ढिंग टांग : जय केदारनाथ!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) नुकताच केदारनाथ यात्रेहून परतलो. अतिशय प्रसन्न वाटते आहे. विजयाचा अहंकार नाही, पराभवाचे भय नाही. साऱ्या चिंता, भय, काळज्या केदारनाथाच्या चरणी वाहून आलो आहे. आता कसली चिंता? मतमोजणीच्या आधी (आपणही) केदारनाथाची ट्रिप करावी, असे मी साडेपाच महिन्यांपूर्वीच ठरवले होते.

आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१आश्‍विन कृ. एकादशी.
आजचा वार : नमोवार (याने की गुरुवार...)
आजचा सुविचार : जय जय केदारनाथा, तुजचरणी ठेवियला माथा!
......
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) नुकताच केदारनाथ यात्रेहून परतलो. अतिशय प्रसन्न वाटते आहे. विजयाचा अहंकार नाही, पराभवाचे भय नाही. साऱ्या चिंता, भय, काळज्या केदारनाथाच्या चरणी वाहून आलो आहे. आता कसली चिंता? मतमोजणीच्या आधी (आपणही) केदारनाथाची ट्रिप करावी, असे मी साडेपाच महिन्यांपूर्वीच ठरवले होते. आमचे गुरुवर्य श्रीमान नमोजीऋषी यांनी तेथे जाऊन एक रात्र तप:साधना केली होती. त्याला एक रात्र म्हणायचे ते आपल्या मर्त्य लोकांच्या भाषेत! वास्तविक आपल्या घड्याळातले चोवीस तास म्हंजे श्रीनमोजींऋषींच्या लेखी चोवीस युगे!! (खुलासा : ब्रह्मदेवाचे घड्याळ थोडे पुढे असते. आपला एक सेकंद इज इक्‍वल टु ब्रह्माज वन युग असे सांगितले जाते. पण त्याला पुरावा नाही. असो.) मतमोजणीच्या आदल्या दिवशी केदारनाथाला जायचे, असे ठरवून टाकल्याने रिझर्वेशनला कोणतीही अडचण आली नाही. त्याप्रमाणे चार्टर हेलिकॉप्टरने तडक त्या पवित्रभूमीत लॅंड झालो.

ॐ महाकाल महाकाय महाकाल जगत्पते
महाकाल महायोगिन महाकाल नमोस्तुते...

 

..असे नामस्मरण करत केदारनाथाचरणी नतमस्तक झालो. कृतकृत्य वाटले. गुरुवर्य नमोजीऋषींनाही असेच वाटले असेल का?

गुरु श्रीनमोजीऋषींचा मी लाडका शिष्य आहे. गुरुने दाखविलेल्या मार्गाने चालत राहिले की ध्येय गाठता येते, हे मला माहीत आहे. म्हणून मी त्यांच्यासारखेच वागतो. त्यांच्यासारखाच पोशाख (पक्षी : जाकिट) घालतो. त्यांच्याप्रमाणेच बेरजेचे राजकारण करतो. त्यांच्याप्रमाणेच आश्‍वासने देतो. कारभारदेखील त्यांच्यासारखाच तडफेने करतो.

श्रीकेदारनाथाच्या भूमीत प्रचंड थंडी होती. एवढ्या थंडीत हेलिकॉप्टरने जायचे म्हंजे कठीणच. प्रचंड थंडीत तो पंखा कशाला? असे मी हेलिकॉप्टरच्या पायलटला म्हटलेदेखील. पण तो शहारला. जाऊ दे. तिथे ऊबदार कोट भाड्याने मिळतात. दर्शन आटोपले की कोटवाल्याला परत करायचा, अशी व्यवस्था आहे. मला श्रीनमोजींनी परिधान केलेला ऊबदार कोट घालण्याची इच्छा होती. पण तो कोट त्यांनी परस्पर घरी नेला, असे तेथील कोटवाल्याने पडेल चेहऱ्याने सांगितले. कोटाचे शंभर रुपये भाडे माझ्याकडे मागत होता. पण मी म्हटले, ‘सध्या क्‍याशलेस इंडिया जोरात आहे. कार्ड चालेल का?’ तो म्हणाला, ‘‘त्यांनीही कार्ड काढून दाखवले होते, पण या केदारनाथाच्या बर्फाळ पर्वतराजीत नेटवर्क कुठून असायला?’’ जाऊ दे.

श्रीकेदारनाथाची यथासांग पूजा झाल्यावर तिथल्या पुजाऱ्यांना विचारले की ‘‘वंदनीय श्रीनमोजीऋषींनी येथे कोठल्या गुहेत तपस्या केली होती. ते पवित्र स्थान दाखवण्याची कृपा करावी’’ त्यांनी एका पहाडाकडे बोट दाखवले. त्या पहाडावर एक गुहा असून तेथे श्रीनमोजीऋषींनी बारा युगे (पक्षी : बारा तास) घनघोर तपश्‍चर्या करून श्रीकेदारनाथाला प्रसन्न करून घेतले. तेथेच श्रीकेदारनाथबाबांनी दृष्टांत देऊन ‘वर माग’ असे सांगितले. हीच ती ऐतिहासिक जागा!

मतमोजणीपूर्वी आपणही त्या गुहेत बसून किमान दोनेक तास तरी तप:साधना करावी, असे भारी मनात होते. पण ती जागा काहीच्या काहीच उंचावर होती. तेवढे पाव मैल कोण चालेल? शेवटी तप:साधनेचा बेतरहित करून परतीच्या प्रवासाला लागलो. एवढेच.

ता. क. : तप:साधना करायला हवी होती, उगीच कंटाळा केला, असे आता टीव्हीवर निवडणुकीचे निकाल पाहताना वाटत आहे. असो. चालायचेच. ईश्‍वरेच्छा बलियसी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article jay kedarnath