फुलामधी सामावला...

मृणालिनी चितळे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जानेवारी महिन्यातील झुंजूमुंजू वेळ. स्वच्छपणे जाणवणारा धुक्‍याचा धूसरपणा आणि पानांचा ओलसर वास. त्यामध्ये मिसळलेला फुलांचा मंदसा सुगंध. चालताचालता एकदम थबकले. सभोवताली भरून राहिलेल्या वासांमधून अचानक तांदळाचा वास नाकापर्यंत पोचला. इतक्‍या पहाटे कोण भात शिजवत होतं कोण जाणे! मी घरापाशी परतले आणि पुन्हा एकदा शेजारच्या घरातून आंबेमोहर तांदळाचा परिचित वास नाकात घुसला. कुकरच्या शिट्टीबरोबर जाणवणारा आणि त्याहीपेक्षा वर्षाचे तांदूळ चाळून, पावडर लावून डब्यात भरताना येतो, अगदी तसाच वास.

या प्रसंगाला दोन -तीन दिवस उलटून गेले. संध्याकाळी गच्चीत बसले होते. परत एकदा तोच तांदळाचा वास घमघमला. मी तर अजून नवे तांदूळ आणले नव्हते की गॅसवर कुकर चढवला नव्हता. सहज लक्ष समोर गेलं. बागेतला आम्रवृक्ष नुकत्याच आलेल्या मोहरानं डवरला होता. त्याच्याकडे पाहताना मनात लख्खकन काहीतरी चमकलं.आंबेमोहर तांदूळ...! आंब्याचा मोहर...! वर्षानुवर्षे आंबेमोहर तांदळाचा भात खात असूनही त्याच्या वासाचं आंब्याच्या मोहराशी असलेलं आंतरिक नातं आज असं अचानक सामोरी आलं; जे नातं कैक वर्षांपूर्वी आपल्या कुणा एका पूर्वजाला आकळलं असणार. म्हणून तर या जातीच्या तांदळाला त्यानं आंबेमोहर नाव बहाल केलं असणार. आंबेमोहर तांदूळ भराला येतो, तेव्हाच साधारण आंब्याचा मोहोर फुलायला लागतो.भाताच्या लोंब्यांमध्ये आणि आंब्याच्या इवल्याशा फुलांमध्ये सुगंधाची एकच कुपी कोण भरत असेल? कुठून आणि कसं लाभत असेल हे सुवासाचं लेणं? आकाशातून अलगद झिरपत असेल, का मृद्‌गंधाच्या अणूरेणूंतून फुलांपर्यंत पोचत असेल? कुठं ते गुडघाभर उंचीचं भाताचं रोपटं आणि कुठं हा चारी अंगानं फुलणारा डेरेदार आम्रवृक्ष? तरीही दोघांच्या सुवासाची जातकुळी एक कशी? भाताच्या रोपाचं रुजणं, अंकुरणं आणि फळाला येणं, हा सारा खेळ अवघ्या काही महिन्यांचा, तर वर्षानुवर्षे जमिनीत पाय रोवून उभा ठाकलेला आणि पुन:पुन्हा फळणारा आंब्याचा वृक्ष. कधी मनातही आला नव्हता त्यांच्यातील सुगंधी भावबंध. कदाचित वनस्पतिशास्त्रज्ञ शास्त्रीय परिभाषेत याचं उत्तर देऊ शकतीलही, पण मला मात्र या वेळी बहिणाबाई आठवली,

फुलामधी सामावला, धरित्रीचा परमय 
माझ्या नाकाला इचारा, नथनिले त्याचं काय?

आंबेमोहर तांदळाचं आणि आंब्याच्या मोहराचं मला उलगडलेलं नातं यापूर्वी अनेकांना माहीत असेलही; परंतु निसर्गातील अशा छोट्याशा गोष्टी आपल्या आपण समजून घेता येतात तेव्हा त्यातील नवता आणि निरागसता आयुष्यभर पुरून उरेल एवढा आनंद देऊन जातात, एवढं खरं.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Mrunalini Chitale

टॅग्स