अग्रलेख : ‘महाजनादेशा’चे धिंडवडे! 

maharashtra janadesh
maharashtra janadesh

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता आठवडा उलटून गेला असला, तरीही नवे सरकार स्थापन होणे तर सोडाच; त्यासंबंधातील साधी चर्चाही भारतीय जनता पक्ष व शिवसेना या महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांदरम्यान सुरू झालेली नाही. ही निवडणूक या दोन पक्षांनी अन्य छोट्या पक्षांशी आघाडी करून लढवली होती आणि या महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे निकाल जाहीर होताच, तत्काळ नवे सरकार स्थापन होण्यात कोणतीच अडचण नव्हती. मात्र, गेले आठ दिवस शिवसेना आणि भाजप एकमेकांवर करत असलेल्या शरसंधानामुळे ‘आमचं ठरलंय!’ या निवडणूकपूर्व वाटाघाटींचे पितळ उघडे तर पडले आहेच; शिवाय राज्यातील प्रशासनही ठप्प होऊन गेले आहे. जनतेने महायुतीला दिलेल्या कौलाचा हा एक प्रकारे अपमानच आहे. एकीकडे राज्यात दिवाळी उलटून गेल्यावरही सुरू असलेल्या पावसाच्या थैमानामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. राज्यातील रयत त्यामुळे कमालीची हवालदिल झालेली असताना, मुख्यमंत्रिपदावरून आणि सत्तेच्या समान वाटपावरून शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आधीच ‘पंतप्रधान पीक विमा योजने’त खासगी विमा कंपन्यांकडून नाडला गेलेला शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत जेरीस आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि राज्यातील सरकार सध्या ‘काळजीवाहू’ अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांची काळजी कोणालाच नाही, असे चित्र उभे राहिले आहे. मात्र, सत्तेच्या चतकोर-नितकोर वाट्यावरून भाजप व शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादंगाचे रूपांतर आता पोरखेळात झाले आहे आणि त्यांच्या मैत्रीचे पुरते हसू झाले आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आणि विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘आठ-नऊ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते!’ या वास्तवाची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. मात्र, त्यानंतरही ‘ठरवले, तर आम्ही आवश्‍यक ते बहुमत सिद्ध करू शकतो,’ असे प्रत्युत्तर देऊन शिवसेनेने भाजपला शह देण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

अर्थात, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी धरलेल्या या हट्टाचे कारण निवडणूक निकालातच आहे! निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे ‘अबकी बार, २२० पार!’ अशा गमजा मारत होते आणि भाजपची मनीषा तर आपण १६४ जागा लढवत असलो, तरीही १३० पेक्षा अधिक जागा जिंकून, शिवसेनेचे आपल्या खांद्यावरील ओझे कायमचे फेकून देण्याची होती. प्रत्यक्षात भाजपच्या पदरात जेमतेम १०५ जागा पडल्या आणि शिवसेनेविना सरकार बनवताच येणार नाही, अशी अवस्था मतदारांनी निर्माण केली! शिवसेनेच्या अंगात बारा हत्तींचे बळ आले ते त्यामुळेच आणि त्यातूनच गेली पाच वर्षे सत्तेत असतानाही भाजपने केलेल्या अवहेलनेचा बदला घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात भर पडली ती फडणवीस यांच्या एका वक्‍तव्याची. ‘शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत काहीही ठरलेले नव्हते!’ या त्यांच्या विधानामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या समझोत्यानंतर ‘सत्तेत अर्धा-अर्धा वाटा’ हे स्पष्ट करणाऱ्या पत्रकार परिषदेची चित्रफीतच शिवसेनेने समोर आणली. अर्थात राज्यात झालेल्या या निर्नायकीचा फायदा उठवण्यास काँग्रेस नेते तयार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेबरोबर सरकार बनवण्याच्या तयारीबाबत केलेल्या सूचक वक्‍तव्यावरून स्पष्ट झाले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍तेही ‘भाजप-शिवसेना सरकार बनवू शकत नसेल, तर पर्याय देण्याची आमची तयारी आहे!’ असे सांगू लागले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार बनवण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे ‘पर्याय’ उभा करण्यात असलेल्या अडचणीही समोर आल्या आहेत. सत्तेच्या या पोरखेळात अखेर भरडली जात आहे ती राज्यातील सर्वसामान्य जनताच, हे या साऱ्याच पक्षांनी लक्षात घ्यायला हवे. 

मात्र, सत्तेसाठी सुरू असलेल्या या हाणामारीत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असलेल्या हालअपेष्टांची मुख्यमंत्र्यांना अखेर जाणीव झालेली दिसते. त्यामुळेच त्यांनी शुक्रवारी बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या दुर्दशेचा आढावा घेतला आणि त्याबाबत काही उपाययोजनाही जाहीर केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उभे केलेले शेतीच्या सध्याच्या अवस्थेचे चित्र मन हेलावून टाकणारे आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या दौऱ्यापासून साऱ्यांनीच बोध घ्यायला हवा. शिवसेना सध्या तरी या ‘काळजीवाहू’ सरकारचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांची तातडीने आणि काटेकोरपणे कार्यवाही करण्यासाठी पावले उचलायला हवीत. राज्यातील जनतेचे, विशेषतः बळिराजापुढील प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करीत असताना भाजप आणि शिवसेनेने मतदारांच्या कौलाचा आदर करून सरकार स्थापनेचे अडलेले गाडे लवकरात लवकर मार्गी लावावे, एवढीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com