लघुकथेचे ‘कोलंबस’

Ram-Kolarkar
Ram-Kolarkar

‘अभिजात’ आणि ‘लोकप्रिय’ लघुकथेची व्यवच्छेदक लक्षणे ओळखून राम कोलारकरांनी लघुकथा साहित्य परंपरेचा मागोवा घेतला. स्त्री-लेखकांनाही या परंपरेत मानाचे स्थान दिले. नुकतेच निधन झालेल्या कोलारकरांना त्यांच्या कन्येने वाहिलेली श्रद्धांजली.

जागतिक लघुकथेचा ६० वर्षे अभ्यास करून मराठी वाचकांसाठी जगातील उत्तमातील उत्तम लघुकथा ज्यांनी उपलब्ध करून दिल्या,आणि मराठी लघुकथादेखील ज्यांनी व्रतस्थपणे उपलब्ध करून दिल्या, अशा राम कोलारकरांचे नुकतेच निधन झाले. आचार्य अत्रे यांनी  त्यांना लघुकथेचे कोलंबस म्हणून संबोधले होते, ते किती सार्थ होते, हे त्यांच्या कार्यावरून समजते.

कोलारकर संशोधक, समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या विविध प्रस्तावनांतून जागतिक, तसेच मराठी लघुकथेचा प्रवास कसा घडला आणि लघुकथेला सद्यःस्वरूप कसे प्राप्त झाले, हे कळते. मराठीतील विविध नियतकालिकांच्या उदयाचा इतिहासही त्यांच्या लिखाणात स्पष्ट होतो. विशिष्ट नियतकालिकांची कथाकारांच्या साहित्यिक वाटचालीतील भूमिकाही ते विशद करतात. टॉलस्टॉय, चेकॉव्ह किंवा पुश्‍कीन यांसारख्या रशियन कथाकारांचा; ओ हेन्‍रीसारख्या अमेरिकन कथाकारांचा मराठी लघुकथेवरील प्रभाव कोलारकर यांना जाणवतो. श्री. वा. रानडेंसारख्या ‘तारकेचे हास्य’ ही कथा लिहिणाऱ्या लेखकाचा कोलारकर खास उल्लेख करतात. दि. बा. मोकशी, गो. गं. लिमये, कमलाबाई टिळक, चिं. यं. मराठे, कुसुमावती देशपांडे, चि. त्र्यं. खानोलकर व वामन चोरघडे यांसारख्या लेखकांमधील सामाजिक जाणीवांचा शोध कोलारकरांनी घेतला. कॅप्टन गो. गं. लिमये यांचे मह्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यातूनच पुढे त्यांनी संपादित केलेल्या शिल्पकारमालेचा जन्म झाला.  लिमये, कमलाबाई टिळक आणि चि. य. मराठे हे मराठी आधुनिक लघुकथेचे शिल्पकार असल्याचे कोलारकरांनी नमूद केले. लघुकथेचे परीक्षण करताना कोलारकरांचा भर खास करून लघुकथेचे तंत्र आणि विषयांचे नावीन्य यांच्यावर असायचा.

टीकाकार एडवर्ड गार्नेट यांच्या ‘वेस्ट शॉर्ट स्टोरीज ऑफ द इयर’ या उपक्रमापासून प्रेरणा घेऊनच सर्वोत्कृष्ट मराठी कथा किंवा सर्वोत्कृष्ट जागतिक कथा आपल्याकडे सुरू केल्याचे ते नम्रपणे नमूद करतात. वयाच्या २१ व्या वर्षी वोकॅशिओ, फ्लाऊबर्ट, थोरो, इमरसन, हेमिंगवे, टी. एस. एलिएट, चार्ल्स डिकन्स, वॉन्टे सिस्टर्स, कॅथेरिन मॅन्सफिल्ड, ग्रेझिया डेलेडा, पीरॅन्डेलो, डी. एच. लॉरेन्स, ओ हेन्‍री, मॉम आदी अनेक लेखकांच्या साहित्याचे वाचन कोलारकरांनी पूर्ण केले होते. त्यामुळेच त्यांच्या लघुकथेच्या परीक्षणात सूक्ष्मदर्शी आणि स्थूलदर्शी आणि या दोन्हींमधील छटा ओळखणारा संशोधक डोकावत असे. त्यांच्या जागतिक लघुकथेच्या गाढ्या अभ्यासाच्या क्षितिजाच्या पार्श्‍वभूमीवर मराठी लघुकथाकारांचे स्थान ते निश्‍चित करत चालले होते. सुरेश वेंगुर्लेकर, अंबिका सरकार, शाम मनोहर,ह.मो. मराठे, चारूता सागर, क.दी. सोनटक्के आदी कथाकारांमधील ताकद त्यांनी कितीतरी आधी ओळखली. ‘अभिजात’ आणि ‘लोकप्रिय’ लघुकथेची व्यवच्छेदक लक्षणे ओळखून कोलारकरांनी लघुकथा साहित्यपरंपरेचा आगळावेगळा मागोवा घेत अनेक स्त्री लेखकांनाही या परंपरेत मानाचे स्थान प्राप्त करून दिले. एकप्रकारे मराठी लघुकथेचा नवीन ‘कॅनन’ निर्माण केला.

उत्तम ,उदात्त देण्याचा वसा
जे जे उत्तम, उदात्त, सुंदर आहे ते ते मराठी वाचकाला देण्याचे व्रतच जणू कोलारकरांनी घेतले होते. त्यांचा सगळा साहित्यसंसार याच भूमिकेतून गेली ६० वर्षे चालू होता. नवीन लेखकांना काहीच प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून ‘नवे लेखन’ हे मासिक कोलारकरांनी १९५७ मध्ये सुरू केले. वाचकांना उत्तम विनोदीकथा, ऐतिहासिक कथा, भाषांतरित कथा, जागतिक कथांचा खजिना उपलब्ध करून दिला.

मराठी माणसाला चांगल्या साहित्याची गोडी लागावी या प्रेरणेतून ‘मराठी पॉकेट बुक्‍स’ हा उपक्रम राबवणारे कोलारकर हे पहिले संपादक.चिं. य. मराठे, व्यंकटेश माडगूळकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे आदी दिग्गजांचे कथासंग्रह ५० पैशांत पॉकेट बुक रूपात कोलारकरांनी संपादित व प्रकाशित केले. बरीच वर्षे हा प्रयोग तोटा होऊनही चालू राहिला. वाचनसंस्कृती संवर्धित करण्याच्या कामातील त्यांचा हा वाटा त्यांच्या अभ्यासाइतकाच मोलाचा नि महत्त्वाचा  आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com