बांगलादेशी महिलांना न्याय

Characteristics-of-Bangladesh
Characteristics-of-Bangladesh

विवाह ही जीवनातील आनंददायी घटना असते. नव्या साथीदारासह सहजीवनाची गुंफण यातून होते. दक्षिण आशियातील मुस्लिमबहुल देशांमधील महिलांना मात्र या नव्या आयुष्याची सुरवात करताना विवाह प्रमाणपत्रात नवविवाहितेला ती ‘कुमारी’ आहे, विधवा किंवा घटस्फोटिता आहे, हे नमूद करणे अनिवार्य आहे. असे करणे म्हणजे महिलांच्या खासगीपणाचे उल्लंघन असून अपमानास्पद असल्याचे उजव्या गटांचे म्हणणे आहे. पण, आता बांगलादेशमध्ये विवाह प्रमाणपत्रात महिलांना ‘कुमारी’ असण्याची कबुली देण्याची गरज नसल्याचा निर्णय बांगलादेशमधील उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिला आहे. 

विवाह प्रमाणपत्रातून ‘कुमारी’ हा शब्द हटविण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. ‘कुमारी’ या शब्दाऐवजी ‘अविवाहित’ असे लिहावे असेही निर्देश दिले आहेत. बांगलादेशमधील महिला संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याचबरोबर या प्रमाणपत्रात विवाहित पुरुषाला देखील तो ‘अविवाहित’, ‘घटस्फोटित’ किंवा ‘विधुर’ आहे हे नमूद करणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे. 

बांगलादेश सरकारची बाजू यातून स्पष्ट झाली नसली तरी हा संपूर्ण निकाल न्यायालय ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत प्रसिद्ध करण्याची शक्‍यता असून, त्यानंतर प्रमाणपत्रात योग्य तो बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बांगलादेशमध्ये १९६१मध्ये विवाह आणि घटस्फोट कायदा अमलात आला. पुढे १९७४मधील बांगलादेश मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायद्यातही महिलांनी विवाह प्रमाणपत्राच्या अर्जात ‘कुमारी’ असल्याचे लेखी देण्याची अट घातलेली आहे. हा शब्द महिलांची मानहानी करणारा व भेदभावाला खतपाणी घालणारा असून, विवाह करणाऱ्या महिलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याची तक्रार महिला संघटनांच्या उजव्या गटाची होती. या विरोधात त्यांनी २०१४ मध्ये खटला दाखल केला होता. पाच वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया या गटाचे वकील अयनून नहर सिद्दिका यांनी व्यक्त केली.

बांगलादेशची वैशिष्ट्ये
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com