नाममुद्रा : आक्रमक नेता ते विधानसभा अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

भूमिपुत्र ते विधानसभेचे अध्यक्ष, हा नाना पटोले यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. आक्रमक, बहुआयामी ‘ओबीसी’ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत.

भूमिपुत्र ते विधानसभेचे अध्यक्ष, हा नाना पटोले यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. आक्रमक, बहुआयामी ‘ओबीसी’ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत.

विद्यार्थी संघटनेत काम करीत असताना १९९० मध्ये सानगडी जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९९९ व २००४ मध्ये काँग्रेसने लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. तत्कालीन काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप करून त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी २००८ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. पुढे ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. पण, त्यांचा पराभव झाला.

जुलै २००९ मध्ये नानांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २००९ मध्ये साकोलीतून ते भाजपकडून विजयी झाले. २०१४ मध्ये भाजपतर्फे ते भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर त्यांनी जाहीर टीका केली आणि त्यातूनच पुढे खासदारकीचा राजीनामा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर नेहमीच लढा देणारे नाना पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साकोलीतून नानांनी आमदार परिणय फुके यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येतानाच त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, थेट विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली, हा सर्वांसाठीच सुखद धक्‍का होता. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर थेट सरकारला धारेवर धरणारे नाना आता विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष आहेत. ओबीसी समाज, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. सध्या संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मोठी गरज आहे. अशा वेळी नानांच्या अनुभवाचा निश्‍चितच उपयोग होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on nana patole