अग्रलेख : काय सांगतो हा टक्का?

voting
voting

राज्यभरातील जवळपास ४० टक्‍के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. याच्या कारणांचा शोध घेणे आवश्‍यक आहे. मतदारांची उदासीनता हा लोकशाहीलाच धोका असतो.
महाराष्ट्र तसेच हरियानातील विधानसभा निवडणुकांचा धुरळा अखेर खाली बसला असून, आता पुढच्या पाच वर्षांसाठीचे सत्ताधारी कोण, या प्रश्‍नाचे उत्तर ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त झाले आहे. सोमवारी झालेल्या मतदानाच्या वेळी राज्यभरातील जवळपास ४० टक्‍के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामागे आळस, बेफिकिरी आहे, की वैफल्य याचा शोध घ्यायला हवा. तसा तो घेणे आवश्‍यक आहे, याचे कारण त्याचा लोकशाहीतील राजकीय प्रक्रियेशी संबंध आहे. मुंबई या राजधानीच्या आणि प्रगत महानगरात जेमतेम ५० टक्‍के मतदान झाले. महाराष्ट्रातील अन्य अनेक महानगरे आणि मोठी शहरे येथील मतदारांपेक्षा राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेने अनेक अडचणींवर मात करून आपला हा हक्‍क बजावला आणि त्यामुळेच एकूणात राज्याची मतदानाची सरासरी ६५ टक्‍क्‍यांपर्यंत जाऊ शकली. खरे तर पाच वर्षांतील या एकाच दिवशी मतदार हा ‘राजा’ असतो आणि त्याच्या हातात आपले भवितव्य निश्‍चित करण्याची संधी या दिवशी आलेली असते. मात्र, महाराष्ट्राच्या शहरी भागातील सुजाण नागरिक त्याबाबत उदासीन दिसले. कोणीही सत्तेवर आले, तरी आपल्याला काही फरक पडत नाही, अशी त्यांची धारणा झाली आहे का? ज्या सर्वसामान्य नागरिकाला या लोकशाहीने केंद्रबिंदू मानले आहे, तोच जर असा उदासीन राहत असेल, तर ही चिंता निर्माण करणारी बाब आहे. या परिस्थितीबाबत हक्क न बजावलेल्या मतदारांनी आत्मपरीक्षण करायला हवेच; पण त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्ष आणि समाजधुरिणांनीही त्याबाबत काही विचारमंथन करायला हवे. प्रचारात तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने यांविषयी प्रत्येक राजकीय पक्ष बोलत होता. समाजमाध्यमांवरही हा वर्ग निवडणूक काळात सक्रिय झालेला दिसला. मात्र, मतदानाच्या बाबतीत तरुणांनीही उत्साह दाखविलेला नाही.

गुरुवारी जाहीर होणाऱ्या निकालांबाबत भाकिते वर्तवणाऱ्यांचे पेव फुटले असून, महाराष्ट्राबरोबरच हरियानातही सर्व मतदानोत्तर चाचण्यांमधून भारतीय जनता पक्षाला कौल मिळाला आहे! अलीकडच्या काळात मतदानोत्तर चाचण्यांच्या पद्धतीत बऱ्यापैकी प्रगती झालेली दिसते. शास्त्रशुद्ध कार्यपद्धती वापरून चाचण्या घेणाऱ्यांचे अंदाज बरोबरही ठरलेले दिसले आहेत. तरीही, हे अंदाज आहेत; प्रत्यक्ष निकाल जाहीर व्हायचे आहेत, याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या या काळात महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढत होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वरुणराजाने मतदारांवर कृपा केली होती. अर्थात, मतदानाबाबत दिसलेल्या निरुत्साहाचे कारण हे पाऊस असूच शकत नाही. राज्याच्या ग्रामीण भागात जनता उत्साहाने मतदानात सहभागी होत असताना, आपल्या ‘मुंबई स्पिरिट’चे डिंडिम सातत्याने वाजवणाऱ्या मुंबईकरांना तर ते कारण पुढे करताच येणार नाही. शहरी भागाच्या तुलनेत जास्त असले, तरी ग्रामीण भागातील यंदाचे मतदानही गेल्या म्हणजे २०१४च्या निवडणुकीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी घसरलेच आहे. त्या वेळी मतदान ६३ टक्‍के होते. एकूणच, या निरुत्साहास अनेक पदर आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त मतदान हे सहसा सत्ताधाऱ्यांना घरी बसवण्यासाठी होत असते. यंदा शहरी भागातील जनतेला भाजप-शिवसेना युती ही निवडून येणारच आहे, अशी बहुधा खात्री झाली असावी! त्यामुळेच आपण मतदान केले काय आणि नाही केले काय, त्यामुळे काय फरक पडणार आहे, या सवालापोटी मतदार ‘राजा’ घरीच बसून राहिला असावा. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, घाऊक पक्षांतरामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले असतील. ‘राजकीय वर्गा’कडून जे काही साटेलोटे सुरू आहे, तो आपल्याला गृहीत धरण्याचा प्रयत्न आहे, असे लोकांना वाटलेले असू शकते. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत जास्त मतदान झाले, त्याचे एक प्रमुख कारण हे शिवसैनिक शेवटच्या क्षणी दगाफटका करून ‘युती’ तोडणाऱ्या भाजपच्या विरोधात अत्यंत त्वेषाने मैदानात उतरले होते. त्यामुळे मतदानाचा टक्‍का वाढला. यंदा कशीबशी झालेली युती आणि भाजप तसेच शिवसेना या सत्ताधारी आघाडीला तथाकथित मित्रपक्षांनी एकमेकांच्या जागा कमी करण्यासाठी आखलेली रणनीती, यामुळे मित्रपक्षाचा उमेदवार जेथे मैदानात आहे, तेथे दुसऱ्या पक्षाने मतदानाकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो. पश्‍चिम महाराष्ट्रात बंडखोरी, पुरामुळे निर्माण झालेला असंतोष, असेही घटक परिणाम घडविणारे ठरलेले असू शकतात. निकालानंतरच ही कारणे कळतील.ती काहीही असली, तरी मतदारांच्या या उदासीनतेबाबत गांभीर्याने विचार करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे! कोण्या मतदारास आपल्या मतदारसंघातील एकही उमेदवार निवडून येण्याच्या लायकीचा नाही, असे वाटू शकते. तरीही, त्या मतदाराने घरी बसता कामा नये, याचे कारण आपल्या निवडणूक व्यवस्थेत त्यासाठी ‘नोटा’ हा पर्याय आहे. पण, सध्या तरी मतदानाच्या आकडेवारीचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com