानांसारखी होती. मला हे पाहून-ऐकून आनंद वाटला. भवतीच्या कोलाहलात एक हृदयसंवादच असा आहे की जो दोन जिवांना जोडू शकतो. माझं मन साहजिकच त्या दोघांतल्या संवादाच्या शब्दांत हरवून गेलं...

काही वेळानं दोघांचं बोलणं थांबलं. ती दोघंही निःशब्द होऊन आकाशातल्या नुकत्याच उगवणाऱ्या सायंताऱ्याला पाहू लागली. हे दृश्‍य मला खूपच रम्य नि हृदयंगम वाटलं. मी कुठल्याशा पुस्तकात वाचलं होतं ः प्रेम करणाऱ्यांची दृष्टी एकमेकांवर खिळलेली नसते; तर ती एकाच गोष्टीला भान हरपून निरखत असते. याचंच मला आज प्रत्यक्ष दर्शन घडत होतं. ती दोघंही स्वतःपलीकडं जाऊन एका नितांत सुंदरशा गोष्टीमुळं भावमुग्ध झाली होती. त्या दोघांचं हे ‘मी-तूपणाच्या’ पलीकडं जाणंच नव्हतं तर काय होतं? एक निरामय अवकाश त्यांना जणू खेचून घेत होतं. 

मनात आलं, जेव्हा आपण प्रेमानं भरलेले असतो, तेव्हा आपल्याला कुठल्याच भौतिक वस्तूचं अपुरेपण जाणवत नाही. आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला द्यावं वाटतं आणि देण्यानं आपलं चित्त प्रसन्न होतं. आपली भेट जो स्वीकारतो त्यानं आपण अनुग्रहित होतो, असाच आपला भाव असतो. निसर्गानं आपल्याला दिलेलं हे भरलेपण त्या अज्ञाताचं आपल्यावरलं शब्दांशिवाय असलेलं प्रेमच तर असतं. आपली चित्तवृत्ती निसर्गाच्या सहवासात जेव्हा अशी अपरंपार प्रेमानं उमलून येते, तेव्हा आपलं हृदयही आकाश होऊन जातं. दुसऱ्याचं स्वातंत्र्य आणि सुख पाहणाऱ्या प्रेमापेक्षा देखणी दुसरी कोणती अभिव्यक्ती असू शकेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com