#यूथटॉक : डर के आगे जीत है

Kamlakar-Ruge
Kamlakar-Ruge

न्यूनगंड वा वृथा अभिमान या दोन्हींच्या कचाट्यातून आपल्याकडील इंग्रजी भाषाशिक्षण या विषयाची सुटका करण्याची गरज आहे. भाषेविषयी या दोन भूमिकांच्या नजरेतून जे काही वाद झडतात, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. महानगरांमधील विद्यार्थी निदान आजूबाजूच्या वातावरणामुळे इंग्रजी भाषेशी परिचित असतो; परंतु ग्रामीण परिसरात राहणाऱ्यांना तीही संधी नसते. त्यांना इंग्रजी भाषेचं महत्त्व लक्षात येते, ते महाविद्यालयीन टप्प्यावर किंवा तेथून बाहेर पडल्यावर करिअरच्या वाटा धुंडाळताना. या बाबतीतील कोणताही पूर्वग्रह वा संभ्रम दूर करून या भाषेशी सलगी कशी वाढविता येईल, याचा विचार करायला हवा. त्या दृष्टीने तरुणमित्रांशी या सदराच्या माध्यमातून संवाद साधावा, असे वाटले.

मातृभाषा शिकत असताना आपण Listening, Speaking, Reading आणि Writing या पद्धतीनं शिकलो. पण दुर्दैवानं इंग्रजी भाषा याच्या अगदी उलट म्हणजे Writing, Reading, Speaking आणि Listening या क्रमानं शिकत आलो आणि तिथून इंग्रजी अवघड म्हणून आपल्यासमोर येत राहिली. इंग्रजी अवघड वाटण्याची तीन महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं आपली शिक्षणपद्धती. दुसरं आपल्या सभोवतालचं वातावरण आणि तिसरं म्हणजे आपले प्रयत्न. शालेय जीवनात इंग्रजी ही एक भाषा नसून, अनिवार्य विषय आहे असं आपल्यावर बिंबविण्यात आलं आहे. मग ती भाषा निव्वळ अभ्यासक्रमाचा विषय बनून आपल्या शाळेच्या वेळेपुरती मर्यादित राहू लागली. आपण मातृभाषा आणि इंग्रजी या दोन भाषांमधील अंतर पाहतो, तेव्हा स्पष्ट होते की मातृभाषा आपल्यात रुजवली गेली  आणि इंग्रजी फक्त शिकवली गेली. भावना व्यक्त करण्यासाठी एक सशक्त माध्यम म्हणून आपण भाषेचा वापर करतो. पण शालेय जीवनात निबंध लिहायला सांगायचे तेव्हा शिक्षक जे सांगायचे त्यापलीकडे जाऊन एखादी व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आपल्याला काय वाटते ते व्यक्त करण्याचा आपण कधी प्रयत्न केला नाही. इतकंच नव्हे तर ते स्वातंत्र्यही दिलं गेलं नाही. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनानंतर युवक करिअरसाठी बाहेर पडतो, तेव्हा इंग्रजीचं महत्त्व त्याला कळतं. इंग्रजी येत नसल्यामुळे युवक बेरोजगारी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निराशेच्या चक्रात अडकतो. 

‘डर के आगे जीत है’ असं म्हटलं जातं. आपण एखादं आव्हान स्वीकारत नाही, तोपर्यंत ते पेलण्याचं बळही आपल्या अंगी येत नाही. आपल्याकडे तहान लागल्यावर विहीर खणण्याची पद्धत आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतरच इंग्रजी भाषेचं महत्त्व आणि गांभीर्य लक्षात येतं. तेव्हा मात्र आपण हडबडून जागे होतो. इंग्रजीची आवड मनात निर्माण केली, तर इंग्रजी शिकणं ही सजा नव्हे, तर मजा बनून जाते. महानगरांमध्ये युवक हे आव्हान पेलत आहेतच हे दिसून येतं. पण काही वर्गांसाठी इंग्रजी अजूनही परकीयांची आणि मोठ्या लोकांची अवघड भाषा आहे. या न्यूनगंडामुळे हा वर्ग इंग्रजीपासून अलिप्त राहू पाहत आहे. सतत ऐकणं, वाचणं आणि बोलण्याचा प्रयत्न करत राहिलं तर जगातली कुठलीही भाषा शिकणं सहज साध्य आहे. इंग्रजीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्याला सामोरं जाणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. काही छोट्या-छोट्या गोष्टी सातत्यानं करत राहिलं तर इंग्रजी शिकणं अवघड नाही. एक काळ होता जेव्हा साधनं कमी असायची.

पण आता ‘यूट्यूब’, ‘गुगल’ आपल्या मदतीला आहेच; त्याशिवाय वेगवेगळी ॲप्लिकेशन्ससुद्धा उपलब्ध आहेत. ‘यूट्यूब’वरील इंग्रजी चित्रपट पाहणं, तसेच ‘गुगल’वर उपलब्ध ऑडिओ नियमित ऐकल्यानं इंग्रजी शब्दांचे उच्चार कसे करावेत, हे आपण शिकू शकतो. रोज इंग्रजी मजकूर वाचणं किंवा वृत्तपत्र वाचणं, त्यातील अवघड शब्दांची यादी व्यवस्थित अर्थासहित लिहिण्याची सवय लावून घेणं, मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत इंग्रजीत बोलण्याचा सराव करणं, आपला सोबती म्हणजे मोबाईलच्या मदतीनंही इंग्रजी शिकता येतं. पण अलीकडे शॉर्टकट पद्धत रूढ झाल्यामुळे स्पेलिंग खूपदा चुकतं. Auto Spell Corrector चा वापर करून हे टाळता येतं आणि मूळ शब्द समजण्यासही मदत होते.

शेवटी माणूस जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत शिकतच असतो. निसर्गातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टी काही ना काही शिकवीत असतात; पण मनात शिकण्याची जिद्द पाहिजे. रस्त्यावरून जाताना नजरेस पडणाऱ्या बाजारातील पाट्यासुद्धा इंग्रजी शब्द शिकवतात. शिकत असताना निरीक्षणशक्ती जागृत ठेवणं अत्यंत आवश्‍यक आहे. योग्य श्रवण, ग्रहण, निरीक्षण आणि व्यक्त व्हायला शिकलो, तर जगातील कुठलंही ज्ञान आपण मिळवू शकतो, यात शंका नाही.
(लेखक सोलापूरचे असून इंग्रजीचे अध्यापन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com