मुलाखतीत व्यक्तिमत्त्व मूल्यमापनाला महत्त्व

Interview
Interview

नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींचे स्वरूप वेगाने बदलत आहे. उमेदवाराचा मूळ कल, धारणा, बौद्धिक पात्रता, तांत्रिक ज्ञान, उपयोजित ज्ञान या सर्व गोष्टी तर असतातच; पण सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो तो व्यक्तिमत्त्व विकासाशी, वर्तनाशी निगडित. उमेदवार निवडीचे मापदंड आता बदलले असल्याने व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन हा कळीचा मुद्दा झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांमध्ये विविध कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींचे स्वरूप वेगाने बदलत आहे. तुम्ही कुठलेही पदवीधर असा, आयुष्यात लवकरच कमीत कमी ३० ते ४० मिनिटे अशी येतील, ज्यात दहावीपासून ते पदवीपर्यंतचा लेखाजोखा मांडला जाईल, तपासला जाईल.

नोकरीसाठी योग्य उमेदवार निवडण्याची वेळ येते, तेव्हा मूळ कल, धारणा, बौद्धिक पात्रता, तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्षात वापरलेले उपयोजित ज्ञान या सर्व गोष्टी असतातच, पण सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे तो व्यक्तिमत्त्व विकासाशी निगडित, वर्तनाशी संबंधित - Behavioral Interview. व्यक्तिमत्त्वाचे आकलन करताना, वर्तन हे हिमनगाचे टोक असते. त्याच्याखाली दोन गोष्टी आहेत- चरित्र आणि दृष्टिकोन. तरुण पिढीकडून नेमक्‍या याच भागाकडे एकतर दुर्लक्ष केले जाते किंवा त्यामागची बैठक समजून घेतली जात नाही. 

खूप वेगाने उद्योगांचे स्वरूप बदलत आहे. ‘इंडस्ट्री ४.०’ च्या युगात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञानाचा वेग व आवाका वाढला, उद्योगांपुढची आव्हाने वाढली, तरुण उमेदवारांकडून अपेक्षा वाढल्या, काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादा खूप टोकदार झाल्या, प्रकल्पांचे स्वरूप बदलले आणि ग्राहकांशी व्यवहार खूप आव्हानात्मक झाला. परिणामी, उमेदवार निवडीचे मापदंड बदलले. पाच वर्षांपूर्वी प्रश्‍न ठरलेले असायचे. उदा. तुमच्याबद्दल सांगा, कुटुंबाबद्दल सांगा, छंद/आवड, ताकदीची स्थळे वगैरे.

पण आता हे नवीन सहा प्रश्‍न बघा. 
* प्रश्‍न पहिला - अशी एखादी घटना/वेळ सांगा की तुम्ही चुकलात, त्याची भरपाई तुम्ही कशी केलीत? परिणाम काय? काय धडा घेतला?

* प्रश्‍न दुसरा - प्रकल्प, खेळ, सांस्कृतिक स्पर्धा, कोडिंग इव्हेंट- एक उदाहरण द्या, की तुम्ही संघाचे नेतृत्व करत होता. पण गोष्टी जुळून येत नव्हत्या. तुम्ही काही खास प्रयत्न केले? त्यामुळे नक्की फरक काय पडला?

* प्रश्‍न तिसरा - खरेच आव्हान वाटावे अशी वेळ आली आणि सर्व मदार तुमच्यावर होती. तेव्हा कसे प्रयत्न केलेत? काय मार्ग काढला?

* प्रश्‍न चौथा - तुम्ही संघाचे सदस्य असताना वेगळे काय करता, ज्यामुळे संघाला फायदा होतो/झाला. एक उदाहरण सांगा.

* प्रश्‍न पाचवा - कॉलेजमध्ये गटस्पर्धा चालू आहे. अचानक शेवटच्या क्षणी तुमच्यावर वेगळी कामगिरी सोपवण्यात आली. तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळली?

* प्रश्‍न सहावा - तुम्ही महत्त्वाच्या टप्प्यावर चूक केली, पण कुणाच्याही लक्षात आले नाही. तुम्ही काय केले? मनातून काय वाटले?
वाचताना एकदम साधे, पण खरी उत्तरे द्यायला अतिशय अवघड असे हे प्रश्‍न! यासाठी कुठलेही गाइड, नोट्‌स नाहीत. फाडफाड इंग्रजीचा उपयोग नाही, तांत्रिक हुशारी काहीही कामाची नाही. इथे होते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन. आपल्या मनाची व मेंदूची मशागत गेल्या २१-२२ वर्षांत कशी झाली? तुम्ही वेगवेगळ्या टीममध्ये सामावून घेतले जाऊ शकता काय? मुळात तुम्ही पुस्तकांबरोबर समाजातील सर्व स्तरांशी जोडले जाऊ शकता काय याची ही तपासणी. 

अशा स्वरूपाचे प्रश्‍न विचारून काय साध्य करायचे असते या तज्ज्ञ मंडळींना? उत्तर असे आहे - तुम्ही आपलेपणाने जबाबदारी घेता काय? वेळेआधीच योग्य पावले उचलता काय? एखाद्या अवघड वेळी संतुलितपणे मार्ग काढता काय? ‘मी’पणा बाजूला ठेवून संघात सामावून जाता काय? आयुष्यात काही मूल्ये जपता काय? त्यांच्याशी ठाम असता काय? चूक मान्य करून मोकळेपणाने संवाद साधू शकता काय? या सर्व गोष्टींची मानसशास्त्रीय चाचपणी हे त्याचे उद्दिष्ट असते. 

प्रत्येक पदवीधर खूप छोट्या पार्श्‍वभूमीवर (कॅनव्हास) ही उत्तरे देतो. पण मुलाखत घेणारा जो मानव संसाधन (एचआर) अधिकारी, तुमची उत्तरे काळाने गुणून पाच वर्षांनंतरची तुमची प्रतिमा साकारत असतो आणि ठरवतो की या स्पर्धेत तुम्ही टिकाल काय? कंपनीची उद्दिष्टे तुमच्यामार्फत साध्य होऊ शकतात काय? शेवटी निर्णय होतो - निवड किंवा नकार!
व्यक्तिमत्त्व विकासाला कुठलाही शॉर्टकट नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अंगी सहवेदना, सहानुभूती बाणवणे, दुसऱ्यांच्या भावना व भूमिका समजावून घेऊन त्यात थोडा वाटा उचलणे. कुठलीही पदवी असो, हजारो करिअर आहेत. आज तुमच्याकडून अपेक्षा आहेत - स्वतःभोवती सुखाचा कोष विणून जगणे नको, तर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने भूक, आरोग्य, शिक्षण आणि संपर्क या चार मोठ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी खारीचा वाटा उचलणे! फार अवघड काही करायचे नाही. फक्त मनाला काही सवयी लावायच्या. दुसऱ्यांच्या प्रगतीत आनंद मानणे, ताणाचे नियोजन, निसर्गात फिरणे, समाजात मिसळणे आणि माणसे जोडणे. याला पैसे लागतात शून्य, पण फायदे हजारो. एकच ध्यास हवा. ‘ग्रो फ्रॉम इनसाइड’- आतून विकसित व्हा. पोकळपणा, दिखाऊपणा, खोटेपणा नको. काहीतरी भरीव सांगण्यासारखे पाहिजे आणि सांगणेसुद्धा कधी... ‘आधी केले मग सांगितले’! एकदा जाणिवा समृद्ध झाल्या, की तुम्ही विरघळून तर जाल, पण गाळण्याची वेळ आली की प्रकट व्हाल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com