अग्रलेख :  सुंभ जळाला... दंभ कायम

अग्रलेख :  सुंभ जळाला... दंभ कायम

सरहद्दीवरील तंगधर क्षेत्रात पाकिस्तानच्या कागाळ्यांना भारतीय लष्कराने धडक कारवाई करून चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांचे दोन तळ उद्‌ध्वस्त केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे पाकिस्तानने कांगावा करीत भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचे सांगण्यास सुरवात केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात या आरोपाबरोबरच मानवी हक्क, शांतता, सहकार्य, सद्‌भाव वगैरे शब्दांची बरीच चर्पटपंजरी करण्यात आली असून, या सगळ्यांवर भारत घाला घालत असल्याचा आरोप केला आहे. ‘मानवी हक्क’ या मूल्याविषयी कुणी बोलावे? कुठल्या तरी अमूर्त उद्दिष्टांसाठी निरपराध लोकांना कपटाने मारणाऱ्या दहशतवाद्यांना जो सर्व प्रकारची मदत पुरवतो, त्या देशाने? पण, असा खटाटोप तो देश सतत करीत आहे, याचे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर सभ्यपणाचा मुखवटा धारण करणे, ही पाकिस्तानची गरज आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या दौऱ्यातही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तो प्रयत्न केला; पण तो किती क्षीण होता, हेही जगाला दिसले. 

दोन कारणांसाठी जागतिक समुदायाची सहानुभूती मिळविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे. दिवाळखोर धोरणांमुळे देशाचे आर्थिक कंबरडे मोडल्याने त्या देशाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची गरज आहे. दुसरीकडे, काश्‍मीर प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विशेषतः जम्मू-काश्‍मीरसाठीचे ३७०वे कलम भारत सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानची अस्वस्थता जास्तच वाढली आहे. तेथील व्यवहार सुरळीत होऊ नयेत, यासाठी सातत्याने त्या देशाचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच काश्‍मिरातून सफरचंदांचे ट्रक देशाच्या अन्य भागांत नेणाऱ्या दोन ट्रकचालकांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यामागचे इरादे उघड आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तान पोसतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या धोरणात बदल करण्याचे शहाणपण त्या देशाला सुचेल असे एकही लक्षण आढळत नाही. तरीही, पॅरिसस्थित ‘फायनान्शिअल ॲक्‍शन टास्क फोर्स’ (एफएटीएफ)ने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकलेले नाही. फेब्रुवारी २०२० पर्यंत दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी पाकिस्तानने ठोस उपाय योजले नाहीत, तर त्या देशाला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा सज्जड इशारा मात्र देण्यात आला आहे. तसे झाल्यास त्या देशावर कठोर आर्थिक निर्बंध लागू होतील. चीन, तुर्कस्तान आणि मलेशिया या देशांनी विरोध केल्याने पाकिस्तान कारवाईपासून बचावला. परंतु, त्या देशावरील टांगती तलवार कायम आहे, हे महत्त्वाचे. दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी त्यांचे आर्थिक स्रोत रोखायला हवेत, हा या कृतिदलाचा मुख्य उद्देश असून, त्यासाठी यापूर्वीच पाकिस्तानला समज देण्यात आली आहे. एकूण २७ निकषांवर पाकिस्तानकडून प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा होती; त्यापैकी केवळ एकाची अंमलबजावणी त्या देशाने केली. आता वाढवून मिळालेल्या मुदतीत तरी तो देश दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक व आनुषंगिक मदत रोखेल काय, हे सांगता येणार नाही. मुळात या देशात मुलकी सरकारवर लष्कराची पकड इतकी घट्ट झाली आहे, की पंतप्रधान इम्रान खान कितीही लंब्याचौड्या गप्पा मारत असले, तरी त्यांच्याकडे असलेले निर्णयाचे मर्यादित अधिकार पाहता ते धोरणात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या स्थितीत नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेले भाषणही कसरत करणारे होते. धार्मिक मूलतत्त्ववादाविषयी पाश्‍चात्त्य देश अवाजवी गवगवा करीत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. एकीकडे, पाकिस्तानच दहशतवादाचा बळी ठरत असल्याचा आक्रोश त्यांनी केला. पण, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करणार आहोत, याची स्पष्टता त्यांच्याकडे नव्हती. या प्रकारच्या निसरड्या भूमिकेमुळेच दिवसेंदिवस त्या देशाची स्थिती खराब होत चालली आहे. केवळ आर्थिकदृष्ट्याच तो देश डबघाईला आला आहे, असे नसून तेथील साऱ्या संस्थात्मक जीवनाला अक्षरशः वाळवी लागली आहे. इम्रान खान ‘नया पाकिस्तान’ची भाषा बोलत होते, तेव्हा ते या लोप पावू लागलेल्या नागरी संस्थांचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न करतील, असे एक वातावरण निर्माण झाले होते. पण, त्याबाबतीतील आशा-अपेक्षा झपाट्याने विरू लागल्या आहेत. लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर पाकिस्तान भारतविरोधाचा एककलमी कार्यक्रम राबवित आहे. सीमेवरील चकमकी वाढण्याचे हे कारण आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारांहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसवण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत जेव्हा चोख प्रत्युत्तर देतो, तेव्हा त्या देशाला ‘मानवी हक्क ’वगैरे विषय सुचतात. पण, असा दुटप्पी व्यवहार फार काळ चालू शकणार नाही, हाच ‘एफएटीएफ’ने दिलेल्या इशाऱ्याचा अर्थ आहे. सुंभ जळाला तरी दंभ कायम, अशी पाकिस्तानची अवस्था झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com