क्रेझी फटकेबाज

क्रेझी फटकेबाज

क्रिकेटमधील अतिजलद फॉरमॅटचा अर्थात टी-२०चा फंडा निर्माण झाल्यापासून अनेक ‘क्रेझी’ विक्रम झाले आहेत. अशाच विक्रमांच्या यादीत वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल याने आणखी भर घातली. टी-२० मध्ये षटकारांचे शतक पूर्ण केलेला तो जगातील पहिला फलंदाज. टी-२०चा आद्य फटकेबाज अशीच त्याची ओळख बनून गेली. आता या विक्रमामुळे तर त्यावर शिक्कामोर्तबच झाले. इंग्लंडविरुद्ध एकमेव टी-२० सामन्यात त्याने ही कामगिरी केली. ३७ वर्षांचा हा खेळाडू डावखुरा आहे. त्याची शैली डोळे विस्फारून टाकते. गेलचा हा विक्रम त्याच्या तसेच टी- २० चाहत्यांसाठी जल्लोषाचा क्षण आहेच, पण त्यास आणखी काही संदर्भ आहेत.

वेस्ट इंडीज क्रिकेटची शोकांतिका हा त्यांच्याच नव्हे तर जगभरातील चाहत्यांच्या आणि बहुतांश तज्ज्ञांच्याही दुःखाचा विषय आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी मात्र मार्क निकोलस नामक ब्रिटिश तज्ज्ञाने खळबळजनक वक्तव्य केले. वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू बिनडोक (ब्रेनलेस) असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर विंडीजने टी-२० जगज्जेतपद मिळवून त्यांचे शब्द त्यांच्याच घशात घातले. नंतर निकोलस यांना माफी मागावी लागली. त्यांच्या वक्तव्यामुळे पेटून उठलेल्या क्रिकेटपटूंमध्ये गेल हा सलामीवीर अर्थातच आघाडीवर होता. यासंदर्भात ज्या इंग्लंडला हरवून विंडीजने हा पराक्रम केला त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच देशात गेलने हा टप्पा गाठणे, हा आणखी एक लक्षणीय योगायोग.

केवळ झटपट क्रिकेट खेळणाऱ्या गेलने ‘आयपीएल’चे व्यासपीठ दणाणून सोडले. दुसरीकडे अनेकदा तो मैदानाबाहेर नकारात्मक कारणांमुळे वादात सापडला. ऑस्ट्रेलियातील टी-२० लीगमध्ये त्याने टीव्ही अँकर तरुणींविषयी अनुचित उद्‌गार काढले. विंडीज क्रिकेट मंडळ आणि खेळाडू यांच्यातील वादात त्याने नेहमीच सडेतोड भूमिका घेतली. त्यामुळे तो बऱ्याचदा संघाबाहेर राहिला. या सामन्यापूर्वी मात्र गेलने कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा प्रदर्शित केली. विद्यमान कर्णधार जॅसन होल्डर याने त्याचे स्वागत गेले. गेलसारखा फलंदाज संघासाठी आणि कसोटी क्रिकेटसाठी खूप काही योगदान देऊ शकतो, असे होल्डर म्हणतो. कसोटी क्रिकेट निकाली ठरण्याचे आणि पर्यायाने त्याचा ‘निकाल’ लागू नये म्हणून गेलसारखे फलंदाज असणे ही खेळाची आणि काळाचीही गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com