
तीन पक्षांनी एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम मुख्यमंत्रिपद आहे. पण, त्यासाठी तयार होणाऱ्या या आघाडीत समानता कशी आणावी, याचा विचार अन्य दोघे करीत आहेत. ही सगळी नवी गणिते जुळतील, की फिसकटतील याविषयीची अनिश्चितता कायम आहे.
तीन पक्षांनी एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम मुख्यमंत्रिपद आहे. पण, त्यासाठी तयार होणाऱ्या या आघाडीत समानता कशी आणावी, याचा विचार अन्य दोघे करीत आहेत. ही सगळी नवी गणिते जुळतील, की फिसकटतील याविषयीची अनिश्चितता कायम आहे.
चार आठवडे उलटले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेला मानाचे हे पद हवेय. तसा शब्द भाजपने दिला होता; पण तो त्यांनी फिरवला आहे. ते वचन पाळत नसतील तर नवी राजकीय आघाडी तयार करण्यास शिवसेनेची ना नाही.
आजही ते या पदासाठी एकट्या पडलेल्या भाजपकडे परतण्यास राजी होऊ शकतील, असे काही मंडळी म्हणतात. काँग्रेसी विचारसरणीच्या पक्षांशी एकीकडे चर्चा सुरू करून, दुसरीकडे ‘मोदींशी असलेल्या संबंधात ‘शहा आणि कंपनी’ने पडू नये’, असे संजय राऊत सांगत आहेत. तब्येतीच्या कुरबुरी करण्याऐवजी ते सतत पक्षकार्य सुरू ठेवून आहेत. नवी आघाडी त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देणार की पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ते मिळणार, हा प्रश्नच आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जागा कुणाच्याही, कितीही आल्या तरी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केले होते, असे म्हणतात. ही चर्चा त्या दोघांमधली आहे. अमित शहा यांनी ‘असे काही ठरले नव्हते’ असे म्हटले आहे. ते खरे अन् उद्धव खोटे यावर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही. मुख्यमंत्री कुणाचा, हा त्या दोहोतला प्रश्न आहे.
युतीत निवडणूक लढवली गेली. दोन्ही पक्षांना संयुक्त जनादेश मिळाला, तो पाळणे ही भाजप- शिवसेनेची एकत्रित जबाबदारी आहे. ती पाळायला शिवसेना तयार नाही, असेही नाही, त्यांना फक्त मुख्यमंत्रिपदाचा शब्द प्रत्यक्षात यायला हवा आहे.
बंद दरवाज्याआड...
निवडणूकपूर्व युती तोडता येणार नाही, असा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे महत्त्वाकांक्षेसाठी भाजपला दूर सारण्याचा प्रश्न नैतिक असेलही; कायद्यात बसणारा नाही. भाजप हे पद त्यांना देणार नाही, असे म्हणते. बंद दरवाजाआड काय झाले, हे माहीत करून घेण्याचा अधिकारही जनतेला नाही, त्यामुळे खरे-खोटे दोघांना लखलाभ. जनतेला सरकार हवे आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षाने सरकार स्थापन करू शकत नसल्याचे कळवले, त्यामुळे पर्यायांचा विचार सुरू झाला. निवडून आलेल्या अन्य तीन पक्षांना एकत्र येऊन संख्याबळाच्या आधारावर सरकार स्थापन करता येईल.
शिवसेना त्यासाठी तयार झालेली दिसते. दुष्यंत चौताला, मेहबूबा मुफ्ती अशा त्या त्या ठिकाणी विरोधात असलेल्या पक्षांतील नेत्यांना आपले म्हणणाऱ्या भाजपला या विषयावर शिवसेनेवर टीका करायचा अधिकार नाही. भाजपचे बडे नेते शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी ‘मातोश्री’वर जात. आता नवी रचना करायची असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उंबरठे ओलांडत असल्याची टीका भाजपने सुरू केली आहे. पण, हिंदुत्ववादी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करताना वेगळी राजकीय मांडणी ध्यानात घ्यावी लागेल. त्यासाठी मेहेनत, धावपळ, आवश्यक अन् अपरिहार्य ठरेल. तीन पक्षांनी एकत्र येण्यासाठी समान कार्यक्रम तयार करायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम मुख्यमंत्रिपद आहे, त्यासाठी तयार होणाऱ्या या आघाडीत समानता कशी आणावी याचा विचार अन्य दोघे करीत आहेत.
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अटी टाकेल. मुळात हे दोघेही वेगळे पक्ष. आपापसांत काहीसा अविश्वास बाळगणारे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या जागा जास्त, त्यामुळे त्यांची मागणी शिवसेनेच्या बरोबरीची असणार. काँग्रेस हा कमी जागा निवडून आल्या असल्या तरी राष्ट्रीय पक्ष. शिवसेनेसमवेत युती करू नका, असा त्यांच्या अन्य राज्यांतील शाखांचा आग्रह, त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचे ठरलेच, तर जागा कमी असल्या तरी काँग्रेस वाटा मोठा मागेल.
नेत्यांची तारकादळे असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाऊ नये, याकडेही हा पक्ष लक्ष देईल. हे दोन पक्ष शिवसेनेकडून बरीच आश्वासने मिळवतील. हे तिघे एकत्र येतीलही; पण शिवसेनेला पाठिंब्यासाठी कायम पडते घ्यावे लागेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी तिघांनीही रेटून धरलेला विषय. मुस्लिम समाजाला आरक्षण, हाही असाच विषय. त्यावर आता चर्चा होईल; पण दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची मानसिकता कदाचित काँग्रेसला आवडणार नाही.
मोदींना थांबवता येते; वेळप्रसंगी वैचारिक निकष दूर ठेवून काँग्रेस भाजपचा विजयरथ थांबवू शकते, हे दाखवण्यासाठीच ही आघाडी अस्तित्वात येऊ शकेल. त्या दिशेने मांडामांड करताना मोदींना ‘चहावाला’, ‘उपरे’ अशी विशेषणे लावणारी शिवसेना ‘ते मोठे भाऊ आहेत’, हे सांगत नुकसान तर करून घेत नाहीयेना? शिवसेना ही भाजपची गरज असेल; पण काँग्रेसचे तसे नाही. त्यांच्या आमदारांना सत्ता हवी आहे; पण या नव्या खेळात
शिवसेनेला भाजपकडे परतण्याचे दोर कापावे लागतील. दोन्ही डगरींवर पाय ठेवून कसे चालेल? भाजपशी असलेले संबंध बिघडले आहेत हे खरेच; पण नवे घडते आहे हे कशावरून?