युती शिवसेनेच्या फायद्याची

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे.

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे.

‘मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करायला आलो आहे, चारीधामांची यात्रा करणाऱ्यांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा जनादेश घेऊन आलेल्या फडणवीसांचे अभिनंदन करायला मी आलो आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये जाहीर सभेत सांगतात, तेव्हा ते त्यांच्या लोकप्रियतेचा प्रकाश मुख्यमंत्री फडणवीसांवर टाकत असतात हे जनता जाणते.

फडणवीस यांची पाच वर्षांतील बहुतांश आश्‍वासने पूर्णत्वाला पोचलेली नाहीत, पण त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते, असे लोक मानतात. या शिदोरीवरच फडणवीसांनी राज्याचा दौरा केला. ‘महाजनादेश’ मिळवण्यासाठी ते फिरत होते, तेव्हा आंदोलकांना अडवले गेले, शांततामय निदर्शने न करता ज्यांनी जागांचे आग्रह धरले, त्यांना अडवले गेले वगैरे सगळे यथासांग झाले. विरोधाचे प्रयत्न सत्ताधारी नियंत्रणात ठेवत असतातच. भाजपही चारचौघांसारखाच पक्ष. कोंबडी आंदोलकांचा कडकपणा वगळता महाजनादेश यात्रा यशस्वीपणे पार पडली. दिल्लीतलेच या वेळी गल्लीत घडणार असल्याने अन्य पक्षांतले खासदार, आमदार महाजनादेश यात्रेत फडणवीसांना मुजरा करायला हजर झाले. फडणवीसांनीही मिठ्ठास वाणीने उदयनराजेंना उद्देशून ‘महाराजांनी आज्ञा करायची असते’ असे म्हटले. मोदींनीही हात उंचावून झेंडा धरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला आपले मानले. तीन महिन्यांत सातारावासीयांना पुन्हा मतदानासाठी बाहेर काढणे हा जनादेशाचा द्रोह आहे; पण हे करण्यामागे भाजपची भूमिका आहे. ज्या भागात मोदींची लोकप्रियता स्थानिक नेत्यांच्या सामर्थ्यापुढे थिटी पडत होती, तेथेच बाहेरच्यांना आत घेतले गेले.

सातारा जिल्हा उदयनराजेंमुळे भाजपला सोपा ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांनी भरभरून दिले. पुणे टापूही त्यातलाच. शरद पवारांवर विश्‍वास न ठेवणारे या भागातले अन्य पक्षांतील नेते पसंती देत ती भाजपविरोधी विचारधारेलाच. काँग्रेसी विचारधारेच्या या टापूतील मंडळी आता भाजपकडे आली आहेत. ज्या मतदारसंघांत भाजपचे कार्यकर्ते ताकदीने उभे राहू शकत नव्हते, तेथील मंडळी आत आली आहेत. नगर जिल्ह्याचेही असेच. तेथे राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रवेश देत मंत्रिमंडळात क्रमांक तीनची जागा दिल्याने नगर जिल्ह्यात संगमनेरचा अपवाद वगळला तर भाजपला लाभ होण्याची चिन्हे आहेत. मोदींची लोकप्रियता पुढची किमान दहा वर्षे कायम राहणार याची खात्री असल्यानेच ही पक्षांतरे होत आहेत. 

...तर ठाणे बदलेल नि मुंबईही 
सामान्यत: केंद्रातील सरकारलाच राज्यातही निवडून देण्याकडे जनतेचा कल असतो. त्यामुळेच भाजप या निवडणुकीला सामोरे जाताना अत्यंत सुरक्षित आहे. या वातावरणाशी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. पाच वर्षांपूर्वी स्वबळाची भाषा झाली, त्या वेळी शिवसेनेचा बाणा जनतेला आवडला; पण वेगळे लढून पुन्हा त्याच भाजपशी केलेल्या हातमिळवणीमुळे आता जनतेला दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. शिवसेनेला वाटते, की भाजपने आपल्याला राजासारखे वागवावे; पण तसे वरकरणी दाखवत शिवसेनेचे मांडलिकत्व भाजप अप्रत्यक्षरीत्या दाखवून देत असते. शिवसेनेचा लाभ पडती भूमिका घेत एकत्र राहण्यातच आहे. अगदी १२० जागा लढवल्या, तरी त्यातून शिवसेनेचे ६५ ते ७५ आमदार निवडून येऊ शकतात. तसे न करता वेगळे लढायचे ठरले, तर ४० ते ५० जागा निवडून येतीलही, पण लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या भाजपच्या पारड्यात २८८ पैकी १४० ते १५० जागा पडल्या तर आश्‍चर्य वाटायला नको.

त्या स्थितीत भाजपला शिवसेनेची गरज पडणार नाही. कोकण हा शिवसेना बालेकिल्ला, तेथेही पक्षांतरे घडवत भाजपने स्वत:ची सोय पाहण्याचे प्रयत्न हिरिरीने सुरू ठेवले आहेत. खुद्द मुंबईत शिवसेनेच्या जन्मभूमीत भाजप जास्त जागा जिंकेल, अशी स्थिती आहे. नवी मुंबईत गणेश नाईक भाजपाई झाले आहेत, पनवेलचे प्रशांत ठाकूर भाजपमध्येच आहेत. पक्षांतरे शिवसेनेसाठीही झाली, पण भाजपकडे आलेले नेते ताकदवान आहेत. अशा भाजपमय वातावरणात शिवसेनेमागे लोण्याचा वाडगा घेऊन फिरण्याचे खरे कारण आहे सकारात्मक वातावरणाला गालबोट लागू न देण्याची भाजपची इच्छा. बाकी सगळ्या बतावण्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला वातावरणाची जाणीव नसावी. त्यानंतर ‘बालाकोट’ झाले अन्‌ आता तर ३७०वे कलम रद्द केले गेले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चाणाक्ष आहेत. ते जागा पदरात पाडून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील, पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच फायद्याचे आहे. वेडात मराठी वीर दौडवण्याची चूक न करणेच त्यांच्या हिताचे आहे.

पाच वर्षांत शिवसेना काय शिकली ते लवकरच कळेल. ‘राजकीय स्थैर्य असेल तरच प्रगती होते,’ असे सांगताना ‘संपूर्ण बहुमत नसतानाही फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्य चालवले,’ असे मोदी म्हणाले. उद्धवजींना पुन्हा ‘अफजलखानाच्या फौजां’शी दोन हात करायचे नसतील. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ ही रीत आदित्य यांनी स्मरली, पण वचन देणारे दाते अन्‌ मागणारे याचक असतात हे व्यवहारी मंडळी जाणतात. तसे झाले नाही तर ठाणे बदलेल म्हणतात, मुंबईच्या चाव्या जातील ते वेगळेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Mrunalini Naniwadekar