‘न्यूटन’चा मराठी तोंडवळा!

‘न्यूटन’चा मराठी तोंडवळा!

‘ऑस्कर’च्या स्पर्धेत पाठविण्यासाठी ‘न्यूटन’ची निवड हा मराठी माणसांसाठी नक्‍कीच अभिमानाचा क्षण आहे. दिग्दर्शक अमित मसूरकर व नायिका अंजली पाटील हे मराठी चेहरे यात झळकताहेत. तीन वर्षांपूर्वीच्या ‘सुलेमानी कीडा’ या लो बजेट चित्रपटानंतर मसूरकर यांना आणखी तसाच चित्रपट खुणावत होता. भ्रष्टाचार, घोटाळे, लाच हे विचार डोक्‍यात नव्हते. त्यांचे लक्ष गेले, नक्षलवाद, निवडणूक, राजकारण अशा वेगळ्या धाटणीच्या ‘ब्लॅक कॉमेडी’कडे. त्यातून साकारलेल्या ‘न्यूटन’चे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने ‘ऑस्कर’साठी पाठवण्याकरिता २६ चित्रपटांमधून नामांकन केलंय. ‘न्यूटन’मध्ये नाशिकच्या अंजली पाटीलने ‘मालको नेताम’ ही आदिवासी तरुणीची भूमिका साकारलीय. नैसर्गिक चेहरा व तसाच अभिनय या बळावर रसिकांच्या मनावर अमीट छाप उमटविणाऱ्या स्मिता पाटीलची आठवण अंजलीच्या अभिनयातून आल्याखेरीज राहत नाही. अंजलीने नाशिकमधील के. टी. एच. एम. महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. मग पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट’मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. 

‘दिल्ली इन अ डे’ या चित्रपटाने तिला ब्रेक मिळाला. हिंदी, तेलुगू, मल्याळम्‌, कन्नड, इंग्रजी, मराठी, तमिळी चित्रपटांमधून झळकलेल्या अंजलीला २०१३ मध्ये ‘विथ यू, विदाऊट यू’ या श्रीलंकन चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्री अन्‌ ‘प्रेसिडेअन्सिअल’ पुरस्कार मिळाला आहे. तिच्या तेलुगू चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. विशेष म्हणजे अंजलीचा ८ सप्टेंबरला ‘समीर’ आणि २२ सप्टेंबरला ‘न्यूटन’प्रमाणेच ‘उम्मीद’ असे एका महिन्यात तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासमवेत ‘काला’ चित्रपटात ती भूमिका साकारतेय. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’ मध्येही ती येतेय. मुंबईत माहिममध्ये जन्मलेल्या तरुण दिग्दर्शक अमितचे शिक्षण दादरमधील आईएस मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये झाले. माटुंगामधील रुपारेल महाविद्यालयात शिकला. त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. कारकीर्दीची सुरवात झाली लेखनाने. ‘चार दिन की चाँदनी’ ही मालिका, तसेच दि ग्रेट इंडियन कॉमेडी-शोचे लेखन केले. दिग्दर्शन केलेला दुसराच सिनेमा ऑस्करवारीवर निघाल्याने अमित खूश असल्यास नवल नाही. ‘मला आशा आहे, की आम्ही ऑस्कर जिंकू!’, असे अमितने म्हटले आहेच. 
- महेंद्र महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com